Home | Editorial | Agralekh | crickter and

घाण्याला जुंपलेले क्रिकेटपटू आणि...(अग्रलेख)

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jan 08, 2013, 10:29 AM IST

इंग्लंड संघ ख्रिसमसला मायदेशी परतला आणि त्या अवधीत पाकिस्तान संघाला आमंत्रित करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्याच संघाच्या मानसिक खच्चीकरणास हातभार लावला

 • crickter and

  इंग्लंड संघ ख्रिसमसला मायदेशी परतला आणि त्या अवधीत पाकिस्तान संघाला आमंत्रित करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्याच संघाच्या मानसिक खच्चीकरणास हातभार लावला. पैसे मिळवण्याची संधी बीसीसीआय कधीच सोडत नाही. गेले वर्षभर भारतीय क्रिकेटची मैदानावर होत असलेली वाताहत त्यांनी नजरेआड केली. पैशाच्या पावसात न्हाऊन घेण्याची सवय जडलेल्या बीसीसीआयला क्रिकेटचा कमी झालेला टीआरपी आणि त्यामुळे घटलेली आर्थिक आवक असह्य झाली. पाकिस्तानला निमंत्रण देऊन त्यांनी स्वत:ची आणि जाहिरातदार टेलिव्हिजन वाहिन्यांची तिजोरी भरून दिली. ‘क्रिकेट संघ’ हा या सर्वांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. पैशाच्या लोभापायी या सर्वांनी या कोंबडीलाच मारले. क्रिकेटपटूंची शारीरिक आणि मानसिक अवस्था काय आहे, हे जाणून घेण्याची तसदीदेखील त्यांनी घेतली नाही. कुंबळे, श्रीनाथ, सौरव गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण आदी दिग्गज खेळाडू पाठोपाठ निवृत्त होत असताना भविष्यातला संघ उभारायला हवा, याचेही भान या मंडळींना उरले नाही. सर्व खेळाडूंना मालामाल केले की क्रिकेटचा विकास आपोआप होईल, या भ्रामक कल्पनेत ही मंडळी वावरत होती. आपापल्या ‘व्होट’ बँक असलेल्या मंडळींना आणि त्यांच्या मर्जीतल्यांना बोर्डातील महत्त्वाची खाती दिली, विविध पदांवर त्यांच्या नियुक्त्या केल्या, क्रिकेट अकॅडमी काढल्या, त्यामध्ये

  अत्याधुनिक यंत्रणाही बसवली. मात्र त्या चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या माणसांची पात्रता कधीच पाहिली गेली नाही. सगळी ताटाखालची मांजरे नियुक्त केली. त्यांच्या कामगिरीची कधी पडताळणीच केली गेली नाही. क्रिकेटशी संवाद नसलेली सारी मंडळी एकत्र आली. क्रिकेटची जाण असणारे, ज्ञान असणारे आणि प्रामाणिक लोक दूर फेकले गेले. आज त्याच विषवृक्षाला लागलेल्या फळांचे दुष्परिणाम भारतीय क्रिकेट भोगत आहे. पाकिस्तानातील स्थानिक क्रिकेटची तर साफ वाट लागली आहे. तेथे ना बोर्डाचे फारसे अस्तित्व आहे, ना क्रिकेट सुविधांचे. सराव कॅम्पदेखील परदेशात ठेवावे लागतात. अशा परिस्थितीतून आलेल्या या संघाने पैशाच्या राशीत लोळणा-या आपल्या क्रिकेट संघाला भारतात येऊन

  लोळवले. दिल्लीतील तिसरा क्रिकेट सामना पाकिस्तानने आपल्या घशात घातला, असे म्हणतात. मालिकेतील निकालापेक्षाही उभय संघांची मैदानावरील क्षमताही विरोधाभास स्पष्ट करणारी होती. भारतीय संघ याआधीही पराभूत व्हायचा. अलीकडच्या काळातील इंग्लंड, पाकिस्तानच्या संघाविरुद्धचे भारतातील पराभव जिव्हारी लागणारे होते. फलंदाजांचे इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांसमोरचे पानिपत लाजिरवाणे होते. त्याच ‘आखाडा’ खेळपट्ट्यांवर भारतीय फिरकी गोलंदाजीची बोथट झालेली धार पाहताना मन विषण्ण होते. पाकिस्तानविरुद्ध होणारे पराभव प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनावर मोठेच आघात करतात. पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही सामन्यात भारतीय संघ त्यांच्याविरुद्ध सामना करण्याच्या योग्यतेचा वाटला नाही. पाकिस्तानचे दोन्ही फस्पिनर आपल्या एन. श्रीनिवासनकृपादृष्टी अश्विनपेक्षा खूपच उजवे होते. आपली मध्यमगती गोलंदाजी पाकिस्तानच्या नवोदित मध्यमगती गोलंदाजांच्या तुलनेत अपरिपक्व वाटत होती. भारताची फलंदाजीची फळी फक्त कागदावरच प्रबळ होती. क्षेत्ररक्षणात पाकिस्तान संघ कधीही दर्जेदार नव्हता.

  मात्र त्यापेक्षा खराब क्षेत्ररक्षण भारतीय क्षेत्ररक्षकांनी केले. मैदानावरच्या या क्षमतेपेक्षाही भारतीय क्रिकेटच्या भविष्यावर झालेला आघात अधिक असह्य आहे. भारताकडे राखीव फळीच नाही. जगातील सर्व देशांच्या क्रिकेटपटूंच्या एकत्र संख्येपेक्षाही अधिक संख्या भारतातील प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळणा-या खेळाडूंची भरते. आपल्या देशातील 120 कोटी लोकसंख्या पाहता खरे तर अशा खंडप्राय देशाचे जगाला आव्हान देऊ शकतील असे एक दोन नव्हे तर 10-12 संघ उभे राहायला हवेत. दुर्दैवाने आपल्याला एक संघ उभा करतानाही आता कष्ट होताहेत. आयपीएल क्रिकेट खेळणारा कॉलेजकुमारही सुनील गावसकर, वेंगसरकर यांच्यापेक्षा क्रिकेटपासून अधिक पैसे मिळवू लागला आहे. शंभरावर कसोटी खेळणा-या खेळाडूंपेक्षा मुंबईचे आयपीएल फेम क्रिकेटपटू कसोटी खेळण्याआधीच कोट्यवधींची माया गोळा करतात.

  मात्र क्रिकेटच्या क्षेत्रातील त्यांची कमाई नगण्य आहे. याला जबाबदार आपले क्रिकेट बोर्डच आहे. सरकारला कर द्यायला नको म्हणून पैसे जबरदस्तीने खेळाडूंच्या, क्रिकेट संघटनांच्या खिशात कोंबणा-या बोर्डाने क्रिकेटचा दर्जा खालावत का चालला आहे, याचा कधी विचारच केला नाही. आयपीएल क्रिकेट खेळणे हेच ध्येय नजरेसमोर बाळगून आजची पिढी मैदानात उतरत आहे. त्यांची क्रिकेट अमर्याद गुणवत्ता 4-4 षटकांपुरतीच मर्यादित होत चालली आहे. त्यामुळे भविष्यकाळात इंग्लंड, स्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंकाच नव्हे, तर झिम्बाब्वे, बांगलादेश यांच्यासारख्या संघांनीही हरवल्यास आश्चर्य वाटणार नाही. परदेशी आणि गो-यांच्या आकर्षणापायी आपण प्रशिक्षक नेमताना अनेक चुका केल्या. गॅरी कर्स्टन यशस्वी ठरला याचे मुख्य कारण म्हणजे त्याने प्रत्येक खेळाडूचे वैयक्तिकरीत्या अंतरंग ओळखले.

  त्यांना कसे हाताळायचे ते त्याला अचूक कळले. भारतीय प्रशिक्षकांना कमी लेखायचे धोरणच असल्यामुळे आपल्यातील असे अनेक गॅरी कर्स्टन बीसीसीआयला दिसले नाहीत. भारताचा फिरकी गोलंदाजीचा प्रशिक्षकदेखील परदेशीच असावा, यासारखा दैवदुर्विलास नाही. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, मानसिक क्षमता आदी गोष्टींसाठी परदेशी सपोर्ट स्टाफ वाढत गेला.

  जे काम याआधी एकच प्रशिक्षक करायचा, त्याची विभागणी अनेकांमध्ये झाली. तरीही अपयशाची साथ काही संपली नाही. परदेशी व्यक्तींना काम दिले की सारे काही आलबेल होईल, हा बीसीसीआयचा ठाम समज आहे. त्यामुळे खेळपट्टी, मैदान बनवण्यापासून ‘टुकार’ परदेशी कंपन्यांना आणि व्यक्तींना कामे दिली गेली. परिणामत: आज देशातील क्रिकेट मैदानांचीही अवस्था वाईट झाली आहे. कोणत्या प्रकारच्या क्रिकेटसाठी कोणते मैदान हवे, याचे ज्ञान कुणालाही नाही. क्युरेटरला वेगळे वाटते, कर्णधार धोनीला वेगळेच हवे असते. या वादातूनच इंग्लंडविरुद्ध मालिकेचा विचका झाला. त्या चुकांपासून कुणीही बोध घेतला नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध मालिकेत ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्याला कसोटीसारखी आणि एकदिवसीय सामन्याला ट्वेंटी-20 सामन्याला साजेशी खेळपट्टी देण्यात आली.

  क्रिकेटपटूंची संख्या बीसीसीआयमधून घटायला लागल्यापासून अशा घटना वाढायला लागल्या आहेत. प्रत्येक खेळाच्या संघटनांमध्ये काही टक्के खेळाडूंचा सहभाग, समावेश असायला हवा हे खरे आहे; मात्र सरकारच्या या आग्रहालाही सर्व संघटनांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. क्रिकेट संघटना त्या सर्वांमध्ये आघाडीवर आहे.

Trending