आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगीत व्रतस्थ!(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लख्ख प्रकाशानं उजळलेला, धुपाचा सुगंध लपेटत विलग होणारा पडदा, विंगेतला काळोख, धूसर दिसणारे प्रेक्षागृह आणि तनामनात ओतप्रोत भरलेले संगीत नाटक. वास्तवाचे भान त्या क्षणी हरपते आणि कल्पनेतले कुण्या नाटककाराच्या नायिकेचे भावविश्व त्या क्षणाचे वास्तव बनते. मग ती नायिका कुणीही असो... सुभद्रा, रुक्मिणी, भामिनी, सिंधू, वसंतसेना, देवयानी, शारदा... तिचे जगणे, तिचे भावविश्व, तिच्या व्यथावेदना, आनंद एका प्रसन्न, चिरतरुण स्वरातून आणि अभिनयातून व्यक्त होताना रसिकांचे भान हरपते. हा अनुभव सतत अर्धशतकाहून अधिक काळ देणा-या जयमालाबाई शिलेदार यांचे वर्णन संगीत नाटकांच्या परंपरेतल्या लास्ट ऑफ द रोमन्स, असेच करावे लागेल. संगीताची मनस्वी आवड असणा-या कलाप्रेमी पित्याच्या पोटी लाभलेला जन्म, देखणे-सात्त्विक रूप, लय-ताल-सुरांशी जन्मजात सख्य, बुजुर्गांकडून मिळालेले गायनाचे मार्गदर्शन, नटसम्राट बालगंधर्वांचा सहवास आणि आशीर्वाद आणि ऐन तारुण्यात लाभलेली जयराम शिलेदार या उत्तम गायक-नटाची साथ... हे सारे पाथेय मिळून जयमालाबाईंची जडणघडण झाली. जोडीला विनम्र, निगर्वी, संस्कारसंपन्न स्वभावामुळे क्वचितच कुणाला मिळणारे अजातशत्रूपण.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नित्य गायनसेवेला बसणारे उस्ताद भूर्जीखाँ, गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकरांचे मार्गदर्शन, पं. गोविंदराव टेंबे, मास्तर कृष्णराव अशा बुजुर्गांकडून मिळालेले संगीतकलेचे धडे अगदी किशोरवयापासून जयमालाबाईंनी केवळ कंठगत नाही, तर आत्मगत केले आणि आपल्या प्रतिभेने स्वत:ची अशी लालित्यपूर्ण सुकुमार गायकी घडवली. संगीत नाटकाच्या प्रयोगात नाट्यपद गात असताना रागमिश्रणे करूनही मूळ रागात अलगद प्रवेश करत सम गाठण्याची महाकठीण किमया त्यांनी सहजतेने साधली. नायिकेच्या स्वभावधर्मानुसार त्यांनी आपली गायकी बदलली- कधी ती सुभद्रेसाठी हळुवार झाली, रुक्मिणीसाठी खानदानी, भारदस्त बनली, भामिनीसाठी नखरेल झाली, रेवती साकारताना मिश्कील, थट्टेखोर बनली, सिंधूसाठी करुणार्द्र झाली, देवयानीसाठी तेजस्वी बनली, द्रौपदीसाठी धारदार बनली, कान्होपात्रेसाठी भक्तिरसात न्हाऊन निघाली. संगीत नाटकांमधले हे कलापूर्ण बारकावे जयमालाबाईंनी अचूक टिपले आणि ते अधिक सुंदर करून आपल्या गाण्यातून आणि अभिनयातून रसिकांसमोर मांडले. सुमारे 65 वर्षांची प्रदीर्घ कलाकारकीर्द त्यांनी गाजवली ती संवेदनशील अभिनयाने आणि प्रसन्न, सुरेल गायनाने. या काळात 46 नाटकांतून 52 भूमिका त्यांनी साकारल्या आणि तब्बल 16 संगीत नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले. नटराजाला केलेले हे नमन खरोखरच विस्मयकारक म्हटले पाहिजे. त्यांनी सौभद्र, शाकुंतल, मानापमान, स्वयंवर, शारदा, मृच्छकटिक, विद्याहरण, एकच प्याला, संशयकल्लोळ, कान्होपात्रा, द्रौपदी अशी पारंपरिक आणि गंधर्वांची सुवर्णमुद्रा उमटलेली संगीत नाटके जशी श्रद्धेने केली, त्याच निष्ठेने सोन्याचा कळस, वेशांतर, बाजीराव मस्तानी, महाकवी कालिदास, मंदारमाला आदी नवी नाटकेही आवर्जून केली. त्या नाटकांच्या व्यावहारिक यशापयशाचा परिणाम त्यांनी आपल्या अभिनय आणि गाण्यावर होऊ दिला नाही. त्यामुळेच जयमालाबाईंचे गाणे त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षातही तसेच सुरेल होते.

निर्मळ आकार, नाट्यपद गात असल्याचे भान, गाताना भूमिकेनुरूप अभिनय ही तर त्यांची वैशिष्ट्येच होती. नाटकात काम करणे थांबवल्यावरही शिष्यांना तालीम देताना त्यांची ही वैशिष्ट्ये कायम राहिली. कुठलेही विशिष्ट वळण त्यांनी आवाजाला पडू दिले नाही. त्यामुळेच त्या त्या भूमिकेच्या मानसिकतेचे गाणे त्या मांडू शकल्या. स्वत:च्या लग्नाआधी मराठी रंगभूमी या आपल्या संस्थेचा संसार त्यांनी मांडला आणि सारख्याच कौशल्याने, निष्ठेने, प्रेमाने नाट्यसंसार आणि घरसंसार चालवला. कीर्ती आणि लता या दोन्ही उत्तम कलावती कन्यांच्या हाती संगीत नाटकांचा वसा सोपवून त्या नव्या पिढीतले ताज्या दमाचे तरुण स्वर तयार करण्यात गुंतल्या. बालगंधर्वांना दैवत मानून त्या आपल्या कुटुंबीयांसह बालगंधर्वी संस्कृतीच्या पाईक बनल्या. गंधर्वी नाटकांची पताका त्यांनी वारक-याच्या निष्ठेने खांद्यावर पेलली आणि गेली सत्तर वर्षे संगीत नाटकांचीच वारी केली. ध्यानीमनी नाट्यसंगीत जपले. स्वत्व जपून योग्य तिथे आणि तेवढाच नव्याचा स्वीकार केला. अभिजात संगीताच्या शिक्षणाला लालित्याची मर्यादा घालून नाट्यपरिपोषासाठी त्याचा कलात्मक उपयोग त्यांनी केला.

अभिजात गायकी अवगत असूनही नाट्यपदात त्याचा विस्तार न आणता, फुलाच्या अत्तराप्रमाणे त्यातले सुगंधतत्त्व घेऊन निखळ, निर्मळ आनंदाचे गाणे त्या गात राहिल्या. प्रत्येक प्रयोगात, प्रत्येक मैफलीत स्वरांची नवी रांगोळी रेखत गेल्या. नाट्यसंसार उभा करत असताना कष्टांची जंगले तुडवली, अवहेलना, अपमान सोसले, कुचेष्टा सहन केली; पण संगीत नाटकाची उपासना व्रतस्थपणे केली. या वाटेत कालांतराने सन्मानाचे, पुरस्कारांचे, प्रतिष्ठेचे क्षण लाभले, तेही विनम्रतेने स्वीकारले. आपण काही मोठे केले, हा भाव त्यांच्या वागण्यात, बोलण्यात कधीच डोकावला नाही. ‘मस्तकावर झळाळणारं रत्नखचित आभाळ आणि अंतर्यामी तेवणारा नैतिक जाणिवेचा नंदादीप, या दोन गोष्टी मला नतमस्तक होण्यास भाग पाडतात’ या वचनाचा यथोचित अर्थ जयमालाबाईंनी जपला. जयमालाबाईंच्या पार्थिव नसण्याने हा अर्थ कधीच थांबणार नाही, कारण त्यांच्या गाण्यासारखाच तो पिढ्यापिढ्यांतून झुळझुळत राहणार आहे. त्यांचे पुष्पपरागसुगंधित गाणे आणि अभिनय नव्या कलाकारांवर अभिसिंचित होत राहणार आहे.