आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधार फार झाला...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिथं गणपती दूध पितो तिथं हे स्वाभाविक आहे. जिथल्या शाळा-कॉलेजात सत्यनारायण घातला जातो तिथल्या समाजातील हे भयाण विदारक सत्य आहे. भोंदूगिरीला जिथे प्रतिष्ठा मिळते तिथे वेगळे काय घडणार! बुवाबाजी हा जिथे रोजगार बनतो तिथे हे नैसर्गिक आहे आणि जिथे ज्योतिषाचे शास्त्र बनते त्या समाजाला भविष्यच नाही. हे धक्कादायक आहे पण पूर्णपणे अनपेक्षित नाही. जिथे अंधश्रद्धांची अशी पेरणी झाली आहे की सा-या रानात पीक तरारून आलंय. याचा लख्ख ढळढळीत पुरावा म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या!


अंधश्रद्धेविरुद्ध, अविवेकाविरुद्ध लढणा-या दाभोलकरांचा खून होणं ही भयानक घटना आहे. स्तंभित करणारी घटना आहे. पण या मातीत हा विखार पेरला गेला तेव्हा आपण फक्त पाहत राहिलो. आपण त्याचे मूक साक्षीदार राहिलो केवळ. ते मात्र पसरत राहिले. त्यांचा विद्वेष फोफावत राहिला. त्यांनी हल्ले केले. आपण शांतच होतो. त्यांनी झेंडे जाळले, नवे हातात घेतले. आपण जाणीवपूर्वक दुर्लक्षिले. ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’ असा प्रश्न पडला काहींना. पण सन्नाटा तसाच राहिला. ते आले. ओरडले. किंचाळले. आपण समजलेच नाही असा भाव चेह-यावर आणला. पण त्यातून समस्या आणखी गंभीर झाली.


आपण त्यांच्या किंचाळण्याकडे, आक्रस्ताळेपणाकडेही दुर्लक्ष केले आणि किंकाळ्याकडे, अस्फुट हुंकारांकडेही कानाडोळा केला. त्या सा-याचा परिपाक म्हणजे आजचे हे विकृत भयानक वास्तव जे स्वप्न पाहायचीही मुभा देत नाही. स्वप्नांवर अशी दहशत बसावी याच्याइतके ‘दुर्दैव’ ते कोणते? स्वप्नांच्या संज्ञाप्रवाही मार्गात अशी नाकेबंदी व्हावी यापेक्षा लांच्छनास्पद काय असू शकते? नितळ पाण्याला विषारी वास यावा आणि शुभ्र निरभ्र आभाळात मेघांचेच मळभ निर्माण व्हावे. किती अकल्पित दु:स्वप्न आहे हे ! ढसाळांनी एका कवितेत म्हटलं आहे, ‘डोळे धुऊन घ्यावेत असे पाणीच नाही इथे.’ त्यामुळे कचरा गेलेल्या या डोळ्यांनी दिसणारा हा कलुषित आसमंत. तिथे विवेक नावाची गोष्टच अप्राप्य होते. पकडता येत नाही विवेकाला. एवढे सोपे थोडेच आहे ते! हेमलॉकचा प्याला रिचवायची ताकद अंगात निर्माण झाल्याशिवाय ते शक्य नाही. मंबाजींशी मुकाबला करण्याचे बळ आल्याखेरीज विवेकाची भेट नाही. नथुराम जिवंत असल्याची जाणीव असून निर्भीड जगण्याची वृत्ती अंगी बाणवल्याशिवाय रचनात्मक सर्जनशील विद्र्रोह शक्य नाही. विवेकाची भेट दुरापास्त आहे, अवघड आहे म्हणून स्वस्तात अविवेकाला खरेदी करणा-या या समाजात विवेकाचा तुटवडा. असहिष्णू बनलेल्या समाजवास्तवाच्या हिमनगाचं हे दृश्य टोक! हरवत चाललेल्या माणूसपणाचा हा पुरावा. लोकशाही मूल्यांच्या पायाभरणीतच काही गडबड झाली असावी अशी शंका घ्यावी असा हा शोककळा पसरलेला माहोल. हा भवताल शिसारी आणणारा. विलक्षण किळसवाणा!
‘दाभोलकरांची हत्या होऊन त्यांना आलेला मृत्यू ही ईश्वराने केलेली कृपाच होय’ असं म्हणणारी गेस्टापूंची फौज जिवंत आहे.

अनिल बर्व्यांच्या ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ या नाटकात एक संवाद आहे- ‘गेस्टापू माणसं नव्हती; माणसं गेस्टापू असतात.’ या संवादाची आठवण व्हावी असं सारं घडतं आहे. माणसांचं गेस्टापकरण झालं की माणसं ‘माणसं’ नव्हतीच कधी? हिंसेचं सॉफ्टवेअर इनबिल्ट असलेली ही सॉफ्टवेअर्स आहेत की काय? असतील तर इतक्या सहजपणे इन्स्टॉल कशी झाली इथल्या मातीत? तोंडात रामाचे नाव घेत असताना बाजूला नथुराम आहेत याची आपणाला जाणीवही नव्हती. अयोध्येचा पुन्हा जप सुरू झाल्यावर तरी आपल्या हे ध्यानात यायला हवे होते. मोदीफिकेशनच्या झंझावातात आपल्या महाराष्‍ट्रातील मातीही इतकी भगवी व्हावी की दाभोलकरांसारख्या संयत सहिष्णू माणसाची हत्या व्हावी !


अंधाराचे मार्केटिंग जास्त होते असे दाभोलकर म्हणायचे; पण या अंधाराला भयाण विद्रूप कंटेंट पुरवला जात आहे, जो आपणा सर्वांची मनंच करप्ट करतो आहे. आपले अवघे जगणेच प्रक्षिप्त करून टाकतो आहे. हा अविवेकाचा विषाणू पसरू देता कामा नये. तो समूळ उखडून टाकायला हवा. जे गाडगेबाबांनी केले ते पुन्हा करावे लागेल. सर्वसामान्य लोकांच्या भाषेत विवेकाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. दाभोलकरांनी ही फार मोठी जबाबदारी आपणा सर्वांवर टाकली आहे. विवेकाची ज्योत सांभाळणे मोठे कठीण ! या ज्योतीचे मशालीत रूपांतर करणे हे खडतर आव्हान आहे. बुद्धांनी विवेकासाठी अत्यंत समर्पक असा शब्द योजिला होता ‘प्रतीत्यसमुत्पाद’. या प्रतीत्यसमुत्पादासाठी लढण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या भाषेत विवेककारण करण्याची गरज आहे. हे विवेककारण आपली
सामाजिक परिसंस्था आरोग्यदायी करण्यासाठी गरजेचे आहे. गोळ्या घालून दाभोलकर मरतील ही त्यांची आणखी एक अंधश्रद्धा आहे. आपण सर्वजण मिळून ही अंधश्रद्धा दूर करूया.