आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉलमधील शापित गंधर्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लियोनेल मेसीफुटबॉलमधील जादूगार होता. उंची फक्त फूट इंच. देहयष्टी अगदीच किरकोळ. हा काय फुटबॉल खेळणार... अशीच प्रथमदर्शनी छाप पडायची. पण याच किरकोळ देहामध्ये जगातला महान फुटबॉलपटू होता. त्याच्या पायात जादू होती, वेग होता. तो डाव्या बाजूनेच आक्रमण करणार हे फक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंनाच नव्हे, तर संपूर्ण स्टेडियमला ठाऊक असायचं. तरीही त्याला कुणीही रोखू शकलं नाही एवढा वेग त्याच्या पायात होता आणि त्या वेगवान पायांना चेंडू चिकटल्याप्रमाणे भास व्हायचा. म्हणूनच जगातल्या सर्वोत्तम फुटबॉलपटूंनाही जे जमलं नाही ते त्याने केले. ‘फिफा’चा तब्बल पाच वेळा ‘बलून डी ऑर’ किताब त्याने पटकावला. त्यापैकी चार वेळा सलग. बार्सिलोनाला त्याने आठ ‘लो लीगा’ विजेतीपदे पटकावून दिली. चार युरोपियन विजेतेपदाचे चषक.”ला लीगा’ हंगामात तब्बल ५० गोल करण्याच्या किमयेपाठोपाठ वर्षात ९१ गोल मारण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे.

मात्र, अर्जेंटिनासाठी खेळताना त्याच्या गुणवत्तेला बहर आला नाही ही शोकांतिका आहे. तो जन्मला अर्जेंटिनाच्या रोसारिओ येथे. आजी सेलिया हिने त्याला व्यावसायिक फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न आणि रस्ता दाखवला. सेलियाने आपल्या नातवाला चांगल्या फुटबॉल प्रशिक्षकांकडे नेले. तो १० वर्षांचा असतानाच आजी वारली. पण आजही तो आजीचे ऋण विसरला नाही. प्रत्येक गोल केल्यानंतर तो आकाशाकडे पाहतो, दोन्ही हाताचे अंगठे करून आजीचे आभार मानतो, जी त्याचे यश पाहायला जिवंत नाही. आजी वारली त्याच वेळी त्याच्या देहयष्टीत योग्य वाढ होत नाही हे सर्वांच्या लक्षात यायला लागले होते. ‘ग्रोथ हार्मोन्स’ची कमतरता असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्याची उंची किमान सर्वसाधारण खेळाडू होण्याइतपत तरी वाढेल का असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. उपचार महागडे होते. वडिलांच्या कंपनीने खर्च उचलला. नंतर त्याच्या नेवेल्स क्लबवर खर्चाची जबाबदारी टाकण्यात आली. बार्सिलोनाच्या टेक्निकल डायरेक्टर चार्ली रेक्साने मेसीतली गुणवत्ता पाहून त्याच्या औषधोपचाराचा अन्य खर्च देण्यास बार्सिलोना क्लबला सांगितले. त्या वेळी मेसीचे वय होते अवघे १३. बार्सिलोनाचीही गुंतवणूक फुटबॉल विश्वाला लाभदायक ठरली. बालपण हरवले, पण फुटबॉलचा ‘मिडास’ स्पर्श बार्सिलोनात झाला. औषधोपचार आणि फुटबॉल यानंतरचे एकाकीपण मेसीला खायला उठायचे. कुणी रडताना पाहू नये म्हणून खोलीत स्वत:ला कोंडून घ्यायचा. त्याला यश सहजासहजी मिळाले नाही. स्पेनमध्ये अधिक वास्तव्य केल्यामुळे एका क्षणी तो अर्जेंटिनासाठी खेळेल याबाबत शंका निर्माण झाली होती. त्यानूwूे जन्म देणाऱ्या देशाची निवड केली. त्यामुळे त्याची नेहमीच महान फुटबॉलपटू मॅरेडोनाशी तुलना केली गेली, ज्याची कारकीर्द युरोपियन फुटबॉलमध्येही यशस्वी ठरली होती. त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे मॅरेडोनाने स्वबळावर अर्जेंटिनाला विश्वविजेते केले होते. या अपेक्षांचे ओझे ‘लियोनेल मेसी’ या युवकावर कायम होते. खरं तर मॅरेडोनापेक्षा मेसीने क्लब फुटबॉलमध्ये जागतिक स्तरावर अधिक गोल मारले आहेत. मॅरेडोनाची फुटबॉल कारकीर्द चिखलात बहरली-फुलली, पण मेसी मात्र बार्सिलोनात घडत गेला. त्यामुळे मेसीच्या अंगात जर्सी अर्जेंटिनाची असली तरीही तो सामन्याआधी इतरांसोबत आपल्या देशाचे राष्ट्रगीत गात नाही असा आरोप व्हायचा. क्लबसाठीची निष्ठा देशासाठी खेळताना नाही, अशीही देशवासीयांची त्याच्याप्रति धारणा होती. त्यामुळे अनेकदा ‘मेसी’ अर्जेंटिनाचा संघ सोडणार अशा वावड्या उठायच्या. तो म्हणायचा, “मी वाढलो अर्जेंटिनात, पण शिकलो स्पेनमध्येच. पण खेळायची पद्धत बदलली नाही.’

भन्नाट वेग हा त्याच्या खेळाचा बालेकिल्ला होता. त्याच वेगात धावताना चेंडूही त्याच्या डाव्या पायाला चिकटला आहे असे वाटायचे. वेगात धावताना तो जागच्या जागी चेंडूसह थांबायचा. ही कला अविश्वसनीय होती. या एका कौशल्याने त्याला इतरांपेक्षा वेगळे असल्याचे सिद्ध केले. त्याच्या फुटबॉल विश्वातील महानतेची साक्ष देण्यासाठी त्याने मारलेल्या गोलांची संख्याच पुरेशी आहे. तो महान फुटबॉलपटू होता, कर्तृत्ववान होता. मात्र, त्याच्याकडे मॅरेडोना किंवा पेलेसारखी वलयांकित प्रतिभा नव्हती. पाठीशी देशवासीय नव्हते तरीही तो मोठा फुटबॉलपटू म्हणूनच ओळखला जाईल.
(लेखक क्रीडा संपादक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...