आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित पँथर पुन्हा उभी राहावी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर सोळा वर्षांनी म्हणजे 9 जुलै 1972 रोजी दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना झाली. दलित पँथरच्या स्थापनेची पार्श्वभूमी होती ती खेडोपाडी दलित समाजावर होत असलेले अन्याय, अत्याचार, दलित समाजावर अत्याचारांना वाचा फोडणारी संघटना तेव्हा अस्तित्वात नव्हती.


शिक्षण आंबेडकरी विचारधन यामुळे दलित सुशिक्षित वर्गात आत्ससन्मानाची भावना प्रबळ झाली होती. दलित समाजाला भेडसावणारे प्रश्न स्वातंत्र्याच्या पंचवीस वर्षांनंतरही सुटले नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारा रिपब्लिकन पक्ष मात्र सत्ता, स्वार्थ तडजोडीत गुरफटला होता. दलितांना सामाजिक न्याय मिळवून देणारी व जातिअंताच्या प्रश्नावर प्रखरपणे लढणारी संघटना असणे ही त्या काळाची गरज होती. त्यातून दलित पँथरचा उदय झाला. दलित पँथरच्या पार्श्वभूमीचा विचार करता अजून एक बाब लक्षणीय ठरते ती अशी की, 1956 नंतर दलित साहित्याच्या चर्चेला तोंड फुटले होते. डॉ. म. ना. वानखेडे हे अमेरिकेत जाऊन आले होते. तिथे त्यांनी ब्लॅक मूव्हमेंट व त्यांचे विद्रोही (ब्लॅक लिटरेचर) साहित्याचा अभ्यास केला होता. त्यांच्या पे्ररणेने ब्लॅक लिटरेचर, ब्लॅक पॉवर, ब्लॅक पँथर अशा विषयांवर चर्चा झडू लागल्या.


दलित साहित्याच्या संकल्पनेचा उदय यातूनच झाला. महाड येथे याच काळात पहिले दलित साहित्य संमेलन झाले होते. महाविद्यालयातून शिक्षण घेणारे तरुण शहरा-शहरांत संघटित झाले होते. प्रत्येक महाविद्यालयात रिपब्लिकन विद्यार्थी संघटना स्थापन झाल्या होत्या. या संघटनांतून दलित विद्यार्थी सामाजिक प्रश्नांवर संघर्ष करीत होते, पण या सर्व चळवळी सुट्या होत्या. दलित पँथरच्या स्थापनेपूर्वी नामदेव ढसाळ (प्रजा समाजवादी), राजा ढाले (दलित युवक आघाडी), भाई संगारे (काँग्रेस), गंगाधर गाडे, टी. एम. कांबळे (रिपब्लिकन विद्यार्थी संघटना) हे वेगवेगळ्या संघटनांतून काम करीत होते. मुंबईच्या सिद्धार्थ विहार होस्टेलमधील विद्यार्थ्यांचा पँथरच्या स्थापनेत मोलाचा वाटा होता. दलित पँथर ही संघटना वाढवण्यात व नावारूपाला आणण्यात नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले, लतीफ खाटीक, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, रामदास आठवले, गंगाधर गाडे, अरुण कांबळे, प्रीतमकुमार शेगावकर, प्रल्हाद चेंदवणकर, भाई संगारे, टी. एम. कांबळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील असीम श्रद्धा, दलित समाजाविषयीचा अपार जिव्हाळा, सामाजिक विषमतेविरुद्ध पेटून उठलेले तरुण यामुळे दलित पँथर ही संघटना थोड्या कालावधीत नावारूपाला आली. पँथर्सची बेदरकार भाषणे, गर्दी खेचणा-या वादळी सभा, हाणामारी, मोर्चे, पोलिस केसेस यामुळे लोकांचे लक्ष दलित पँथरने खेचून घेतले. ठिकठिकाणी दलित पँथरच्या छावण्या स्थापन झाल्या. पँथरच्या सभा गाजू लागल्या. पँथर्स हिंदू देवदेवतांना भर सभेत शिव्या देत होते. रिपब्लिकन नेत्यांच्या नाकर्तेपणावर तुटून पडले होते. विद्रोह हे पँथरचे मुखपत्र ज. वि. पवार, नामदेव ढसाळ हे चालवत होते. दलित पँथरचे कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या अपरिपक्व जरी असले तरी त्यांचा आवेश दांडगा होता. वरळीची दंगल, गीतेचे दहन, शंकराचार्यांवर फेकलेला जोडा, शिवसेनेबरोबर झालेल्या मारामा-या यामुळे दलित पँथरने समाजजीवनात आपला एक दबदबा निर्माण केला.


दलित पँथरने सामाजिक अन्याय, अत्याचाराचा जसा प्रखरपणे मुकाबला केला तद्वतच नामांतर आंदोलनातही पुरुषार्थ गाजवताना मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी म्हणूनही आकाश-पाताळ एक केले होते, पण का कोण जाणे दलित चळवळीस जो एक फाटाफुटीचा शाप आहे त्याची लागण पँथरलाही झाली व आंबेडकरवाद की मार्क्सवाद या मुद्द्यावरून पँथर फुटली. अर्थात या वादाबरोबरच पँथर्सचे वैयक्तिक हेवेदावेही होते, पण काही जरी असले तरी दलित पँथरने महाराष्ट्राच्या समाज जीवनात आपल्या जहाल कृतीने जो एक वचक निर्माण केला होता तो पँथर्सनी आपल्या करंट्या नि नाकर्त्या वर्तनाने घालवला. थोडक्यात पँथर्सही रिपब्लिकन नेत्यांच्याच मळलेल्या वाटेने गेले व त्याचे होत्याचे नव्हते होऊन बसले.


जागतिकीकरणाच्या लाटेत आज दलित शोषित-कष्टकरी समाजाचे जगण्या-मरण्याचे प्रश्न जिवंत झाले आहेत. दलित समाजावर सामाजिक अन्याय, अत्याचार होतच आहेत. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या सर्वच संस्था घाणेरड्या राजकारणापायी आज रसातळाला जात आहेत. अशा वेळी पँथरसारखे लढाऊ संघटन अस्तित्वात असणे गरजेचे होते.
दलित पँथरच्या स्थापनादिनी सर्व दलित संघटनांनी आता असा विचार करायला हवा की, आपण सर्वच जर स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेतो तर आपण एकत्र का येऊ शकत नाही. आज स्थिती अशी आहे की, प्रत्येकजण स्वत:ला नेता म्हणवितो. नेतृत्व मिरवण्यासाठी दलित पुढा-यांत, त्यांच्या अनुयायांत चक्क हाणामा-या होतात, पण हे सारे हेवेदावे संपून दलित पँथरसारखी लढाऊ संघटना परत एकदा कार्यरत होणे ही दलित आंबेडकरी चळवळीची खरी गरज आहे.
आंबेडकरवाद प्रमाण मानून जे पँथर्स एकेकाळी लढले, झुंजले त्याच्या आता शेळ्या झाल्या आहेत. आंबेडकरवादाचा ज्वलंत, जहाल लढवय्या अविष्कार ज्यांनी घडवला होता ते मातोश्रीच्या चरणी विलीन झाले आहेत. बाबरी मशीद पाडणा-या, नामांतरास विरोध करणा-या भारतीय राज्यघटना बदलावयास निघालेल्या व हिंदुत्ववाद्यांच्या गळ्यात गळे घालीत आहेत. काही पँथर्स शरद पवारांच्या राष्‍ट्रवादी काँग्रेसची वकिली करीत आहेत. काही काँग्रेसच्या तंबूत डेरेदाखल होऊ इच्छित आहेत, तर काही भाजपच्या आश्रयाला जाऊ पाहत आहेत. ज्या पँथर्सनी एकेकाळी रिपब्लिकन पुढा-याच्या नाकर्तेपणाविरुद्ध बंड पुकारले होते. तेच पँथर आज वेगवेगळ्या तंबूत शिरून रिपब्लिकन पुढा-याच्याच तडजोडीचा सौदेबाज कित्ता गिरवत आहेत. दुसरीकडे रिपब्लिकन पुढा-याच्या तडजोडी, पँथर्सची बेईमानी पाहूनही आजची तरुण पिढी दलित चळवळीस पर्यायी नेतृत्व देण्याच्या मन:स्थितीत नाही. ही खरी आंबेडकरी चळवळीची शोकांतिका आहे. तरीही आपण आशा करूयात की, दलित पँथरच्या वर्धापनदिनी सर्व पँथर्सना उपरती होऊन ते पुन्हा एकदा दलित पँथरची नव्याने उभारणी करतील. आंबेडकरी चळवळीची ही खरी गरज आहे. दुसरे काय ?