आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायस्पीड ट्रेन : विकास व वेगाचे नवे पर्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे नवे रोजगार निर्माण होतील. या मार्गाच्या बांधणीसाठी सुमारे २० हजार बांधकाम मजुरांची गरज आहे. जेव्हा या प्रकल्पाच्या उभारणीला वेग येईल व रेल्वे प्रत्यक्ष धावायला लागेल तेव्हा या मार्गाची देखरेख व व्यवस्थापन सांभाळण्यासाठी ४ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे सुमारे १६ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत

अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मुंबई 
अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (एमएएचएसआर) प्रकल्पाचे उद््घाटन आज अहमदाबाद येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो अाबे यांच्या हस्ते होत आहे. हा दूरदर्शी प्रकल्प सुरक्षितता, वेग व लोकसेवेच्या दृष्टिकोनातून एका नव्या युगाचा प्रारंभ करत आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेसाठीही त्यांचा विस्तार, वेग व कौशल्यप्रधान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नेतृत्व देणारा प्रकल्प आहे. 
सध्याच्या रेल्वे अपघाताच्या घटना पाहता अशा महागड्या बुलेट ट्रेन प्रकल्पांची गरजच काय, असा प्रश्न काही विरोधक उपस्थित करतील. पण या विरोधकांना बुलेट ट्रेनमुळे होणारे व्यापक फायदे सांगितल्यास त्यांचा विरोध मावळेल.

या प्रकल्पाच्या दृष्टीने एक बाब समजून घेतली पाहिजे ती ही की, वेगवान रेल्वेमुळे जे जाळे तयार होते त्यासाठी पायाभूत सोयींची गरज असते. अशा पायाभूत सोयींमध्ये अशा प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होत असते. आजपर्यंतच्या अनेक प्रकल्पांमधील गुंतवणूक व व्यावहारिकता लक्षात घेता अशा गुंतवणुकीमुळे आर्थिक विकासाला एक प्रकारे गती मिळत असते, हे दिसून आले आहे. 

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतील भूगोल व पर्यावरण विभागातील डॉ. गॅब्रियल अल्फेल्ड््ट यांनी सादर केलेल्या संशोधन अभ्यासात असे दिसून आले आहे की, वेगवान रेल्वे धावणाऱ्या रेल्वेमार्गामुळे अन्य रेल्वे मार्गांच्या तुलनेत नवी शहरे जोडली जातात व त्यातून या शहरांचा जीडीपी २.७ टक्क्यांनी वाढत जातो. त्यांचे असेही म्हणणे आहे की, हायस्पीड ट्रेन व बाजारपेठ यांचा सरळ संबंध असून तो जीडीपी वृद्धीशी निगडित असतो. बाजारपेठेशी संलग्न जीडीपी जर एक टक्क्याने वाढत असेल तर हायस्पीड ट्रेनमुळे त्यात ०.२५ टक्के इतकी भर पडते.   

दुसरी गोष्ट अशी की, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे नवे रोजगार निर्माण होतील. या मार्गाच्या बांधणीसाठी सुमारे २० हजार बांधकाम मजुरांची गरज आहे. जेव्हा या प्रकल्पाच्या उभारणीला वेग येईल व रेल्वे प्रत्यक्ष धावायला लागेल तेव्हा या मार्गाची देखरेख व व्यवस्थापन सांभाळण्यासाठी ४ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे सुमारे १६ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. त्यामुळे जे टीकाकार रोजगारच्या मुद्द्यावरून सध्याच्या सरकारवर टीका करताना दिसतात त्यांनी सर्वात मोठी गुंतवणूक व चांगला रोजगार निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाचे कौतुक केले पाहिजे. हायस्पीड रेल्वे (एचएसआर)मधील रोजगारनिर्मितीबाबत स्पेनचे उदाहरण आपण पाहण्याची गरज आहे. युरोपमध्ये सर्वात जास्त हायस्पीड रेल्वे निर्माण प्रकल्प बांधण्यात स्पेन अग्रेसर आहे. २००८ मध्ये स्पेनमधील कंपन्यांनी रेल्वे सेक्टरला साधनसामग्री व सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे १ लाख १६ हजार रोजगार उपलब्ध करून दिले होते.

तिसरा मुद्दा बुलेट ट्रेन मार्गावरचा प्रदेश व तेथील जमीन यांचा आहे. या भागातील नागरी वस्त्यांना व जमीन मालकांना या प्रकल्पाचा अधिक व्यावहारिक फायदा आहे. या प्रकल्पाच्या परिघात येणारी शहरे व गावांमध्ये व्यापाऱ्याच्या दृष्टीने नव्या संधी निर्माण होणार आहेत. शिवाय मार्गावरील स्थानके व  भविष्यकाळात होणारी स्थानके व त्यांचा परिसर यांच्या विकासालाही मोठा वाव आहे.

जपानच्या शिंकासेनचा अनुभव हेच सांगतो की, हायस्पीड रेल्वेमुळे अन्य शहरांच्या तुलनेत या प्रकल्पात येणाऱ्या शहरांचा विकास जलद होतो. उदाहरणार्थ हायस्पीड रेल्वेस्थानकांमधून स्थानिक सरकारला सुमारे १५५ टक्के अधिक महसूल मिळतो. पण ज्या भागातून हायस्पीड ट्रेन धावत नाही तेथे महसुलाचे प्रमाण केवळ ७५ टक्के इतके आहे. 

चौथी बाब म्हणजे हायस्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ वाचतो व या ट्रेनची विश्वासार्हताही चांगली आहे. म्हणजे रस्ते परिवहन व परंपरागत रेल्वेमार्गापेक्षा हायस्पीड ट्रेनमुळे सुमारे ७० टक्के वेळ वाचतो. बीसीडी या कन्सल्टिंग ग्रुपने केलेल्या अभ्यासानुसार २०० ते ८०० किमी अंतरावरील हायस्पीड ट्रेनने केलेला प्रवास हा विमान प्रवासापेक्षा अधिक फायदेशीर अाहे. वेगवान रेल्वेमध्ये बोर्डिंगसाठी केवळ आठ ते दहा मिनिटांचा कालावधी पुरेसा असतो तर विमान प्रवासासाठी बोर्डिंग, टॅक्सी व टेक ऑफ टाइममध्ये सुमारे १ तासाहून अधिक वेळ जातो. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड ट्रेनबाबत बोलायचे झाल्यास, मुंबई-साबरमतीपर्यंतचा प्रवास पारंपरिक रेल्वे किंवा रस्तेमार्गाने जाण्यासाठी लागणारा ८ तासांचा वेळ कमी होऊन दोन तास होईल. तसेच हायस्पीड रेल्वे प्रणाली परिणामकारक आणि विश्वासार्ह आहे. कारण यात फार गर्दी किंवा विलंब होण्याची शक्यता नाही. मुंबई विमानतळावर महत्त्वाच्या वेळी मोठ्या संख्येने फ्लाइट असल्यामुळे वारंवार गर्दीची स्थिती उद््भवते. एचएसआर सिस्टिम ही खराब हवामानामुळे फार कमी वेळा प्रभावित होते. शिंकासेन यांच्या अनुभवानुसार, तेथे विलंबाचा अवधी मिनिटभरापेक्षाही कमी आहे. त्यावरून तेथे वक्तशीरपणात मोठी मजल मारली गेली आहे, हे दिसून येते. पण क्षमता वाढवण्यासाठी हायस्पीड रेल्वे नेटवर्क तितकेच विश्वासार्ह आहे. वेग वाढल्याने प्रवास लवकर होतो, यामुळे प्रवासीसंख्या वाढते. तसेच दररोजच्या एकूण प्रवासी संख्येतही वाढ होईल.

सुरक्षा आणि पर्यावरणासाठीही ही प्रणाली फायद्याची आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जपानी शिंकासेन डिझाइनवर आधारीत आहे. पन्नासहून अधिक वर्षांहून या रेल्वेच्या संचालनात बिघाड होऊन प्रवासी मृत्युमुखी पडल्याचे प्रमाण शून्य आहे. म्हणजेच एवढ्या वर्षात कोणत्याच प्रवाशाला इजा झालेली नाही.

एमएएचएसआर प्रकल्पात परिवहनाच्या इतर साधनांच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होते. विमानाच्या तुलनेत प्रति किलोमीटर वायूचे उत्सर्जनही एक चतुर्थांश आणि कारच्या तुलनेत दीड तृतीयांश आहे. पाचवा मुद्दा म्हणजे, या प्रकल्पाला खर्च कमी आणि फायदे जास्त आहेत. पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या भागांसाठी कर्ज घेऊन निधी पुरवला जातो. तसेच एकूण निधीत याचा मोठा वाटा असतो. भारत-जपान करारानुसार, जपान सरकार ०.१ टक्क्यांच्या तुटपुंज्या व्याजदरावर ८८ हजार कोटींचे सॉफ्ट लोन देणार आहे. कर्ज घेतल्यानंतर १५ वर्षांनी वसुली सुरू होईल. म्हणजेच व्यावहारिकदृष्ट्या हे नि:शुल्क म्हणावे लागेल. हे व्याज फार तर ७-८ कोटी रुपये प्रति महिना एवढे असते.

एकूणच, दूरदृष्टी असलेल्या मेक इन इंडिया योजनेतील हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सर्व माहिती आणि संशोधनाअंती हेच स्पष्ट होते की, एचएसआर प्रकल्पाचे फायदे हे नुकसानापेक्षा जास्तच आहेत. प्रकल्पाला विरोध करणारे सवयीतून किंवा अपरिहार्यतेतून विरोध दर्शवत आहेत. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टला सुरुवात म्हणजे भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होय. हा क्षण उत्सव साजरा करण्याचाच आहे.

- तुहीन ए सिन्हा, प्रसिद्ध स्तंभलेखक
बातम्या आणखी आहेत...