आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराज्याचे उद्गगाते शहाजीराजे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहाजीराजांनी शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी जी मदत केली ती फार मोलाची होती. महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना शहाजीराजांनीच शिवरायांना दिली होती. शिवरायांनी आपल्या वडिलांच्या आदर्शाचा धडा संपूर्ण जगाला घालून दिला. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांची आज जयंती. त्यानिमित्त...

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ या ऐतिहासिक गावाचा लौकिक असा आहे की, छत्रपतींच्या वंशजाची सुरुवात येथून झालेली आहे. वेरूळने संपूर्ण महाराष्ट्र राज्य घडवले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. वेरूळच्या बाबाजी भोसलेंची पुढची पिढी खूप कर्तव्यदक्ष, संरक्षणदक्ष निर्माण झाली. अन्यायाचा प्रतिकार करणा-यांचा वारसाच येथून निर्माण झाला.

‘समशेरी तळपू लागल्या रणी
सूर्याप्रमाणे तेज शहाजी नयनी
स्वराज्य संकल्प बांधला मनी
शहाजीराजांनी...’

वेरूळ गावाची पाटीलकी बाबाजींकडे होती. बाबाजी भोसलेंना दोन मुले, मालोजी आणि विठोजी. मालोजी हे थोरले तर विठोजी धाकटे पुत्र होते. मालोजी आणि विठोजी दोघेही कर्तबगार लढवय्ये होते. त्यांच्या पदरी अनेक सरदार आणि हत्यारबंद मराठा सैन्य होते. हा काळच लढायांचा होता. निझामशाहीवर उत्तरेच्या मोगल बादशहाने स्वारी केलेली होती. दौलताबाद निझामशहाची राजधानी होती. मलिक अंबर हा त्यांचा वजीर होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूची कर्तबगारी पाहिली. त्याने निझामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली होती.

स्वराज्य संकल्पक शहाजीराजांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी वेरूळ येथे झाला. शहाजीराजे 5 वर्षांचे असताना मालोजीराजांना इंदापूरच्या लढाईत वीरमरण प्राप्त झाले. मालोजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा सांभाळ विठोजींनी केला. पुढे सिंदखेडच्या लखोजी जाधवांची मुलगी जिजाई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे विवाह सोहळा पार पडला.
शहाजीराजांनी भोसले घराण्यात पूर्वीपासून वापरण्यात येणा-या पाच रंगांचे निशाण बदलून श्री शंभूमहादेवाचे प्रतीक म्हणून भगव्या झेंड्याच्या निशाणाला सुरुवात केली. 17 व्या शतकात आदिलशाहीचा आधारस्तंभ मुरारजगदेव तर निझामशाहीचा आधारस्तंभ शहाजीराजे होते. राजांनी मोगल आणि आदिलशाही सत्तांना तोंड देत शिवनेरी, जीवधन, खेडा, परसगड, माहुली यांसारखे किल्ले आणि आठ हजार फौजेसह 1633 ते 34 असे वर्षभर मुर्तझा निझामशहाला आपल्या मांडीवर बसवून निझामशाहीचा कारभार हाकला. याच वेळी त्यांनी पेमगडाला शहागड हे नाव दिले. यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज बांधता येतो. निझामशाही बुडताच शहाजीराजांनी पुन्हा एकदा स्वतंत्र सैन्यभरती सुरू केली. स्वराज्य संकल्पनेचे बीज याच वेळी रोवले गेले.

मोगल आणि आदिलशहाने एकत्र येऊन निझामशाही बुडवली. राजांनी 1636 मध्ये आदिलशहाची चाकरी पत्करली. तेव्हा विजापूरकरांनी त्यांचा यथोचित गौरव करून त्यांना ‘सरलष्कर’ हा बहुमान दिला. 1639 ला राजांनी बंगलोर जिंकून घेऊन आपला मुक्काम तेथे हलवला. बंगलोरला त्यांनी राजधानीसारखे सजवले. याचबरोबर त्यांनी म्हैसूर, जिंजी, वेलूर, मद्रास, तंजावर येथील हिंदू राजांना राजाश्रय देऊन कर्नाटकात स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. शहाजीराजे कुठेही असो, त्यांनी आपल्या जहागिरीतील परगणा सोडला नाही.


स्वत: परकीयांची चाकरी करीत असले तरी त्यांनी नेहमीच शिवरायांच्या कारभाराची दखल घेतली. एवढेच नाही तर त्यांचे आदिलशाहीतील वागणे म्हणजे एखाद्या सार्वभौम राजाला शोभेल असेच होते. त्यांच्या दिनचर्येचा अभ्यास केल्यानंतर हे दिसून येते. त्यानुसार सकाळची स्नानसंध्या उरकल्यानंतर राजांचा दरबार भरत असे. महाराज गंभीर रुबाबात प्रवेश करून सिंहासनारूढ होत व लोकांच्या अडीअडचणी सोडवत. कर्नाटकात असताना त्यांना दुस-या पत्नीपासून मुलगा झाला. त्याचे नाव व्यंकोजी. पुढे व्यंकोजीने कर्नाटकात आपले वर्चस्व निर्माण केले. शहाजीराजांनी शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी जी मदत केली ती फार मोलाची होती. महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना शहाजीराजांनीच शिवरायांना दिली होती. शिवरायांनी आपल्या वडिलांच्या आदर्शाचा धडा संपूर्ण जगाला घालून दिला.