आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थाचालकांची दुकानदारी बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राथमिक शिक्षकाला 30 हजार इतका गलेलठ्ठ पगार आणि आरामशीर काम असे समीकरण शिक्षकांची नोकरी करणार्‍यांचे होते. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांत विद्यार्थ्यांचा ओढा शिक्षक होण्याकडे वाढला होता. या संधीचा फायदा काही राजकीय कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकार्‍यांनी घेतला. त्यांनी शासनाकडून मंजुरी मिळवून घेत अध्यापक महाविद्यालय अर्थात डीटीएड महाविद्यालयांची दुकाने थाटली. या खासगी महाविद्यालयांत प्रवेशासाठी किमान लाख-दीड लाखाचे डोनेशन घेतले जात होते. तसेच नोकरी लावताना संस्थाचालकही 10-15 लाख रुपये इतकी रक्कम घेतात, असे सांगण्यात येते. हेही नसे थोडके म्हणून सीईटी या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रियादेखील 2009 नंतर बंद पडली. जिल्हा परिषदांत नोकरभरती नाही.

चार वर्षे कोणतीही परीक्षा नाही. शिवाय 2009 पूर्वी शिक्षक भरतीत निवड झालेल्या साडेतीन हजार शिक्षकांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे शिक्षक होण्याकडचा ओढाही कमी झाला. 2013 मध्ये शासनाने पुन्हा तरुणांच्या आशा पल्लवित करत टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर केली. आता तरी नोकरी मिळेल या आशेवर असणार्‍या तरुणांनी पुन्हा अर्ज भरले खरे, परंतु या परीक्षेतून ‘केवळ शिक्षक म्हणून तुम्ही पात्र आहात यावर शिक्कामोर्तब होईल, पण तुम्हाला शासन नोकरी देणार नाही’ ही बाब पुढे आली. त्यामुळे पुन्हा तरुणांच्या पदरी निराशाच आली. नोकरीच मिळत नसेल तर डीटीएड करून काय फायदा, असा व्यवहारी विचार करून आता शिक्षक होण्याकडेच तरुणांनी पाठ फिरवली आहे. यामुळे संस्थाचालकांच्या दुकानदारीला चाप बसला आहे. विद्यार्थीच मिळत नसल्याने राज्यातील सुमारे 100 डीटीएड महाविद्यालये आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी शिक्षकांचा बाजार मांडणार्‍या या संस्थाचालकांची दुकानदारी बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिक्षकी पेशाला मानाचे स्थान असताना अशी वेळ का यावी, यावरदेखील आता विचारमंथन होणे गरजेचे झाले आहे.