आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जेएनयू’चा रा. स्व. संघाला धडा (कॉ.भीमराव बनसोड)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एवढेच नव्हे तर ही संघटना या वेळी डाव्यांचा मुकाबलाही करू शकली नाही. ती तिसऱ्या स्थानावर फेकली गेली असून, दुसरे स्थान ‘बाफ्सा’ (बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन) या आंबेडकरवादी संघटनेने पटकावले. अध्यक्षपदाच्या निवडीत याच संघटनेने टक्कर दिली. केवळ दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या बाफ्सा या संघटनेने ए. बी. व्ही. पी. सारख्या जुन्या संघटनेवर एवढी मात करावी, ही तशी समाधानाची बाब आहे. या निकालातून दुसरे समाधान आहे ते असे की, जे. एन. यु. म्हणजे जणू काही देशद्रोह्यांचा अड्डा आहे, तेथे देशविघातक कृत्ये करणारे फुटीरतावादी, आतंकवादी तयार होतात, म्हणून ती संस्था बंदच करून टाकली पाहिजे, असे काहूर संघाने त्यांच्या अख्त्यारीतील प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने माजवले होते. तेथील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या व इतर पदाधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. खुनाच्या धमक्या तर दिल्याच पण प्रत्यक्ष मारहाणही केली. न्यायालयाने या सर्वांना जामीन दिला तरी या सर्वच कार्यकर्त्यांवर विद्यापीठ प्रशासनामार्फत परीक्षेला बसू न देणे, सेमिस्टरचे त्यांचे फॉर्म न स्वीकारणे, विविध प्रकारे मोठमोठ्या रकमेचे दंड आकारणे इत्यादी प्रकारे त्यांचा छळ चालवला होता. अशा परिस्थितीत एकीकडे मा. न्यायालयाने ‘केवळ सरकारी धोरणाला विरोध करतात म्हणून कोणावरही देशद्रोहाचे गुन्हे दाखल करता येणार नाहीत’ असे स्पष्ट केले आहे. तसेच या विद्यार्थ्यावर कोणतीही कार्यवाही करण्यास प्रतिबंध केला आहे. तर दुसरीकडे निवडणुकातून या विद्यापिठातील संघप्रणित संघटनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. याप्रमाणे हे विद्यापिठ त्यांच्या आतापर्यंतच्या परंपरेप्रमाणे संकटावर मात करून, संघाने केलेल्या हल्ल्यातून सध्यातरी बाहेर पडले आहे. तेथे झालेल्या ‘देशद्रोही’ संघर्षामुळेच या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तेव्हा प्रश्न असा आहे की, संघाने या विद्यापिठाविरूद्ध ‘देशद्रोहाचे’ काहूर माजवून काय साध्य केले? संघ जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की, आपण डाव्या व आंबेडकरवादी संघटनांना कन्हैय्या सारखा एक चांगला नेता मिळवून दिला आहे. जो कन्हैय्या कोणाला माहित नव्हता तो रातोरात देशभर माहित झाला. या संघर्षातून तावूनसुलाखून बाहेर पडून तो आता देशभर फिरत आहे. जेथे जाईल तेथे संघाविरुद्ध, त्यांच्या ब्राम्हणी राष्ट्र व नरेंद्र मोदींच्या धोरणांविरुद्ध भाषणे करीत आहे. लोकांनाही ते पटते म्हणून तर त्याला आंबेडकर भवन पाडण्याविरूद्ध झालेल्या मुंबई मोर्चात, दलितांच्या मारहाणीविरोधात उना येथील महामेळाव्यात, रोहित वेमुलाप्रकरणी हैदराबादेत, एफ.टी.आय.आय.साठी पुण्यात, केरळच्या निवडणुकांत सर्वत्र त्याची मागणी वाढली आहे. जेथे जाईल तेथे संभाव्य ब्राम्हण्यशाहीरूपी फॅसिझविरोधात मार्क्सवादी व आंबेडकरवाद्यांनी, निळ्या व लाल बावट्यांनी एकत्रित यावे, त्याच्या शब्दात सांगायचे झाल्यास ‘निली कटोरी व लाल कटोरींनी’ एकाच ताटात जेवण करावे, असे सांगत आहे. उना येथील सभेत कामगार-कष्टकऱ्याप्रमाणेच ‘जगातील दलितांनो एक व्हा’ असे लाखोंच्या सभेत जाहीर आवाहन केले. ही सर्व जे.एन.यु.चीच निर्मिती आहे. याप्रमाणे कन्हैय्यावर शारीरिक व जे.एन.यु.वर वैचारिक हल्ला करून संघाने एकप्रकारे ‘हात दाखवून अवलक्षण’ केले आहे, असे म्हणायला पाहिजे. जे. एन. यु. च्या निवडणुकातून जशा काही बाबी चांगल्या घडल्या आहेत तशाच आणखी काही चांगल्या बाबी घडणे बाकी आहे. उदा. तेथे आईसा (ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन) ही भा.क.प.मार्क्स.लेनिनवादी (लिबरेशन) या पूर्वीच्या नक्षलवादी परंपरेशी जुळलेल्या पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटना आहे. दुसरी ए.आय.एस.एफ.ही मार्क्स.कम्यु.पक्षाशी संबंधित संघटना आहे. पूर्वी या विद्यार्थी संघटना आपापसातच भांडत असत म्हणून थोडातरी ए.बी.व्ही.पी.ला शिरकाव करायला अवसर मिळत होता. तो या वेळी या संघटनांनी एकत्रित येऊन ए. बी. व्ही. पी. ला हाणून पाडले. तरी देशव्यापी जो संभाव्य धोका आहे तो केवळ या दोन संघटनांनी परतवून लावण्यासारखा नाही. त्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बाफ्सा या आंबेडकरवादी संघटनेशीही त्यांना जुळवून घ्यावे लागेल. कन्हैय्या जाहीर सभातून जे आवाहन करतो ते केवळ भाषणापुरते असून, उपयोगाचे नाही तर ते प्रत्यक्ष व्यवहारातही उतरवावे लागेल. जे. एन. यु. मध्ये याचे काय प्रयत्न झाले? यात वैचारिक मतभेद निश्चित असतील पण ते ब्राम्हण्यशाहीरूपी फॅसिझमशी मुकाबला करण्या इतपत महत्त्वाचे नाहीत. एकजुटीने करावयाच्या संघर्षाच्या क्रमात त्याचेही निरसन करता येईल. त्यासाठी डाव्यांनी भारताचे जात वास्तव ओळखून पूर्वीच्या चुका सुधारल्या पाहिजे तसेच आंबेडकरवाद्यांनीही आजची गरज लक्षात घेता उदार मनाने जुळवून घेतले पाहिजे. अन्यथा संघाची ब्राम्हण्यवादी विचारसरणी जरी मार्क्स वादांशी व आंबेडकरवादाशी वैचारिक पातळीवर मुकाबला करू शकत नसली तरी या दोघांनाही आपापसातच झुंजवत ठेवून चाणक्यनितीप्रमाणे आपले इप्सित साध्य केल्याशिवाय राहणार नाही. दलितातील नोकरशाहीतून तयार झालेल्या उच्च मध्यमवर्गातील काही लोक संघाच्या नादी लागलेच आहेत. आंबेडकर भवन पाडण्याला तेच कारणीभूत ठरले आहेत. राजकीय क्षेत्राप्रमाणे धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिकादी क्षेत्रातही त्यांचा वावर वाढलेला आहे. हे वास्तव आंबेडकरवाद्यांनाही ध्यानात घ्यावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...