आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कर्ता’ स्वातंत्र्यसेनानी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे हे 101 वर्षांचे दीर्घायुष्य जगले. ब्रिटिशांच्या जोखडात अडकलेल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी पायतळी अंगार ठेवून वाटचाल करणार्‍या देशभक्तांचा तो काळ होता. दत्ताजी ताम्हणेही त्यांच्यापैकीच एक होऊन गेले. ठाणे शहरातून आपल्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ करणार्‍या ताम्हणे यांनी 1919च्या सुमारास लोकमान्य टिळकांची भेट घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले होते. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाल्यानंतर महात्मा गांधी युगाचा उदय झाला. त्या वेळी दत्ताजी ताम्हणे यांनी गांधीवाद व समाजवादी विचार यांचा मेळ घालून आपल्या आंदोलनांना दिशा दिली. सरकारी नोकरी न करता तसेच आजन्म अविवाहित राहण्याचा निश्चय करून दत्ताजी ताम्हणे यांनी आपले सारे आयुष्य देशकार्यासाठी वेचायचे ठरवले ते याच काळात. ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान दत्ताजी ताम्हणे यांना दोन वर्षांचा कारावासही भोगावा लागला होता. देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र समाजातील तळागाळातले लोक जिथल्या तिथे राहिले. या लोकांची कड घेऊन दत्ताजी ताम्हणे पुन्हा संघर्षाच्या मैदानात उतरले. ठाणे जिल्ह्यातील जंगल कामगार, आदिवासी यांच्या हक्कांसाठी त्यांनी लढे उभारले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तिसंग्रामातही ते सहभागी झाले होते. याबाबत त्यांची नाळ सेनापती बापट यांच्या आंदोलकवृत्तीशी जुळणारी होती. विधान परिषदेत 1968 मध्ये निवडून आल्यानंतर ताम्हणे यांनी तिथे बजावलेली कामगिरी संस्मरणीय ठरली होती. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व अंगी बाणवून समाजकारण, राजकारण करणारे दत्ताजी ताम्हणे हे गेल्या तीन दशकांत राजकारणात जातीय प्रवृत्तींचा प्रभाव वाढत असल्याचे पाहून अस्वस्थ झाले होते. महाराष्ट्रात महिलांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा व्हावी, त्यांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून झटलेल्या महर्षी धोंडो केशव कर्वे हे शतायुष्यी ठरले होते. दत्ताजी ताम्हणे यांनाही हे भाग्य लाभले. बोलभांडपणा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणारे दत्ताजी ताम्हणे हे खर्‍या अर्थाने ‘कर्ता स्वातंत्र्यसेनानी’ होते. त्यांचे कार्य नेहमीच सर्वांना प्रेरणा देत राहील.