Home »Editorial »Columns» Congress Ncp Politics

अस्वस्थ घड्याळ व हाताचा त्रागा

गिरीश अवघडे | Jan 07, 2013, 02:00 AM IST

  • अस्वस्थ घड्याळ व हाताचा त्रागा

केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळावर जाण्याचे विधान करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटातही खळबळ उडवून दिली. उभय पक्षांदरम्यान एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचे उद्योग सतत सुरूच असतात. पण याकडे दोन्ही पक्षांचे नेते दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानतात. केंद्र आणि राज्यातील संसार सुखनैव चालावा असा यामागचा विचार असतो. परंतु गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनीच काँग्रेसची उणीदुणी काढल्याने दोन्ही पक्षांतील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांनी विरोधी पक्षात बसायचे असल्यास ते बसू शकतात, असे विधान केल्यानंतर हा वाद अक्षरश: विकोपाला गेला, हे उघड झाले आहे.

एखादे दुखणे वरवरचे उपचार करून तसेच दाबून ठेवल्यास त्याचे रूपांतर मोठ्या आजारात होते. अगदी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बाबतीत झाले आहे. गेल्या दोन वर्षांत उभय पक्षांदरम्यानच्या मानापमान नाट्यावर तोडगा काढण्याऐवजी त्यावर पडदा टाकण्यातच दोन्ही बाजूंकडून धन्यता मानण्यात आली. त्यामुळे ना फायदा काँग्रेसचा झाला ना राष्ट्रवादीचा. आघाडीचा धर्म न पाळल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरात निवडणुकांच्या निमित्ताने जाहीरपणे केली. पण यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेसला राष्ट्रवादीने कसे बाजूला सारले आणि पुण्यात नव्या पॅटर्नला कसा जन्म दिला हे माध्यमांत अधिक आक्रमकपणे सांगितल्यामुळे ही नाराजी केवळ विश्वासघाताची नाही हे स्पष्ट झाले.

पवार जेव्हा नाराज होतात त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्र किंवा राज्यात काहीतरी नक्कीच पदरात पडते हा इतिहास आहे. परंतु गुजरात निवडणुकांतील अपयश आणि मोदींचा वाढता राष्ट्रीय प्रभाव, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विरोधात सातत्याने प्रकट होणारा रोष इ. ची पार्श्वभूमी या वेळच्या रोषाला कारणीभूत आहे. उभय पक्षांदरम्यान जातीय शक्तींना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट हा समान धागा आहे. या एकाच मुद्द्यावरून दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. केंद्र आणि राज्यात हा मुद्दा समान आहे. त्यामुळेच आघाडी राखण्याची जबाबदारी मोठा पक्ष या नात्याने काँग्रेसची आहे, असे राष्ट्रवादी पर्वीपासूनच मानत आहे. बदलत्या राष्ट्रीय समीकरणांचा विचार केल्यास आघाडी स्वत:हून तोडण्यापेक्षा काँग्रेसनेच याबाबत निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट अपेक्षा राष्ट्रवादीच्या धुरिणांची आहे. म्हणूनच हा चेंडू थेट काँग्रेसच्या कोर्टात टोलवण्यात आला असला तरी त्याला काँग्रेसकडून राष्ट्रीय पातळीवरून अतिशय थंडा प्रतिसाद आला आहे. काँग्रेसकडून राष्ट्रीय पातळीवरून अद्यापही ठोस प्रतिक्रिया आली नाही. पण संयुक्त पुरोगामी आघाडीतील एक विश्वासू सहकारी गमावणे सध्याच्या काळात तरी काँग्रेसला परवडणारे नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सामोपचार आणि समन्वय समितीचे गुºहाळ पुढे केले जाते की, आणखी काही हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Next Article

Recommended