आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानोदय(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अस्थिर राजकीय आणि आर्थिक वातावरणात धोका पत्करण्यापेक्षा अनुभवी आणि विश्वासार्हतेची हमी देणा-या टोकियोची 2020च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी निवड करून आयओसीने सुज्ञपणा दाखवला. विशेषत: सोची (रशिया) आणि रिओ दि जानेरिओ (ब्राझील) यांना यजमानपद देताना पत्करलेल्या धोक्याची जाणीव आयओसीला आतापासूनच होऊ लागली आहे. माद्रिद (स्पेन) आणि सामाजिक अस्थिरतेच्या अनुभवातून चाललेल्या इस्तंबूल (तुर्कस्तान) यांना मागे सारून सदस्यांनी टोकियोवर (जपान) विश्वास टाकला. ऑलिम्पिक खेळ आणि चळवळ जपानच्या हातात अधिक सुरक्षित राहील, याची हमी यजमानपदाच्या अखेरच्या प्रयत्नात देणा-या जपानने अखेरच्या क्षणी बाजी मारली. दोन वर्षांपूर्वी फुकुशिमा येथील अणुगळती, सुनामी आणि भूकंप याचे पडसाद आयओसीच्या मतांवर उमटले होते. दोन वर्षांपूर्वी अवघी 20 मते मिळवणा-या टोकियोने अंतिम निवडीच्या क्षणी या वेळी मात्र इस्तंबूलला मागे टाकताना 60 विरुद्ध 36 अशी मते मिळवली. माद्रिद पहिल्या फेरीत बाद झाल्यानंतर इस्तंबूलला यजमानपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

फुकुशिमा येथील अणुभट्टीतील दूषित पाण्याचा संसर्ग हा टोकियोच्या मार्गातील मोठा अडसर ठरू शकेल, याची जाणीव असलेल्या जपानच्या पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी अंतिम प्रयत्नांच्या वेळी ‘फुकुशिमा’ परिस्थिती आता नियंत्रणाखाली असून टोकियो शहराला धोका नव्हता आणि यापुढेही नसेल, याची जाहीर हमी दिली. या हमीमुळेच आयओसीच्या सदस्यांचे मतपरिवर्तन झाले असावे. अगदी अखेरच्या क्षणापर्यंतदेखील टोकियो 2020च्या यजमानपदासाठी पहिल्या क्रमांकावर कधीही नव्हते. स्पेन आणि तुर्कस्तानमधील विद्यमान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जपानच्या अखेरच्या सादरीकरणाने सर्व जण प्रभावित झाले. जपानच्या पंतप्रधानांची सुरक्षिततेची हमी, टोकियोच्या महापौरांचे परिपूर्ण तयारीचे भाषण आणि सर्व सदस्यांच्या हृदयाला हात घालणारे ‘मामी साटो’ या अपंग खेळाडूचे आवाहन, याचा हा परिणाम होता.

मामी साटो ही मूळची धावपटू. वयाच्या 19व्या वर्षी कर्करोगामुळे तिला पाय गमवावे लागले. ‘‘खेळाने मला जगवले. कर्करोगावर मात करून मी उभी राहिले. अथेन्स व बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकले. लंडन ऑलिम्पिकची तयारी करत असतानाच आलेल्या सुनामीमध्ये माझे गावच उद्ध्वस्त झाले. मी जगले परंतु माझे कुटुंब राहिले नाही. देशाच्या नुकसानापुढे माझे नुकसान मोठे नव्हते. परंतु त्या वेळी जपानच्या हजारो खेळाडूंनी सुनामीग्रस्तांसाठी बरेच काही केले,’’ असे उद्गार मामी साटोने काढले. तिच्या उद्गारांमुळे ऑलिम्पिक चळवळीचा, ब्रीदवाक्याचा, नीतिमूल्यांचा कधी नव्हे एवढा प्रभाव आणि परिणाम या वेळी पाहायला मिळाला. दुसरीकडे प्रसिद्धिमाध्यमांद्वारे आयओसीची 50 मते आपल्या खिशात असल्याच्या वावड्या उठवणारे माद्रिद शहर अचानक मागे पडायला लागले.

स्पेनची बिकट आर्थिक परिस्थिती, नवनवे आर्थिक घोटाळे यामुळे आयओसी सदस्यांची मते जपानच्या पारड्यात पडली. सलग पाचव्यांदा यजमानपदासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे इस्तंबूल शहर जपानपेक्षा खूपच आघाडीवर होते. तुर्कस्तानचे शेजारी राष्ट्र सिरिया यादवीत होरपळत असताना त्याची झळ इस्तंबूलच्या प्रयत्नांना पोहोचली. अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या तिन्ही शहरांनी गेल्या दशकात प्रत्येक वेळी यजमानपदासाठीचा दावा पेश केला होता. इस्तंबूल त्यांच्यात आघाडीवर होते. एक पाय आशियात तर दुसरा युरोपात असणारा हा देश स्वत:ला युरोपीय म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. दाटीवाटीने वसलेले इस्तंबूल शहर स्पर्धेदरम्यानच्या दळणवळणाच्या सोयीच्या दृष्टीने गैरसोयीचे वाटणे स्वाभाविकच आहे. अरुंद रस्ते आणि शेजारचे धगधगते राष्ट्र यामुळे त्यांची संधी या वेळीही हिरावली गेली. दोन प्रतिस्पर्ध्यांच्या नेमक्या याच कच्च्या दुव्याचा लाभ उठवून टोकियोने जाहिरात केली की त्यांची सर्व प्रमुख स्टेडियम्स पाच मैलांच्या परिघात पसरली आहेत. बहुतेक स्टेडियम्स तयार आहेत, ऑलिम्पिक स्पर्धेचा 4.5 अब्ज डॉलरचा जादा निधी त्यांच्याकडे आहे. या आश्वासनाचादेखील सकारात्मक परिणाम झाला. हिरोशिमा व नागासाकी युद्धाच्या राखेतून उभे राहिले. त्याच जिद्दीने पुन्हा एकदा जपान, टोकियो ऑलिम्पिकसाठी सज्ज होत आहे.

1964 च्या व आशिया खंडातील पहिल्या ऑलिम्पिक यजमानपदाचा अनुभव टोकियोकडे होताच, पण 1994 मध्ये त्यांनी हिरोशिमा येथे एशियाड स्पर्धांचे अप्रतिम आयोजन करून जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आज टोकियोला यजमानपद मिळावे म्हणून त्यांच्यामागे संपूर्ण देश उभा राहिला. ऑलिम्पिक चळवळ केवळ खेळापुरती मर्यादित नाही. ही चळवळ प्रत्येकालाच वेगवेगळी ऊर्जा देते. आर्थिक मंदीमुळे मरगळलेल्या देशाला नव्या आर्थिक स्थैर्याची उभारी देते. 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानला आपली अर्थव्यवस्था सावरण्यास हातभार लावणार आहेत. दीड लाख युवकांना नवे रोजगार मिळणार आहेत. टोकियो शहराच्या विकासाच्या अनेक योजना हाती घेतल्या जाणार आहेत. ऑलिम्पिकशी संबंधित वस्तूंचे आणि अन्य वस्तूंचे ब्रँडिंग होणार आहे. टेलिव्हिजन संचांची जगभरातील वाढलेली विक्री जपानी कंपन्यांच्या तिजोरीत भर टाकणार आहे.

जपानच्या पर्यटन उद्योगास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. उद्योगी माणसांचा हा देश अनेक आव्हानांचा सामना करत पुन:पुन्हा उभा राहतो. या वेळी त्यांच्यासमोर नवी उंची गाठण्यासाठी ऑलिम्पिक यजमानपदाचे निमित्त असेल. 2020 ऑलिम्पिक आयोजनाचे लक्ष्य असेल. प्रत्येक वेळी काहीतरी नवे करून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकच्या यजमानपदावेळी चीनने तमाम विश्वापुढे आयोजनाचा नवा आदर्श निर्माण केला होता. बीजिंगच्या भव्यदिव्यतेमुळे दिपलेल्या नंतरच्या आयोजक ब्रिटनने आपल्या देशातील आगामी ऑलिम्पिक स्पर्धा एवढ्या भव्यदिव्य स्वरूपात करू का, अशी स्वत:बद्दलच शंका व्यक्त केली होती. प्रचंड पैसा आणि मानवी सामर्थ्य यापुढे लंडन थिटे पडले. त्यानंतर दशकानंतर पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धा आशिया खंडातच आल्या आहेत. बीजिंग ऑलिम्पिकनंतर 16 वर्षांनी होणा-या स्पर्धा कशा असतील हे येणारा काळच सांगेल. मात्र त्या रिओ दि जानेरिओपेक्षा निश्चितच वेगळ्या असतील, एवढे मात्र निश्चित.

2018 च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धादेखील आशिया खंडात, दक्षिण कोरियात होणार आहेत. जागतिक क्रीडा क्षेत्राच्या कर्तृत्वाचा, उत्कर्षाचा, आयोजनाचा केंद्रबिंदू आशिया खंड होत चालला आहे. अन्य खंडांपेक्षा अधिक आर्थिक सुबत्ता, सामाजिक स्थैर्य आणि उत्तुंग यशाची हमी आशियाई देशांकडूनच अधिक मिळत चालली आहे. जपानला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. त्यामुळे मरगळलेल्या जपानच्या अर्थव्यवस्थेत पुन्हा ऊर्जितावस्था येईलच. टोकियो या कल्पनेला छेद जाऊ देणार नाही, अशी अपेक्षा करूया.