आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमधील चक्रीवादंळ ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या एकाधिकारशाहीच्या विरोधात, लोकशाही आणि सेक्युलर विचारासाठी इजिप्तच्या जनतेने दोन वर्षांपूर्वी होस्नी मुबारक यांना सत्तेवरून दूर केले होते आणि ज्या जनतेने लोकशाही मार्गाने नवे सरकार निवडून दिले होते, त्याच जनतेने त्यांचे सरकार लोकशाही आणि सेक्युलर मूल्यांच्या विरोधात असल्याच्या कारणावरून उलथवून टाकले आहे. पण हे करताना त्यांना लष्कराची मदत घ्यावी लागली आहे. इजिप्तच्या जनतेने लष्करशाहीच्या माध्यमातून धर्माची एकाधिकारशाही धुडकावण्याचा प्रयत्न केला; पण या देशात लोकशाही कशी प्रस्थापित होणार हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे. इजिप्तमधील ही ऐतिहासिक घटना केवळ अरब जगताला धडा नव्हे, तर जगातील सर्व धार्मिक कट्टरतावादी संघटनांसाठी धोक्याचा इशारा ठरू शकते. केवळ एक वर्षापूर्वी इजिप्तच्या अध्यक्षपदी मोहंमद मुर्सी सर्वाधिक मतैक्याने निवडून आले होते. त्यांना त्या वेळी सुमारे 51 टक्के मते मिळाली होती.

मुर्सी यांचा हा विजय म्हणजे त्यांना इजिप्तच्या सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आहे, असा अर्थ त्या वेळी काढला जात होता. मुर्सी यांनीही अध्यक्षपदाची शपथ अध्यक्षीय प्रासादात न घेता लोकशाही क्रांतीचे स्फुल्लिंग राजधानी कैरोच्या ज्या तहरीर चौकात फुलले होते तेथे घेऊन देश लोकशाही, सेक्युलर आणि आधुनिकतेच्या मार्गाने जाईल, असे वचन लक्षावधी इजिप्तच्या नागरिकांना दिले होते. पण काही महिन्यांतच मुर्सी यांनी इतरांना डावलून आपल्या हातात सर्व अधिकार घेण्यास सुरुवात केली. मुर्सी यांचे सरकार ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या कट्टर इस्लामिक पार्टीच्या बळावर उभे असल्याने या पक्षाच्या अजेंड्यावर सरकारची वाटचाल सुरू राहिली. मुस्लिम ब्रदरहूडचा रक्तरंजित इतिहास हा इजिप्तमधील सामान्य नागरिकांना माहीत असल्याने धर्मांध शक्तींच्या हातात सत्ता केंद्रित झाल्यावर सेक्युलर विचारांना बासनात बांधणारी, अल्पसंख्याकांच्या मनात भय निर्माण करणारी सत्ता आल्याने जो असंतोष अपेक्षित होता तो इजिप्तमध्ये उफाळून आला आणि असंतोषाने मुर्सी यांच्या सरकारचा बळी घेतला.

बुधवारी संध्याकाळी इजिप्तच्या लष्कराने मुर्सी यांना हटवून हंगामी सरकारची स्थापना केली आणि तहरीर चौक आणि संपूर्ण देशात निर्माण झालेली अस्थिरता आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. पण इजिप्तमधील हे नाट्यमय सत्तांतर या देशाला कोणत्या मार्गावर घेऊन जाणार, याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये मतमतांतर असले तरी ही घटना अरब राष्ट्रांमध्ये आलेल्या सेक्युलर लाटेचे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. सेक्युलर, लोकशाही आणि विचाराचे स्वातंत्र्य आम्हाला मिळावे, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ही मागणी इजिप्तच्या भूमीवरून येणे हे ऐतिहासिक मन्वंतर म्हटले पाहिजे. कारण दुस-या महायुद्धानंतर इजिप्त नासेर, सादार आणि मुबारक यांच्या कारकीर्दीत पुरोगामी झाला व त्याने प्रगतीची कास धरली; पण दुसरीकडे याच इजिप्तमध्ये मुस्लिम कट्टरतावाद जन्मास आला. अमेरिका, इस्रायल व इतर युरोपीय देशांच्या विरोधातल्या दहशतवादाला वैचारिक अधिष्ठान इजिप्तमधून मिळाले.

होस्नी मुबारक यांच्या काळात इजिप्त इस्लामी कट्टरतावादाच्या विळख्यापासून दूर होता; पण इजिप्तच्या जनतेला मुबारक यांच्या एकाधिकारशाहीचा वीट आला होता. इजिप्तच्या तरुणाला व्यक्तिस्वातंत्र्याची हमी हवी होती. त्याला लोकशाही आणि सेक्युलर सरकारची गरज वाटू लागली. त्यातच अरब जगतातील राजकारणात इस्लामी संघटना आक्रमक झाल्याने इजिप्तमध्ये इस्लामी राजकारणाला बळ मिळू शकते, हा धोका इजिप्तमधील सामान्य नागरिकाने ओळखला होता. एकट्या इजिप्तमध्ये नव्हे, तर इतर अरब राष्ट्रांमध्येही सध्या इस्लामी संघटना आणि लोकनियुक्त सरकार यांच्यातील संघर्ष पेटलेला दिसतोय. गेले दीड वर्ष यादवीमध्ये होरपळत असलेल्या सिरियामध्ये सेक्युलर असाद सरकारच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष हा बंडखोर इस्लामी संघटनांकडून आहे. लिबियामध्येही इस्लामी राजवट आणण्यासाठी संघर्ष सुरू आहे. इराणमध्ये नुकतेच झालेले सत्तांतर हे मवाळ इस्लामी धारेतील आहे, तर गाझापट्टीत कट्टरतावादी हमासला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ट्युनिशियात मुस्लिम ब्रदरहूडचे वर्चस्व आहे. तेथेही या संघटनेला विरोध होत आहे. इजिप्तमध्ये राजकीय अशांततेतून सत्ता मिळाल्यानंतर मुस्लिम ब्रदरहूडने लोकशाहीचा बुरखा सुरुवातीला घेतला होता. मुस्लिम ब्रदरहूडच्या नेत्यांचे असे म्हणणे होते की, आम्ही कट्टरतावादी असलो तरी इजिप्तच्या जनतेने स्वखुशीने आम्हाला निवडून दिले आहे आणि आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून आलो आहोत. थोडक्यात, आम्ही लोकशाहीवादी आहोत. पण धार्मिक विचारसरणीचा पाया असणा-या राजकीय पक्षांचे छुपे अजेंडे वेगळे असतात. सत्तेवर आल्यानंतर ते त्यांचे रंग दाखवू लागतात. मुर्सी यांच्याबाबतीत तसेच झाले झाले. त्यांनी अधिकारांचे केंद्रीकरण करण्याबरोबर स्त्री आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांवर निर्बंध आणण्यास सुरुवात केली. त्यांनी डावे, उदारमतवादी, सेक्युलर, अल्पसंख्याक यांना सत्तेपासून दूर ठेवण्यास सुरुवात केली. मुस्लिम ब्रदरहूडने सरकारमधील सर्व खात्यांमध्ये आपले पाठीराखे घुसवले. पदे, अधिकार, सत्ता ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले.

धार्मिक व फॅसिस्ट विचारसरणीच्या संघटना या प्रथम नोकरशाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. नोकरशाहीच्या ताब्यात आल्यानंतर सत्ता निरंकुश राहत असते. मुर्सी यांनी तसा कारभार सुरू ठेवला. पडद्याआड मुस्लिम ब्रदरहूड असल्याने व या संघटनेचे इजिप्तमध्ये सर्वदूर जाळे पसरले असल्याने आपल्या सरकारला धोका नाही, अशा भ्रमात ते होते. पण हा भ्रम जनतेमध्ये नव्हता. जनतेने त्यांना वेळोवेळी जागे करण्याचे प्रयत्न केले. लोकशाही मार्गाने आंदोलने केली. अखेर जनतेचा संयम सुटला व ती लाखोच्या संख्येने तहरीर चौकात जमू लागली. या जनतेमध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने लष्करही मुर्सी यांच्याविरोधात गेले व त्यांनी दबाव आणून देशात हंगामी सरकारची स्थापना केली. इजिप्तच्या लष्कराने मुर्सी यांना जबरदस्तीने सत्तेवरून दूर करताना इस्लामी संघटनांना लोकशाही प्रक्रियेत स्थान नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. हा इशारा अरब जगतातील स्थैर्याच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा आहे, तितका आपल्यालाही महत्त्वाचा आहे.