आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ना जलसंकटाचा धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील दशकात चीनमध्ये नद्या आणि समुद्र किनाऱ्यावर अनेक नवी शहरे वसली. साधनसामग्री विपुल प्रमाणात असल्याने तेथे मॅन्युफॅक्चरिंग हब झाले. पण यासोबतच अमर्याद बांधकामे झाली. वातावरण बदलामुळे मागील चारेक वर्षांत हवामान अचानक बदलले. उन्हाळ्यातही धो धो पाऊस झाल्याने जगभरातील शास्त्रज्ञांसमोर या नैसर्गिक संकटाला कसे तोंड द्यायचे, हा मोठा प्रश्न उभा टाकला आहे.

दक्षिण चीनमधील‘पर्ल’ (मोती) नाव जेवढे सुंदर आहे, तेवढ्याच सुंदर येथील इमारती. चीनमधील प्रमुख नदी असलेल्या पर्लची लांबी २,४०० किलोमीटर असून तिचे क्षेत्रफळ ४ लाख ५३ हजार ७०० चौरस किलोमीटर आहे. ही नदी दक्षिण चीन सागराला मिळते.  

मागील सलग तीन वर्षे पर्ल नदीच्या डेल्टा भागात मोठा पूर आला. पावसाळा नसतानाही पूर येऊन इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरले. पावसाळ्यात तर काही तास संततधार चालताच मॉल आणि इमारतीचे तळमजले बुडण्यास सुरुवात होते. दोंगगुआनसारख्या शहरांसाठी ही मोठी समस्या बनली आहे. जगातील ‘डायनॅमिक इंडस्ट्रियल’ शहरांमध्ये दोंगगुआनचा समावेश होतो. मॅन्युफॅक्चरिंग हबच्या उद्देशानेच या शहराची स्थापना झाली होती. मात्र, मे २०१४ मध्ये १०० हून अधिक कारखाने जलमग्न झाले होते. २० मिनिटांतच पाणी गुडघ्यापर्यंत आले होते. अनेक उद्योगांना फटका बसला होता. या पुराचे प्रमुख कारण म्हणजे हे शहर पर्ल नदीच्या डेल्टा क्षेत्रात वसलेले आहे. 

गुआंगझू हे शहर पोर्ट सिटी म्हणून ओळखले जाते. सव्वा कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात त्याच वर्षी  ८० जहाज आणि २०-२५ हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी लावण्यात आले होते. या संकटात एक लाखाहून अधिक नागरिकांचा निवारा वाहून गेला.  एकूणच, पर्ल नदीचे डेल्टा क्षेत्र मागील ३-४ वर्षांत झपाट्याने धोकादायक बनत आहे. मे २०१४ मधील पावसानंतर तर जगभरातील शास्त्रज्ञांना धक्काच बसला. वातावरण बदलाचे परिणाम एवढे भयंकर असू शकतात, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. नदीकिनारी वसलेली शहरे जलमय होतील का? मागील पिढीपर्यंत डेल्टा हा शेतीचा परिसर होता. या परिसरात तीन मोठ्या नद्यांमध्ये शेकडो उपनद्यांचे विणलेले जाळे असल्याने दूरदूरपर्यंत पसरलेली भातशेती समृद्ध होती. गुआंगझूची ओळखच या शेतीमुळे होती. मात्र, १९८० च्या दशकात या परिसराची स्थितीच पालटली. बीजिंगमधील इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड एन्व्हायर्नमेंटल अफेअर या संस्थेचे संचालक मा जून म्हणतात, ‘चीनमध्ये वातावरण बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. 

राजधानी बीजिंग हे त्याचे मोठे उदाहरण आहे.  औद्योगिकीकरण झालेल्या अनेक शहरांमध्ये हे दुष्परिणाम दिसू लागलेत. वातावरण बदलाच्या परिणामांचा वेग आपल्या अपेक्षेपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. समुद्राची पाणी पातळी ज्या गतीने वाढत आहे, ती सहजासहजी मोजता येऊ शकत नाही. उन्हाळ्यातही कधी वादळ उठेल सांगता येत नाही. चीनमध्ये या विषयावर कोणी बोलत नाही. नैसर्गिक आपत्तींकडे दुर्लक्ष करून नागरिक व्यवसायाचाच विचार करत आहेत.’ 

आर्किटेक्ट आणि प्रोफेसर झाऊ जियानचुन म्हणतात, शहरांमध्ये आधुनिक चित्र निर्माण केले गेले आहे. मात्र, वास्तव चित्राकडे दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण दक्षिण चीनचे भविष्य हवामानावर अवलंबून आहे. हवा प्रदूषणामुळे नागरिक चिंतेत आहेत. गुआंगदोंग शहरात काही कारखाने प्रदूषणामुळेच बंद झाले. काही मॅन्युफॅक्चरिंग उद्योग चीनमधून व्हिएतनाम आणि कंबोडियात विस्थापित होत आहेत. तेथे फार कडक नियम नाहीत. त्या देशांनी चुका केल्या तरी त्याचे परिणाम चीनलाच भोगावे लागू शकतात. त्यामुळे चीनने आता हरित तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. 

ब्रिटनमधील साउथम्पटन विद्यापीठात कोस्टल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर रॉबर्ट जे निकोलस हे जागतिक बँकेचा अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये सहभागी होते. त्यांच्या मते, चीनमध्ये कधीही कॅटरिनासारखे वादळ येऊ शकते. २००५ मध्ये या वादळाने अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्समध्ये हाहाकार माजवला होता. २०१६ मध्ये चीनमध्ये १६ टक्क्यांपेक्षा ज्यादा विक्रमी पाऊस झाला होता. त्यामुळे चीनला किनारी प्रदेश वाचवण्यासाठी तत्काळ काही उपाययोजना कराव्या लागतील. अन्यथा पुढील संकट चीनसाठी किती धोकादायक ठरू शकते, याची कल्पना कोणीही करू शकत नाही. 
- मायकल किमलमॅन, शहर व गृहनिर्माण तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...