आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ गेला उडत... प्रतिष्ठा महत्त्वाची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आ वासून उभे असताना विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यावर विरोधी पक्ष जोरदार रान उठवतील, अशी सर्व जनतेची स्वाभाविक अपेक्षा होती. मात्र, जनतेच्या प्रश्नांऐवजी स्वत:च्या तथाकथित प्रतिष्ठेचा मुद्दा कळीचा करून विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी विधिमंडळाच्या आवारात पोलिस अधिकार्‍याला मारहाण करत केलेले वर्तन उद्वेगजनकच म्हणावे लागेल. एरवी स्वत:च्या सुसंस्कृततेचे गोडवे गात नाकाने कांदे सोलणार्‍या मराठी माणसाची मान त्यामुळे खाली गेली आहे.
कधी नव्हे एवढा भीषण दुष्काळ, पाणीटंचाई, महागाई, ढासळती कायदा सुव्यवस्था असे एक ना अनेक मुद्दे अधिवेशनाच्या तोंडावर खरे तर विरोधकांकडे होते. परिणामी आपल्या भात्यातील ही एक-एक अस्त्रे काढून सत्ताधार्‍यांना जेरीस आणले जाईल. जेणेकरून सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेला आलेली सुस्ती उडेल. काही प्रमाणात का होईना या प्रश्नांची तीव्रता कमी करण्याच्या हालचाली ताबडतोब सुरू होतील, अशी भाबडी आशा महाराष्ट्रातील जनतेला होती. तथापि, प्रत्यक्षात मात्र सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणापेक्षाही विरोधकांनी आपली नालायकी सिद्ध करण्याचाच विडा या निमित्ताने उचलला आहे की काय, असा प्रश्न एकंदर परिस्थिती पाहिल्यावर पडल्यावाचून राहात नाही. कारण, अधिवेशनाच्या प्रारंभी राज ठाकरे यांनी थेट विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनाच टार्गेट केले. राज यांनी विरोधी पक्ष नेत्यांवर जाहीरपणे केलेले ‘सेटलमेंट’चे आरोप आणि खडसेंसह भाजपच्या नेतेमंडळींनी त्यावर केलेला पलटवार यामुळे राजकीय माहोल तापला; परंतु सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याऐवजी विरोधकच परस्परांविरोधात सरसावल्याचे चित्र त्यातून प्रकर्षाने पुढे आले अन् विरोधाचे अस्त्र बोथट झाले.
तशातच राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाण्याच्या पूर्वसंध्येला एका पोलिस अधिकार्‍यावर सभागृहाच्या आवारात हात उचलण्यापर्यंत काही आमदारांची मजल गेली. विशेष म्हणजे, या प्रसंगामध्येही विरोधी पक्षाच्या आमदारांचीच नावे आली. संबंधित अधिकार्‍याने उद्दाम वर्तन केले आणि असभ्य भाषा वापरली असा दावा प्रथम या आमदारांनी उच्चरवाने केला; परंतु लक्षावधी लोकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या लोकप्रतिनिधींकडून झालेले हे वर्तन कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी अशोभनीय म्हणावे असेच आहे. कारण, प्रथमदर्शनी तरी यातून पुढे येते ती संबंधित लोकप्रतिनिधींची मानसिकता. संबंधित अधिकार्‍याने उद्दाम वर्तन केले असे वादासाठी गृहीत धरले तरी मारहाणीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. बरे, या अधिकार्‍याचा गुन्हाही काय, तर म्हणे भरधाव वेगाने निघालेल्या आमदार महोदयांच्या ‘व्हीआयपी’ मोटारीस हटकणे. ज्या रस्त्यावर मुळात वेगमर्यादा ताशी 50 किलोमीटर एवढी निर्धारित करण्यात आली आहे, तेथे ही मोटार त्यापेक्षा दुपटीहून अधिक वेगाने पळत असल्याचे निदर्शनास आल्याने चालकाला हटकल्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे. तर मोटारीमध्ये आमदार क्षितिज ठाकूर हे स्वत: असल्याची जाणीव करून दिल्यावरही सूर्यवंशी यांनी आपला हेका सोडला नाही, उद्दाम वर्तन केले अशी ठाकूर समर्थकांची भूमिका आहे. याच मुद्द्यावरून सभागृहात सूर्यवंशी यांच्याविरोधात हक्कभंगाची तक्रार दिली गेली. विधानभवन परिसरात आलेल्या सूर्यवंशी यांना त्याची कल्पना दिली असता त्यांनी असभ्य वर्तन केले व त्यामुळे प्रकरण हातघाईवर आल्याचे ठाकूर आणि त्यांच्याबाजूने उतरलेल्या आमदारांचे म्हणणे आहे, पण हा विषय ठाकूर यांच्या व्यक्तिगत वादाशी संबंधित असताना अशाप्रकारे हक्कभंगाची तक्रार देणे कितपत संयुक्तिक आहे, येथपासून खरे तर प्रश्न उपस्थित होतात. त्यातही आमदार आहे म्हणून नियमभंग केला तरी हटकायचे नाही का ? त्यात अभिमान, स्वाभिमानाचा काय प्रश्न येतो ? उलट अशी कारवाई करणार्‍या अधिकार्‍याची प्रशंसा व्हायला हवी, पण त्याऐवजी बहुजन विकास आघाडीचे ठाकूर यांच्यासोबत शिवसेना, भाजप, मनसे या पक्षाच्या काही आमदारांनी एकत्र येत सूर्यवंशी यांना ‘टार्गेट‘ करणे हा जनतेच्या प्रश्नांपेक्षा वृथा अभिमानात नेते म्हणवून घेणार्‍या या मंडळींना किती स्वारस्य आहे, त्याचा दाखलाच समजावा लागेल.
सध्या राज्याचा कारभार ज्या निष्क्रिय पद्धतीने चालवला जात आहे, त्या परिस्थितीत खरे तर विरोधकांची जबाबदारी आणखीन वाढते; परंतु अनेकदा याचे कुठलेही भान त्यांच्याकडून ठेवले जात नसल्याचे काही काळापासून वारंवार प्रत्ययास येते. किंबहुना, त्यामुळेच सत्ताधारी अधिकाधिक बेफिकीर बनत आहेत. हाणामारीचा हा प्रसंग म्हणजे तर त्यावर कळसच म्हणावा लागेल. कारण, त्यामुळे विरोधकांना बचावात्मक पवित्रा स्वीकारणे भाग पडले आहे. त्याचा लाभ सत्ताधार्‍यांना आपसूकच होण्याची चिन्हे आहेत. कारण, या प्रकरणाचा झालेला बभ्रा, त्यातून संबंधित आमदारांचे झालेले निलंबन, कुणाकुणाच्या अटकेची शक्यता या सार्‍या कोलाहलात जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा आवाज मात्र क्षीण झाला आहे. सत्ताधारी असोत की विरोधक; लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अधिक जबाबदारीने वर्तन करणे अपेक्षित आहे.
abhijit.k@dainikbhaskargroup.com