आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दि. बा.पाटील : लढवय्या लोकप्रतिनिधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त महाराष्‍ट्राच्या लढ्यातील एक ज्येष्ठ नेते, जनतेच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करणारे व विधिमंडळात नागरिकांच्या प्रश्नावर सर्व संसदीय आयुधांचा वापर करून सत्तारूढ पक्षाला जेरीस आणणारे दि. बा.पाटील हे ख-या अर्थाने लढवय्ये होते. शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून आणि नंतरच्या काळात सतत संघर्ष करणारे दि. बा. पाटील यांचा संसदीय कालखंड हा ख-या अर्थाने अविस्मरणीय होता.


विधिमंडळाच्या उभय सभागृहांचे ते विरोधी पक्षनेते होते. त्यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा कालावधी अविस्मरणीय होता. या कालावधीत त्यांनी सभागृहात केलेला संघर्ष हा अलीकडच्या काळातील मोठा संघर्षच होता. ते संसदेतही एकदा जाऊन आले. 1977 मध्ये काँग्रेसविरोधी लाट होती तेव्हाही ते निवडून आले आणि पुढे 1989 मध्येही निवडून आले. विधानसभा आणि विधान परिषदेत ते बराच काळ राहिले, पण जेव्हा जेव्हा ते विधिमंडळाच्या उभय सभागृहांत आले तेव्हा त्यांना राज्यात झालेल्या सत्तांतराचा फायदा मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा कालावधी हा तसा लोकांच्या लक्षात राहताना मंत्रिपदाची झूल नसलेले दि. बा. अशीच त्यांची ओळख आहे. राज्यात पहिल्यांदा पुलोदचे सरकार आले तेव्हाही त्यांना संधी मिळाली नाही आणि नंतर आघाडी सरकारची स्थापना झाली तेव्हाही त्यांना मंत्रिपदावर येता आले नाही. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी विधिमंडळाच्या उभय सभागृहांत भ्रष्टाचारावर कडाडून टीका केली. 288 भूखंडाचा विषय गाजत असताना त्यांनी सरकारवर केलेली टीका कायम जनतेच्या लक्षात राहिली.

पनवेलमधील सिडकोच्या संदर्भात दिलेला लढा हा तर त्यांचा अविस्मरणीय कालावधी होता. या विषयावर त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष कायम ठेवला. सिडकोच्या जमिनीला योग्य भाव मिळावा, शेतक-यांचे प्रश्न सुटावे, नागरिकांच्या प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी ते अखेरपर्यंत लढले. एवढेच नव्हे, तर तेथील जमिनीला योग्य भाव मिळण्यासाठी त्यांनी काढलेला मोर्चा आजही महाराष्‍ट्रातील जनतेच्या लक्षात आहे.


प्रथम ते 1957 मध्ये विधानसभेवर निवडून आले. पनवेल हा त्यांचा मतदारसंघ होता. 1957, 62,67,72 आणि त्यानंतर पुन्हा 1980 मध्ये विधानसभेवर निवडून आले. सलग पाचदा ते विधानसभेवर निवडून आले. 1977 मध्ये ते कुलाबा मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते. त्यानंतर 1980-85 ते विधानसभेत राहिले. दि. बा.पाटील, 7 एप्रिल, 1972 ते जुलै, 1977 24 डिसेंबर, 1982 ते 14 डिसेंबर, 1983 या कालावधीत ते विरोधी पक्षनेते होते. 1992 ते 1998 या कालावधीत ते विधान परिषदेचे गटनेते होते. या कालावधीत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी ख-या अर्थाने सांभाळली. 1957 ते 1972 पर्यंतचा कालावधी संघर्षाचा होता. एकाहून एक महान नेते सभागृहात होते. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यासारखी नामवंत मंडळी सभागृहाचे नेतेपद सांभाळत होती. जनतेच्या प्रश्नावर संघर्ष होत असताना दि. बा.पाटील यांनी कधीही आपला तोल ढळू दिला नाही. नेत्यांवर आरोप करताना कंबरेखाली वार केला नाही. शब्द कठोर वापरले, सरकारचा भ्रष्टाचार उघडा केला, दंगली, गोळीबार, जमीन सुधारणा यासारख्या विविध विषयांंवर त्यांची भाषणे गाजली. नागरी समस्येवर सरकारला खेळवून ठेवले, महागाई, बेकारी, शेती मालाला भाव हे त्यांचे आवडते विषय असायचे. या विषयावर भाषण करताना ते कोणाचाही मुलाहिजा करीत नसत.


दि.बा.पाटील यांनी सभागृहात कधीही बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला नाही. ते सातत्याने बाळ ठाकरेच म्हणायचे. मात्र, असे म्हणताना त्यांच्याविषयी अनादर होत नसे. हिंदुत्वाच्या भूमिकेवर त्यांनी कडाडून हल्ला केला होता. काळाचा महिमाच वेगळा. त्यात दि.बा.पाटील यांनी आपल्या नंतरच्या आयुष्यात शिवसेनेत प्रवेश केला. तो का केला आणि त्यातून नंतर ते अलिप्त का राहिले हे कोडे अजूनही सुटलेले नाही. संयुक्त महाराष्‍ट्राचा लढा असो की शेतक-यांच्या जमिनीचा प्रश्न असो, सेझ सारखा विषय असो की, वैधानिक विकास मंडळाची मागणी असो. सीमा प्रश्न तर कायमच त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. असे असतानाही आणि त्यात बिनीचे कार्यकर्ते असतानाही त्यांनी शिवसेनेत प्रवेश का केला ते कळू शकले नाही. सीमा प्रश्नाविषयी शेकाप पक्षाची जी भूमिका होती तीच दि.बा.पाटलांची कायम राहिली. शिवसेनेत गेले तरी त्यांनी आपली भूमिका सोडली नाही आणि शिवसेनेतून निष्क्रिय म्हणून बाहेर राहिले तरी आपल्या भूमिकेत बदल केला नाही. विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे वार्तांकन करताना दि. बा.पाटील यांच्या आठवणी तत्कालीन पत्रकारांच्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. त्यांची विविध विषयांवरची भाषणे अविस्मरणीय तर आहेतच शिवाय त्यांच्या शब्दातील जरब आणि विषयाची फेक ही जीवघेणी असायची. ते बोलायला उभे राहिले म्हणजे मंत्र्यांना सगळ्या बाजूंनी हल्ला करून जेरीस आणायचे, पण कधीही कंबरेखाली वार किंवा शब्दाने हृदयाला ओरबाडणे असे व्हायचे नाही. त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांचा कालावधी पाहिला. राज्यातील राजकीय उतार-चढाव पाहिले. शिवसेना-भाजप युतीचे सत्तांतर पाहिले, पण ते कुठेही डगमगले नाही. आपल्या शब्दांची तलवार कधीही बोथट होऊ दिली नाही. त्यामुळे महाराष्‍ट्रात त्यांना एक लढवय्या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखतो.