आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैतन्यदायी चेहरा : रिची बेनॉ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तुम्ही यांना ओळखता का?’
हा माझा सवाल होता, क्रिकेटमधील एका परिसंवादास उत्साहाने आलेल्या तरुण पिढीला. चेहरा स्पष्टपणे दाखवणाऱ्या ओळखपत्रास साजेशी दोन छायाचित्रे मी त्यांच्यापुढे उंच धरली होती.
उत्तर देण्यास उत्सुक असलेल्या अनेकांचे हात उंचावले. ‘काय सर, हे तर टीव्ही समीक्षक!’
‘पण नावे काय त्यांची?’ ‘काय सर ते रवी शास्त्री आणि हे सुनीलगावसकर. टीव्ही समालोचक गावसकर व शास्त्री.’

सुनील गावसकरची आेळख टीव्ही समीक्षक आणि रवी शास्त्रीची ओळख टीव्ही समालोचक,
हीच असावी? रवी शास्त्री कोणी कपिलदेव वा इयान बोथम नसला, तरीही होता ‘चँपियन ऑफ
चँपियन्स’ अष्टपैलू क्रिकेटपटू. अन् हेल्मेटविना जलदगती तोफखान्यांना सतरा वर्षे सामोरे
जाणारा सुनील गावसकर हा फलंदाजांतला सम्राट, कसोटी क्रिकेटमधील दहा हजार धावांच्या सर्वोच्च शिखरावर सर्वप्रथम झेंडा फडकावणारा असामान्य फलंदाज. खेळातील त्यांची कर्तबगारी नजरेआड व्हावी आणि फक्त विश्लेषकाची भूमिका रूढ व्हावी याला काय म्हणावे. कालाय तस्मै नम:? की वक्त वक्त की बात? हे सारे विचार मनात आणले, ते रिची बेनॉच्या दु:खद निधनानंतर आलेल्या बातम्यांनी. त्या साऱ्या बातम्यांत म्हटले होते की, बेनॉ होते
टीव्ही समीक्षक, त्यांच्या निधनामुळे क्रिकेटने आपला आवाज गमावलाय. वस्तुस्थिती अशी आहे
की, क्रिकेटने आपला एकमेव नव्हे, पण एक गहिरा आवाज, एक अधिकारवाणी जरूर गमावलीय, पण त्यापेक्षाही फ्रँक वॉरेल यांच्यासह एक अविस्मरणीय चेहरा गमावलाय. क्रिकेटला व विशेषत: कसोटी क्रिकेटला आकर्षक चेहऱ्याची गरज भासू लागलीय, ही जाणीव प्रकर्षाने जाणवू लागली होती दस्तरखुद्द डॉन ब्रॅडमनना. कांगारूंनी इंग्लंडचा ४-० असा धुव्वा उडवून त्यांच्याकडून ‘अॅशेस’ हिसकावून घेतल्या होत्या. शिवाय दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान व भारत यांना त्यांच्या देशात खडे चारले होते. तरीही ब्रॅडमनना हे यश संतुष्ट करत नव्हते. क्रिकेटचा चेहरा अधिक आकर्षक व्हावा, सामने अधिक रंगतदार व निकाली व्हावेत आणि मायबाप प्रेक्षकवर्ग क्रिकेटशी घट्ट जोडलेला राहावा, हीच त्यांची तीव्र भावना होती.

फ्रँक वॉरेल यांच्या विंडीज संघाविरुद्ध सलामीच्या कसोटीआधी, ऑस्ट्रेलियन संघ बैठकीआधी
खेळाडूंशी हितगुज करण्याची इच्छा डॉन ब्रॅडमननी व्यक्त केली. निवड समितीच्या अध्यक्षांनी अशी विनंती करणे, त्या जमान्यात नवीनच होतं. ब्रॅडमन बोलले मोजके शब्द, पण छोटे भाषण होते मुद्देसूद. ‘तुम्ही जिंकावं, हीच अपेक्षा आहे निवड समितीची, पण त्यासाठी अनाकर्षक सामने
बघण्याची किंमत, क्रिकेटच्या पाठीराख्यांना, मायबाप प्रेक्षकवर्गाला मोजावी लागू नये,' असे
त्यांनी बजावले. "क्रिकेट पाहण्यासाठी पैसे मोजणाऱ्यांची कदर करणाऱ्या आणि आक्रमक
क्रिकेटपटूंनाच आम्ही प्राधान्याने निवडू.’ असेही ते पुढे म्हणाले होते. पण एवढं मार्गदर्शन करून
थांबणाऱ्यांतले ब्रॅडमन नव्हते. नवोदित गॅरी सोबर्सला बेनॉचा लेग-स्पिन भंडावेल, असे लेख
वर्तमानपत्रांत आले आणि डिवचलेल्या सोबर्सने एक अफलातून शतकी खेळी सादर केली.
सलामीच्या दिवशी त्याने सामन्यात जो जोश भरला, तोच पाच दिवस वाढवत न्यावा, हीच
ब्रॅडमनची अपेक्षा. शेवटच्या दिवशी, विजयासाठी २३३ धावांची गरज, पण कांगारूंची हालत सहा
बाद ९२! बेनॉ-डेव्हिडसन ही नाबाद जोडी, पॅड्स न उतरवता चहापानात सहभागी. ब्रॅडमन जातीने
आले ड्रेसिंग रूममध्ये. स्वत:च कपात चहा ओतून घेतला व विचारणा केली. ‘रिची, काय
विचार आहे? ‘ड्रॉ’ हवी की विजयश्री?’ बेनॉने उत्तर दिले. ‘आम्ही अर्थातच, जिंकण्यासाठी खेळू!’
चेहरा कोरडा ठेवत ब्रॅडमन म्हणाले, ‘तुझे बोल ऐकून फार फार बरं वाटलंय. व्हेरी प्लीज्ड टू
हियर हट.’ वेस हॉल, सोबर्स, वॉरल, रामाधिन अशा गोलंदाजांसमोर बेनॉ-डेव्हिडसन यांनी लढाऊ
शतकी भागी रचली. विजयश्री आटोक्यात आलेली असताना, शेवटच्या चौघातले तिघे धावचीत झाले. यष्टींचा थेट वेध घेणाऱ्या जो सॉलोमनच्या फेकीनं मेकीफ धावचीत झाला. सामना ‘टाय’ वा बरोबरीत सुटला. हातातोंडाशी आलेला यशाचा घास घेता आला नाही, म्हणून बेनॉ नाराज झाला. पण ब्रॅडमननी त्याला वेगळी दृष्टी दिली. ‘क्रिकेटच्या भल्यासाठी यापेक्षा अधिक काय
घडायचे बाकी ठेवलेत? धीस इज द बेस्ट थिंग
व्हिच कुड पॉसिबली हॅव हॅपन्ड फॉर क्रिकेट.’
ब्रॅडमनशी असहमत न होता, बेनॉ आपल्या
मतावर कायम राहिला. ‘आम्ही किंचित अधिक
व्यवस्थित खेळलो असतो, तर जिंकलो असतो व
तेच मला हवे होते.’ द्रष्टे ब्रॅडमनही आपल्या
मतावर ठाम होते. ‘आज नव्हे तरी उद्या परवा
तेरवा, तुझे मन बदलेल!’
मालिकेची सुरुवात ‘टाय’ने. मग दोन सामने
एकतर्फी, पण मालिकेत १-१ बरोबरी निर्माण
करणारे झाले. चौथ्या कसोटीत केन मकाय व
लिंडसे क्लाइन या अखेरच्या जोडीने शेवटचे दोन
तास किल्ला नाबाद लढवला, सामना वाचवला.
पाचव्या व निर्णायक कसोटीत, वॉली ग्राउट
स्वयंचित, हिट विकेट होता. पण बेल खाली
पडलेली पंचांना म्हणे दिसली नाही व कांगारू दोन
गडी राखून विजयी मालिकेतही २-१ विजयी
(याहीबाबत एक किस्सा असा : आपल्याला
पडणाऱ्या स्वप्नांवरून क्लॉड पेक नामक
सदगृहस्थ भाकीत करत असे. दुसऱ्या कसोटीत
फ्रँक मिशन दुसऱ्याच चेंडूवर बळी घेईल; पाचव्या
कसोटीत विंडीज दुसऱ्या डावात ३२१ करतील,
पण कांगारू एक गडी राखून जिंकतील, असं
क्लॉड पेकनी स्वप्नात पाहिलं होतं - ते
जवळपास खरं ठरलं!) हेच आकर्षक क्रिकेटचं
लोण रिची बेनॉने इंग्लंडमध्ये पसरवलं, ते ‘अ
ॅशेस’च्या परतीच्या लढतीत, मालिका १-१
बरोबरीत असताना, चौथ्या कसोटीत,
डेव्हिडसन-मॅकेंझी यांची शेवटच्या विकेटसाठी
सनसनाटी, ९८ धावांची फटकेबाज भागीदारी
झाली. मग बेनॉने ‘राउंड द विकेट’ मारा करून
बघावा, हा रे लिंडवॉल यांचा मार्मिक सल्ला, मांडी
लचकलीय म्हणून स्क्वेअर लेगला माझ्या जागी
ओनिलला ठेव, ही केन मकायची मौल्यवान टीप
आणि काहीसे लंगडत मारा करणाऱ्या
मकायसमोर, फलंदाज बॅरिंगटनला गाफील आणि
अचानक सारी शक्ती पणाला लावून मकायने
टाकलेल्या भेदक कटरवर पायचीत! असे चैतन्य
निर्माण करणारा आणि प्रेक्षकांना पाच-चार-तीन
दिवसांच्या क्रिकेटकडे खेचणारा असा क्रिकेटचा
आकर्षक चेहरा म्हणजे रिची बेनॉ. त्याला सलाम!