आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्रुवबाळाचे बिघडले घड्याळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नारायण नारायण! का रे बाळ? असे कोपर्‍यात बसून का रडत आहेस तू? नारदमुनी बाळाजवळ येऊन उभे राहतात तसे बाळ अजून हमसून हमसून रडू लागते .
बाळ! सांगणार नाहीस का ? अरे, एवढे धाय मोकलून रडताना ध्रुवबाळानंतर तुलाच बघतो आहे इतक्या वर्षांनंतर. कोण तू, का रडतो आहेस असा? नारदमुनी पुन्हा पृच्छा करतात तसे बाळ रडायचे थांबते. ..
नारददादा! अरे , मला ध्रुवबाळापेक्षा चांगले पालक मिळाले आहेत, मी नशीबवान आहे.
मग? तरी तू दु:खी का? अन् ही तुझी भाषा का? अरे मला समस्त विश्वात असे अरे कारे करीत नाहीत. तुझी अशी दादागिरीसारखी भाषा? टग्याच दिसतो आहेस तू??
तसे बाळ पुन्हा हमसून हमसून रडू लागले.
अरे , अरे, अरे! तसे म्हणायचे नव्हते मला. आधी रडणे बंद कर बघू.
उं ... आम्ही नाही जा ..! तुम्ही जे आता म्हटले ना, तेच मला समस्त जनता म्हणत असते लाडाने ..!
लाडाने ? काही तरीच .
हो .! लाडानेच मुनीश्वर ..
लाडाने ..? कशावरून ..? नारदमुनी
म्हणजे काय ! समस्त राज्यात होर्डिंग्जवर लिहिलेले असते ना राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणून. आहात कुठे ?
नाही, मी इकडेच आहे बाळा. तुझ्या टग्या इमेजमुळे तुला घाबरतात सगळे. समजले ?
आम्ही नाही जा ...! असे लाडिक म्हणून बाळ पुन्हा रडू लागतो .
उगी उगी ...! आता रडतो का आहे ते तर सांगशील की नाही ?
मला काकाने की नाही, एक घड्याळ दिले होते सांभाळायला.
मग ...?
मग काय? ते बिघडले ...!
कसे ?
भिजले.
मग काका रागावले. हो नं?
हो ...!
अरे, वस्तू बिघडली की वडील मंडळी रागावणारच नं ...!
पण त्यांनी तर सांगितले होते की घड्याळ वॉटरप्रूफ आहे ...! पाण्यात टाकले तरी बिघडणार नाही.
मग ...? तरी बिघडले ...?
हो ना ....!
नक्की पाण्यातच टाकले नं, की आणखी कुठे भिजवलेस?
नारदमुनींनी असे म्हटले आणि बाळ अजूनच जोराने रडायला लागले ....
असे बघ बाळ, वडिलांनी दिलेली वस्तू जपूनच वापरायला हवी ना ? अशी कशा कशात बुडवून खराब करू नये. हो की नाही?
तसे बाळ नाराज होते, कपाळावर आठ्या पडतात आणि पुन्हा फुगून बसते.
अरेच्चा, फारच व्रात्य आहेस बाळ तू. तुला काही समजावून सांगायचे तर आमच्यावरच नाराज होतोस तू ....! फारच लाडावलेला दिसतो आहेस हां ...! नारदमुनी त्राग्याने ‘थांब तुझ्या काकालाच सांगतो बघ...!
नको नको, माझ्या तक्रारी सबंध राज्यातून जात आहेत, तुम्ही कशाला भर घालता अजून देवर्षी ...?
बरं बरं, नाही जात. मात्र मला वचन दे, यापुढे तू मौल्यवान वस्तू नीट सांभाळशील.
काय तरी कटकट आहे, असे पुटपुटत बाळ वचन देतो, पण एवढे घड्याळ नीट करून द्या न देवर्र्षी ....!
बघू ...! प्रयत्न करतो बुवा ...! वॉरंटी आहे ना ...?
वॉरंटी एक वर्षाचीच होती आणि आता तर ९ वर्षे झाली आहेत देवर्षी ....!
अरे देवा, मग कठीण आहे. नको त्या वेळी बिघडवलेस घड्याळ ...
नको त्या वेळी म्हणजे? बाळ
अरे, बाबा निवडणुका जवळ आल्यात ना? तेव्हा आता वॉरंटी / गॅरंटी दोन्हीही नाही ....! आता काकांनी काही चमत्कार केला तरच ....! नारायण, नारायण .......! असे म्हणत देवर्षी अंतर्धान पावतात ........!