आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये अकरा विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी उत्तेजक द्रव्य घेतल्याचे सिद्ध झाले! ही एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक घटना आहे. या स्पर्धा राष्ट्रीय शालेय क्रीडा संघटना आणि शिक्षण संचालक (क्रीडा खाते) यांनी एकत्रितपणे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत उत्तर प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रामधल्या शाळा सहभागी झाल्या होत्या. सगळे स्पर्धक हे चौदा ते एकोणीस या वयोगटातले शालेय विद्यार्थी होते. या पार्श्वभूमीवर ही बातमी अधिकच गंभीर बनते. कोवळ्या वयातली शाळकरी मुले स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब करतात, ही विषण्ण करणारी घटना आहे. या घटनेचा कौटुंबिक, सामाजिक आणि प्रशासकीय पातळ्यांवर सखोल विचार करून त्यावर योग्य ती उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर नजीकच्या भविष्यात ही समस्या अत्यंत गंभीर रूप घेऊन कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य विस्कळीत करू शकते. एक संपूर्ण पिढी दुर्बल बनवू शकते. यापुढे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सर्वप्रथम उमलत्या वयातली ही मुले स्पर्धेतली आपली कामगिरी उंचावण्यासाठी या मार्गाला का गेली असावीत याचा विचार करणे गरजेचे आहे.
आज आपल्या देशात सर्वच क्षेत्रांत पूर्वी कधीही नव्हते एवढे स्पर्धात्मक वातावरण आहे. जो स्पर्धेत जास्त यशस्वी होणार त्याला जास्त भौतिक सुखे मिळणार, असे संपूर्ण समाजाने गृहीत धरले आहे आणि हेच कोवळ्या वयातल्या मुलांवरसुद्धा कळत नकळत बिंबवले जाते आहे. विशेष म्हणजे हे मुलांच्या मनावर बिंबवण्यात त्यांच्या पालकांचा सर्वात जास्त हात आहे. मुळात ‘पालकत्व’ या संकल्पनेबाबतच आजच्या सुशिक्षित समाजातसुद्धा संभ्रम आहे. पालकत्व म्हणजे मुलाच्या अर्भकावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत त्याला योग्य तो शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक आधार देत वाढवणे आणि त्याला त्याचे पुढचे आयुष्य योग्यपणे आणि जबाबदारीने जगण्याची क्षमता देणे! पारंपरिकरीत्या, सुशिक्षित मध्यमवर्गामध्ये मुलांना मोकळेपणा देऊन त्यांच्या योग्य त्या मागण्या पुरवत त्यांना समाधानी ठेवून वाढवले जाते. मुलांशी सुसंवाद ठेवला जातो. या संवादातूनच मुलांची विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली जाते आणि तिला योग्य ती दिशासुद्धा दिली जाते. परंतु आजच्या मध्यमवर्गीय पालकांच्या स्वत:च्या भौतिक गरजा वाढल्या आहेत. त्या पुरवण्यासाठी त्यांना आपल्या व्यावसायिक आयुष्यात खूप जास्त वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ते आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. ब-याच वेळा जेव्हा मुलांना त्यांची गरज असते तेव्हा ते शारीरिक किंवा भावनिकदृष्ट्यासुद्धा मुलांबरोबर नसतात, तर ते स्वत:च्याच वैयक्तिक आयुष्यात गुंतलेले असतात. ते मुलांच्या भावनिक मागण्यांना प्रतिसाद देऊ शकत नाहीत. इथेच मुलांचा आपल्या पालकांबरोबरचा संवाद कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच मुलांच्या मनामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय याबद्दल संभ्रम निर्माण होतो. याच वेळी आपण मुलांना पुरेसा वेळ देत नाही, ही अपराधीपणाची भावना पालकांमध्ये असते. त्यामुळे मग मुलांच्या भौतिक गोष्टींच्या अवाजवी मागण्या पुरवल्या जातात. यामुळेच मुलांच्या मनामध्ये चंगळवादाची बीजे नको इतक्या लहान वयात रुजली जातात. आपल्या या गरजा भागवण्यासाठी आपल्या आयुष्यातसुद्धा आपण या स्पर्धात्मक जगात यशस्वी व्हायलाच हवे, हे मुलांच्या मनात कोवळ्या वयातच बिंबवले जाते. यातूनच मग ‘यशासाठी वाट्टेल ते’ ही मनोवृत्ती तयार होते आणि या मनोवृत्तीतूनच स्पर्धा जिंकण्यासाठी उत्तेजक द्रव्ये घेतली जातात.
उत्तेजक द्रव्यांमध्ये टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल, स्टेनोझोलॉल, नानड्रोलोन यासारखी रासायनिक संयुगे प्रमुख्याने असतात. ही रासायनिक संयुगे शरीराला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त चांगले काम करण्यासाठी जास्तीची ऊर्जा पुरवतात. परिणामी स्पर्धकाची त्या स्पर्धेतली कामगिरी उंचावू शकते. परंतु ही कृत्रिम ऊर्जा शरीरावर अत्यंत गंभीर अपायकारक परिणाम करते. त्यामुळे मुलांच्या मज्जासंस्थेपासून लैंगिक विकासापर्यंत कायमस्वरूपी दुष्परिणाम होऊ शकतात.
यशासाठी अयोग्य मार्गाचासुद्धा अवलंब करण्याची ही मनोवृत्ती मुलांमध्ये कोवळ्या वयातच निर्माण करणारी ही कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती जेवढी चिंताजनक आहे, त्यापेक्षाही जास्त भयावह ही वस्तुस्थिती आहे की ही उत्तेजक द्रव्ये मध्यमवर्गीय शाळकरी मुलांना उपलब्ध होतात! विश्वसनीय सूत्रांच्या मते आज महानगरातल्या कित्येक शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर असणा-या पानपट्टीच्या दुकानांमध्ये ही उत्तेजक द्रव्ये विकत मिळतात. मारिवाना हे सर्वात स्वस्त उत्तेजक द्रव्य मानले जाते. ते घरपोचसुद्धा केले जाते. स्पर्धेत कामगिरी उंचावण्याखेरीज, आपल्या काळज्या कमी होऊन ‘बरं वाटावं’ यासाठीसुद्धा आजची किशोरवयीन मुले-मुली उत्तेजक द्रव्यांचा आधार घेताना दिसतात. भारतामध्ये केवळ गेल्या दोन वर्षांत मारिवानाचे सेवन करणा-यांच्या संख्येत 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कारण मारिवानाचे सेवन ही ड्रग अॅडिक्शनची पहिली पायरी मानली जाते.
या घटनेचे गांभीर्य आणि त्याचे दूरगामी दुष्परिणाम जाणवल्यामुळेच भविष्यात अशा शालेय पातळीवरील स्पर्धांमध्ये उत्तेजक द्रव्ये घेण्याच्या घटना टाळण्यासाठी, सरकारनेसुद्धा तातडीने पावले उचलली. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेने एक परिपत्रक काढून ते देशभरातल्या आयसीएसई आणि सीबीएसईसह सर्व शैक्षणिक बोर्डांना आणि विद्यापीठांना अंमलबजावणीसाठी पाठवून दिले आहे. या परिपत्रकाद्वारे क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तेजक द्रव्य सेवनाला संपूर्ण आळा घालण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याचे आदेश सर्व शैक्षणिक बोर्डांना आणि विद्यापीठांना दिले गेले आहेत. स्पर्धेच्या वेळी सर्व स्पर्धकांवर आणि त्यांच्या प्रशिक्षकांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर उत्तेजक द्रव्यांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम समजावून सांगणारा धडासुद्धा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची महत्त्वाची सूचना दिली आहे.
परंतु या सर्व बाह्य उपायांच्या पलीकडे जाऊन, मिळवलेल्या यशाइतकेच ते यश कोणत्या मार्गांनी मिळवले आहे तो मार्गसुद्धा महत्त्वाचा असतो. किंबहुना यशाचा मार्ग योग्य असेल तरच ते यश दीर्घकाळ सुख देते, अन्यथा ते सुख क्षणभंगुर असते, हे आज कोवळ्या वयात असणा-या मुलांना पटवून देणे आवश्यक आहे. हे जर आपण आपल्या मुलांना पटवू शकलो तरच आपली पुढची पिढी मानसिकदृष्ट्या सशक्त असेल. हा विचार आपल्या कोवळ्या वयातल्या मुलांना पटवणे हे आज स्पर्धात्मक वातावरणात जगणा-या आणि खुल्या उपभोक्तावादातून आलेली सुखासीनता उपभोगणा-या पिढीसमोरचे सर्वात मोठे नैतिक आव्हान आहे!!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.