आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comment On Shiv Sena And Uddhav Thackeray By Prashant Dixit, Divya Marathi

ठाकरी आत्मविश्वास की वृथा अभिमान? ( प्रशांत दीक्षित)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीतील भरघोस मतांनी मिळालेला विजय शेवटी युतीच्या मुळावर आला. शिवसेना-भाजपच्या मतांना लोकसभेत एकदम भरती आली आणि या भरतीचे श्रेय कोणाला हा वाद उभा राहिला. त्याचबरोबर या भरतीवर स्वार होऊन मुख्यमंत्रिपद मिळविण्याची स्वप्ने नेत्यांना पडू लागली. स्वप्नात फारच मश्गुल झाल्यामुळे वास्तवाचे भान सुटले आणि भाषा आत्मविश्वासाची असली तरी त्यातून वृथा अभिमान डोकावू लागला.

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसमोर केलेले भाषण आवेशपूर्ण असले तरी तो आवेश लोकसभेप्रमाणे विधानसभेतही शिवसेनेच्या बाजूने भरतीची लाट आणेल का, या प्रश्नाचे उत्तर देणे कट्टर उद्धवप्रेमींनाही कठीण जाणार आहे. ठाकरी अभिनिवेश हा नेहमीच वस्तुस्थितीशी फारकत घेऊन राहिलेला आहे आणि म्हणूनच शिवसेनेला कधीही स्वबळावर सत्ता आणता आलेली नाही. आकडेवारीशी सेनेचे कधी जुळत नाही. भावनांचे राजकारण त्यांना भावते, कारण त्यामध्ये वस्तुस्थितीची कशीही उलटापालट करता येते. पण महाराष्ट्रात विधानसभेतील मतांच्या संख्येकडे पाहिले तर ठाकरी आवेशाने कधीही १६ टक्क्यांच्यावर उडी मारलेली नाही हे कळून येते. भाजपही याला अपवाद नाही. भाजपही १३ ते १५ टक्क्यांहून अधिक मते घेऊ शकलेला नाही.

२००९च्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले तर सेनेला १५.३ टक्के मते मिळाली तर भाजपला १३.९टक्के. दोघांची बेरीज २९.२ टक्के होते. १९९५चा अपवाद वगळला तर जवळपास याच पद्धतीने मते पडलेली दिसतात. दुस-या बाजूला काँग्रेस व राष्ट्रवादीची मते ३८.९वर पोहोचतात.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार झाला. या निवडणुकीत सेना-भाजपची मते एकदम ४८ टक्क्यांवर पोहोचली. काँग्रेस-राष्ट्रवादीची मते ३४ टक्क्यांवर आली. युतीच्या मतांमध्ये झालेली जवळपास २० टक्क्यांची वाढ कुणामुळे हा कळीचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे यांच्या मते ही वाढ शिवसेनेमुळे झाली आहे तर भाजपच्या मते हा मोदींचा करिष्मा आहे. आणि भाजपच्या म्हणण्यात तथ्य असावे. कारण या मतांचे विभाजन केले तर भाजपच्या पारड्यात २७.३ टक्के मते पडलेली दिसतात तर शिवसेनेकडे २०.६ टक्के मते आली. म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मते फक्त पाच टक्क्यांनी वाढली तर भाजपची तब्बल १४टक्क्यांनी. कोणत्याही निवडणुकीत १४ टक्के ही जबरदस्त वाढ मानली जाते. ही वाढ मोदी यांच्या करिश्म्यामुळे आहे असे देशातील सर्व निवडणूक तज्ज्ञ मान्य करतात. उद्धव ठाकरे यांना मात्र ते मान्य नाही. त्यांच्यामते हा ठाकरे घराण्याचा करिश्मा आहे.

प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे स्वत:च्या हिमतीवर शिवसेनेची मते दुपटीहून अधिक करणार आहेत का? मोदींनी देशस्तरावर जे करून दाखविले ते उद्धव महाराष्ट्र स्तरावर करू शकतील का? त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतून त्यांच्यात तशी क्षमता दिसते का?
उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणाला मतांच्या वस्तुस्थितीची बैठक नव्हती. त्यांनी भावनिक आवाहन केले व शेवटी नशीबात असेल ते होईल अशीही भाषा केली. त्यांचे आवाहन शिवसैनिकांना कदाचित पटले असेल पण जनतेला पटेल का? जनता मोदींकडे पाहून मतदान करणार की ठाकरेंकडे हा युती तुटल्यास महत्वाचा प्रश्न राहणार आहे. जनता या दोघांवरही नाराज होऊ शकते, पण त्या नाराजीचा फायदा उठविण्याची क्षमता सध्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाही. यामुळेच वृथा अभिमान हा आत्मविश्वास म्हणून गणला जात आहे.