आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहास माफ करणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाचं वर्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. दादरमध्ये त्यानिमित्ताने इतिहासाला दखल घ्यायला लावणाऱ्या दोन गोष्टी घडल्या. एक, इंदू मिलच्या जमिनीवर बाबासाहेबांच्या विशाल स्मारकाची पायाभरणी. दुसरी, चळवळीचं केंद्र राहिलेल्या आंबेडकर भवनाची रातोरात केलेली पाडापाडी. दोन्ही घटना ‘अांबेडकराइट्स’च्या जिव्हारी लागल्यात खऱ्या. त्याला तशी कारणंही आहेत. इंदू मिल हस्तांतरण झालं नसतानाही स्मारकाची पायाभरणी का केली आणि आंबेडकर कुटुंबीयांना विश्वासात न घेता भवनाची इमारत का पाडली, असे ते कळीचे सवाल अाहेत.

आंबेडकर भवन पाडकामप्रकरणी आंबेडकराइट्समध्ये दोन गट पडलेत. एक आहे बाबासाहेबांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर समर्थकांचा. दुसरा आहे राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांचा. १९३८ मध्ये बाबासाहेबांनी समस्त अस्पृश्य समाजाच्या उत्थानासाठी इमारत फंडाची योजना आखली. फंडातील त्या पैशातून मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे दादरला २३३२ वार क्षेत्रफळाचा भूखंड ३६ हजार ५३५ रुपयांना खरेदी केला. त्या जागेवर सोशल सेंटर उभारायचे होते. त्यासाठी त्यांनी दि बाॅम्बे शेड्युल्ड कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट स्थापन केला. पुढे या संस्थेचे नामांतर पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट झाले. १९७५ मध्ये ट्रस्टींनी तेथे छोटी इमारत बांधून सार्वजनिक वापरात आणली. ती इमारत जमीनदोस्त करेपर्यंत वापरात होती.

रत्नाकर गायकवाड ट्रस्टींचे सल्लागार आहेत. आम्हाला येथे १७ मजली इमारत बांधायची आहे. जुनी इमारत पालिकेने धोकादायक ठरवली होती म्हणून आम्ही ती पाडली, असे गायकवाड सांगतात. तर आंबेडकर बंधू म्हणतात, हिंदू काॅलनीतील भूखंड विकून बाबासाहेबांनी प्रिंटिंग प्रेसचा भूखंड खरेदी केला होता. पुढे तो आंबेडकर भवनच्या भूखंडात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे आंबेडकर भवनच्या भूखंडावर आंबेडकर कुटुंबीयांचाही हक्क आहे.

सध्या दोन्ही गटांतील वाद विकोपास गेला आहे. सोशल मीडियावर शिवराळ भाषेत आरोप चालू आहेत. गायकवाड यांच्या गटात मुख्यत्वे सनदी अधिकारी आहेत. आंबेडकर गटाला भारिप आणि रिपब्लिकन सेना अशा राजकीय संघटनांचं पाठबळ आहे. आंबेडकर कुटुंबीयांना दादरचा भूखंड लाटायचा असल्याचा, गायकवाड यांचा आरोप आहे, तर ट्रस्टीजना १७ मजली इमारत बांधून ती व्यावसायिक वापरात आणायची असल्याचा आंबेडकर गटाचा दावा आहे.

महाराष्ट्राला संस्थांंतर्गत वाद नवे नाहीत. मोलाचे काम केलेल्या शेकडो संस्था ट्रस्टीजच्या मतभेदाने आज कुलूपबंद आहेत. फुले, टिळक, आगरकर यांच्या संस्था, संघटनाही याला अपवाद नव्हत्या. संशोधन संस्थांपासून ते अगदी गावातल्या दूध डेअऱ्यांपर्यंत सवतेसुभे सगळीकडे दिसतात. त्याला बाबासाहेबांच्या संस्था, संघटना तरी कशा अपवाद असणार? बाबासाहेबांच्या प्रत्येक संस्थेत सध्या वाद आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीत रामदास आठवले घुसलेत, बुद्धिस्ट सोसायटीवर बाबासाहेबांचे पुतणे अशोक आंबेडकर दावा सांगतात आणि आंबेडकर भवन आता रत्नाकर गायकवाड यांच्याकडे आहे. बाबासाहेबांंनी स्थापन केलेल्या तिन्ही संस्थांमध्ये सध्याचे विश्वस्त आणि आंबेडकर कुटुंबीय यांच्यात वाद चालू आहेत. राज्य सरकारला या संस्था नष्ट झाल्या तर हव्याच आहेत. कारण या संस्था उद्याच्या सामाजिक क्रांतीची केंद्रे होऊ शकतात. तसा प्रयत्न राष्ट्रवादी-काँग्रेसने केला होता. आता फडणवीस सरकारही तेच करते आहे.
बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. गौतम बुद्धाच्या चिंतनाचं सार काय तर ‘मध्यममार्ग’. अतितृष्णा नको आणि अतिविरक्तीही नको. गौतमाने गृहस्थींना हा उपदेश केला होता. बुद्धाचा हा मध्यममार्ग भीमअनुयायी आज विसरलेले दिसतात, अन्यथा सामोपचाराने वाद मिटले असते. बाबासाहेबांच्या संस्थांची वाताहतही झालीच नसती. भावी पिढी इतिहासात घटनांच्या मागच्या कारणांचा शोध घेत असते. बाबासाहेबांच्या संस्थांचा उद्या इतिहास धुंडाळला जाईल. त्या वेळी तोतया आणि खऱ्या अशा सगळ्या विश्वस्तांच्या झोळीत त्यांच्या पापांचे माप इतिहास टाकायला विसरणार नाही, इतके मात्र नक्की.
(लेखक मुंबई ब्युरोचे विशेष प्रतिनिधी आहेत.)
बातम्या आणखी आहेत...