आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारमुक्तीचे प्रेक्षणीय देखावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचारमुक्ती ही एक प्रामाणिक आणि उदात्त भावना असली तरीही ती जोपासताना समाज उन्मादी अवस्थेत जाण्याचीच शक्यता अधिक असते. उन्मादी अवस्था सारासार विवेकाला झिडकारते. डोळ्यांना दिसतेय तेच सत्य मानून सत्याच्या मुळाशी जाण्यापासूनही रोखते. भ्रष्टाचार रोखला पाहिजे, तो उघड झाला पाहिजे आणि भ्रष्टाचार करणा-यांना वेळीच शिक्षाही झाली पाहिजे, हे सगळे राष्ट्राच्या भल्यासाठी गरजेचे असले, तरीही भ्रष्टाचारमुक्तीचे अंतिम ध्येय साध्य करणे हा व्यवस्थेचा (यात राजकीय-अराजकीय-प्रशासकीय व्यवस्थेसोबत मीडियासुद्धा आला.) प्रामाणिक हेतू असतो का, हा प्रश्नही प्राधान्याने विचारला गेला पाहिजे.


महाराष्ट्रात 80 च्या दशकात सिमेंट घोटाळ्याच्या आरोपावरून बॅ. अतुलेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. स्वाभाविकपणे अंतुलेंवर त्या वेळी भ्रष्टाचारी असा शिक्का मारला गेला, परंतु सत्तास्पर्धेत अडसर ठरू पाहणा-या अंतुलेंना खाली खेचण्याच्या इराद्याने त्यांच्याविरोधात आघाडी उघडण्यात आली. त्यात विरोधक कमी आणि स्वपक्षीय अधिक होते. या स्वपक्षीयांचा भ्रष्टाचार नव्हे तर ‘अंतुले हटाव’ हाच मुख्य अजेंडा होता. कारण जर व्यवस्थेत त्यावेळी भ्रष्टाचारविरोधाची भावना प्रबळ होती. कालांतराने न्यायालयाने अंतुलेंना निर्दोष ठरवले तेव्हा त्यांच्याविरोधात बदनामीची सूत्रबद्ध मोहीम राबवणा-यांचे पितळ उघडे पडले, हा भाग अलाहिदा.


अर्थात, येथे अंतुले हा एक संदर्भ, परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत केंद्रात वा राज्यपातळीवरची, सत्ताधारी वा विरोधकांची, ‘जन्मजात भ्रष्टाचारी’ असलेल्या काँग्रेसी नेत्यांची वा ‘जन्मजात शुचिर्भूत’ असलेल्या भाजप नेत्यांची उघडकीस आलेली भ्रष्टाचाराची वा तथाकथित अनैतिक व्यवहारांची प्रकरणे नजरेखालून घातली तरीही व्यवस्थेच्या ‘जाणीवपूर्वक निवडी’चा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. टू जी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, कर्नाटकातला खाण घोटाळा वा अगदी अलीकडचे केंद्रीय मंत्र्यांच्या नातेवाइकाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे गाजलेले रेल गेट या सगळ्या प्रकरणांत विशिष्ट काही व्यक्ती आणि संस्था तेवढ्या भ्रष्टाचारी ठरल्या. त्यांनी प्रत्यक्षात भ्रष्टाचार केलेला असेलही, न्यायालयात यथावकाश त्यांच्यावरील आरोप सिद्ध होतील वा सिद्ध होणारही नाहीत. इथे मुद्दा ज्यांनी कुणी या सगळ्यांचा भ्रष्टाचार उघड केला त्यामागे व्यापक देशहित होते का, हा आहे. तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा स्पेक्ट्रमचे नियमबाह्य वाटप करत होते हे खरे, परंतु त्यांना गजाआड करण्यामागचे ते एकच कारण होते? सत्तास्पर्धेशी, कुरघोडीच्या राजकारणाशी याचा काहीच संबंध नव्हता? राजांचा भ्रष्टाचार उघड करणे, कनिमोझींचा त्यात सहभाग अधोरेखित करणे, हाच त्यावेळी संबंधितांचा उद्देश होता की, काहींना इतरांवरही त्यातून राजकीय नेम साधायचा होता?


जो प्रश्न राजा-कनिमोझींच्या संदर्भात विचारता येतो, तोच प्रश्न सुरेश कलमाडी वा पवनकुमार बन्सल यांच्या संदर्भातही विचारता येतो. क्रीडा क्षेत्रातला भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा, हा कॉमनवेल्थ घोटाळा उघड करण्याचा उद्देश होता ? की सत्तापक्ष आणि विरोधकांतल्या ‘कायदाप्रेमीं’ना कलमाडी वा बन्सल ही भ्रष्टाचार करणारी व्यक्ती तेवढी अडगळीच्या खोलीत ढकलायची होती? मुळात गेल्या दोन वर्षांत केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसमधली भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर येत असताना शुद्ध चारित्र्याच्या बाता मारणा-या भाजपच्या स्वदेशी बागेतसुद्धा भ्रष्टाचाराची कमळे टराटरा फुलत होती. त्यातले कट्टर संघप्रेमींना लाच्छन देणारे प्रकरण होते, कर्नाटकचे तत्कालिन मुख्यमंत्री येदियुरप्पा. हा येदियुरप्पा नावाचा मोती नाकापेक्षा जड झाला नसता, तर खाण घोटाळ्यातल्या त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाची इतकी मोठी शिक्षा भाजपने त्यांना दिली असती? जे येदियुरप्पांचे तेच नितीन गडकरींचेही. गडकरींनी भाजपची घटना बदलून अध्यक्षपदाच्या सलग दुस-या टर्मची अभिलाषा ठेवली नसती तर ‘पूर्ती’ कंपनीत असलेल्या त्यांच्या ‘वेस्टेड इंटरेस्ट’ची जाहीर चर्चा होऊन त्यांच्या बदनामीचा डाव खेळला असता? आणि त्यांच्या अनैतिकतेच्या व्याख्येत बसणा-या व्यवहारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणा-या संबंधितांना (स्वपक्षीय?) भाजपच्या चारित्र्याची फक्त काळजी होती? की गडकरी हेच त्यांचे एकमेव लक्ष्य होते? गपगुपान दुस-याला जागा करून दिली असती, तर गडकरींचे व्यवहार अनैतिक ठरले असते? अर्थातच, जी व्यवस्था स्वत:ची सत्ताकेंद्री सोय बघून भ्रष्टाचारी व्यक्ती खड्यासारखी बाजूला सारते, त्या व्यवस्थेला आधार देणा-या समाजात भ्रष्टाचारी, अनैतिक व्यवहारांत गुंतलेल्यांचे यथोचित आगत स्वागत होते, तेव्हा जराही आश्चर्य वाटत नाही. म्हणजेच नैतिकता, भ्रष्टाचार आदींच्या व्याख्या कृतीवर नव्हे व्यक्तीवर ठरत असतात आणि व्यवस्थेला, या समाजाला भ्रष्टाचार संपवण्यात नव्हे तर विशिष्ट व्यक्ती संपवण्यात अधिक रस असतो.