Home | Editorial | Agralekh | death of kiran and our responsibility

किरणचा मृत्यू आणि आमची जबाबदारी

अभिलाष खांडेकर | Update - Jun 15, 2011, 02:02 AM IST

किरणचं उमलतं आयुष्य त्या नराधम ट्रक ड्रायव्हरने अत्यंत निर्दयपणे एका फटक्यात संपवून टाकलं आणि औरंगाबादकर हळहळत राहिले

  • death of kiran and our responsibility

    किरण दराडे सोमवारी सकाळी घर सोडून, आईचा निरोप घेऊन कोचिंग क्लाससाठी निघाली तेव्हा तिच्या मनात नक्कीच काही स्वप्ने असतील. बारावीत प्रवेश घेऊन लगेचच किरणने ट्यूशन लावली होती. लोक झोपेतून उठलेही नसतील तेव्हा ही होतकरू मुलगी सायकलवरून क्लासला जात होती. निश्चितच तिला शिकून मोठ्ठं व्हायचं होतं, तिच्या मनात तेच स्वप्न तरळत असेल... पण नियतीला ते मान्य नव्हतं. किरणचं उमलतं आयुष्य त्या नराधम ट्रक ड्रायव्हरने अत्यंत निर्दयपणे एका फटक्यात संपवून टाकलं आणि औरंगाबादकर हळहळत राहिले! काळाचे हे क्रौर्य पाहून तुम्हा-आम्हाला हतबल होऊन बसण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. पण खरंचच सगळं दैवावर सोडून चालेल? किरणचं काय चुकलं होतं? तिच्या आई-वडिलांचं काय चुकलं होतं, की त्यांनी तिला शिकायला पाठवलं? किरणचं असं अचानक जाणं औरंगाबादकरांसाठी एक मोठं आव्हान आहे. आपण ते स्वीकारणार आहोत का? असा दुर्धर प्रसंग कोणावरही ओढवू शकतो. या शहरात पुन्हा अशी दुर्घटना होऊ देणार नाही असा निर्धार आपण आज करणार आहोत का? नागरिकांचं संरक्षण ही सरकारची, पोलिस खात्याची प्राथमिक जबाबदारी आहे. पण माणूस घराबाहेर पडतो आणि परत येत नाही, रस्त्यात कोणत्याही भरधाव वाहनाला त्याचा जीव घेण्याची मुभा आहे, हे केवळ भारतातच घडू शकतं. आता त्या ड्रायव्हरवर खटला भरला जाईल, साक्षी-पुरावे व्यवस्थित झाले तर (कदाचित) त्याला शिक्षाही होईल, पण कोवळ्या किरणचं काय? आणि पुन्हा अशी दुर्घटना घडणारच नाही याची शाश्वती काय? या घटनेचा कालांतराने सर्वांनाच विसर पडेल आणि पुन्हा एखाद्या निष्पाप जीवाला अर्ध्या आयुष्यातून उठून जावं लागेल. हे टाळण्यासाठी ठोस काहीतरी करावंच लागेल, सगळ्यांनी मिळून. आजपासूनच. जगात दुसºया कुठल्याही देशात होत नाहीत, एवढ्या दुर्घटना भारतात होतात, लोक हकनाक मारले जातात. 2009 मध्ये देशात अपघातांतील बळींची संख्या 3 लाख 57 हजार 21 एवढी होती. 2005 मध्ये ती 2 लाख 94 हजार 175 एवढी होती. त्यामुळे भारतात माणसाच्या जगण्याला किंमतच नाही, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. औरंगाबाद झपाट्याने वाढतंय. एकीकडे आम्ही मराठवाड्याच्या मागासलेपणावर अश्रू ढाळतो आणि दुसरीकडे मर्सिडीजच्या टिमक्याही वाजवतो, पण या दोन्हींच्या मध्ये जे दुर्दैवी वास्तव आहे ते किरणच्या आकस्मिक मृत्यूने पुन्हा नव्याने उभे ठाकले आहे. आता ही स्वस्थ बसण्याची वेळ नाही. भयानक दुर्घटनेत झालेला किरणचा मृत्यू शहराला हादरवून सोडणारा आहे. घरोघरची तरुण मुलं-मुली शिक्षणासाठी शाळा-कॉलेजात रोज ये-जा करतात. पालक अक्षरश: जीव मुठीत घेऊन त्यांची वाट पाहतात. बस, ट्रकसारखी वाहने बेदरकारपणे नियम तुडवत धावतात. अशा ड्रायव्हर्सकडे पोलिस चक्क दुर्लक्ष करतात. या यमदूतांना लहान वाहनांची किंवा पादचाºयांची मुळीच चिंता नसते. ज्येष्ठ मंडळी तर फक्त देवाचं नाव घेऊनच रस्त्यांवर येऊ शकतात, हे वास्तव आहे. याला उपाय काय? आम्ही जबाबदार नागरिक किरणच्या मृत्यूतून काही धडे घेणार आहोत की फक्त गप्प बसून अजून काही ‘किरणे’ लुप्त होण्याची वाट पाहणार आहोत? आपले शहर सुरक्षित करण्यासाठी पुढे या आणि एकमेकांच्या साह्याने हे शहर अपघातमुक्त करा, हे कळकळीचे आवाहन दैनिक ‘दिव्य मराठी’ आपणास करीत आहे.
    abhilash@bhaskarnet.comTrending