आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंना घेरण्याची रणनीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगावचे माजी आमदार सुरेश जैन घरकुल घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तब्बल साडेचार वर्षांनी जळगावात मुक्कामी आले आहेत. अटकेत असताना त्यांच्या प्रकृतीची बरीच हेळसांड झाली आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना आता आराम करायला लावू, असे त्यांच्या कुटुंबीयांनी जाहीर केले आहे. प्रत्यक्षात तसे काही होईल, असे दिसत नाही.

रविवारी भाजपचे आमदार आणि पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती असे महाजनांनी सांगितले असले तरी ती भेट पुढची रणनीती ठरवण्यासाठीच असावी, असे जैन महाजन या दोघांच्याही वर्तनावरून वाटत होते. अर्थात, ही रणनीती माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राजकीय खच्चीकरण कसे करता येईल यासाठीचीच असणार, यात शंकेला कारण नाही. अचानकपणे सुरेश जैन यांना मिळालेला जामीन पाहता ही रणनीती थेट सरकारमधूनच असावी, अशी शक्यता अाहेे.
आतापर्यंत अनेक वेळा सुरेश जैन यांच्यातर्फे न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आले होते. मात्र, प्रत्येक वेळी सरकारपक्षातर्फे त्यांच्या जामिनाला विरोध होत गेला आणि न्यायालय अर्ज फेटाळत गेले. आता सर्वाेच्च न्यायालयात सरकारतर्फे पूर्वीसारखा विरोध झाला नाही आणि म्हणून जामीन मंजूर झाला, असे सांगितले जाते. सरकारपक्षातर्फे जामिनाला फारसा विरोध होऊ नये, अशी व्यवस्था सरकारमध्ये बसलेल्यांनीच केली होती, असेही सोशल मीडियातून फिरते आहे. असे घडले असेलच असेही नाही. पण घडले असेल तर पुढे आणखी काय काय घडू शकते, हे सहज सांगता येईल. अर्थात, गेल्या सहा वर्षांत जळगाव जिल्ह्याचे आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून राज्याचे राजकारण ज्या मार्गाने जाते आहे, तो मार्गच पुढे काय घडू शकते हे सांगणारा आहे.
एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाच्या समारंभात त्यांनी केलेले भाषण हेच त्यांना काय साधायचे होते आणि साधायचे आहे, हे स्पष्ट करून गेले. अर्थात, ती बाब कधी लपलेली नव्हतीच; पण पहिल्यांदा खडसे यांनी तिथे राज्याच्या नेतृत्वावर जाहीरपणे शरसंधान केले. याचा अर्थ, मंत्रिपद गेल्यानंतर शांत राहण्याचा खडसे यांचा कालावधी आता संपत आला आहे. त्यांची शांतता भंग झाली की ते काय बोलतील आणि काय करतील, याचा पूर्ण अंदाज मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आहे. कारण विधिमंडळातील कामाचे धडे फडणवीस यांनी खडसेंच्या साेबत राहूनच घेतलेले आहेत. खडसे यांना जिल्ह्यापुरतेच मर्यादित ठेवायचे असेल तर गिरीश महाजनांचा वापर कसा करायचा हे जसे फडणवीस जाणतात, तसेच महाजन खडसेंपुढे टिकायचे नाहीत याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळे मंत्री असलेल्या महाजनांना स्थानिक पातळीवर ताकद देण्यासाठी सुरेश जैन यांचा वापर केला जाण्याची शक्यता स्पष्ट दिसते आहे.
रविवारी सुरेश जैन आणि गिरीश महाजन यांची बंदद्वार चर्चा बराच वेळ सुरू होती. त्या बैठकीत सुरेश जैन यांचे पुत्र राजेश हेसुद्धा उपस्थित होते. वास्तविक, राजेश जैन हे उत्तम व्यावसायिक आहेत. आतापर्यंत त्यांनी सुरेश जैन यांच्या राजकारणात कधी रस घेतला नाही. असे असताना अशा बंदद्वार चर्चेत त्यांना सहभागी केले जात असेल तर त्याचा अर्थ त्यांना राजकारणात खेचण्याची रणनीती आखली जात असावी. येत्या काही महिन्यांत जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होणार आहे. सहा वर्षांपूर्वी याच निवडणुकीत सुरेश जैन यांनी पुढाकार घेऊन ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनीष यांना निवडून आणले होते. त्यात खडसेंचे चिरंजीव पराभूत झाले होते. तो पराभव खडसे यांच्या जिव्हारी लागला आणि तिथून जळगाव जिल्ह्यातील राजकारण बदलले. घरकुल घोटाळा प्रकरणाला दिलेली चालना हादेखील त्याचाच भाग होता आणि खडसे यांनी ते नंतर जाहीरपणे बोलूनही दाखवले होते. आताही खडसे आपल्या कन्येला या निवडणुकीत उतरवून मुलाच्या पराभवाचा वचपा काढू इच्छित आहेत, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यांच्या कन्येला भारतीय जनता पक्ष उमेदवारी देईल का, हाही प्रश्न आहेच; पण नुकतेच झालेले शक्तिप्रदर्शन आणि दबावतंत्राचा वापर करून त्यांनी तिकीट मिळवलेच तरी त्यांच्या उमेदवाराचा पराभव करायचा, अशीच रणनीती ठरली असणार. त्यांच्या मुलीसमोर उमेदवार द्यायचा तर लढत तुल्यबळ हवी म्हणून राजेश जैन यांना उमेदवारी देण्याचे ठरवले जात असावे. सध्या भाजपचे असूनही गिरीश महाजन तर खडसे यांच्या विरोधात आहेतच; पण चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, खासदार ए.टी. पाटील हेही खडसे विरोधकांच्या यादीत गेले आहेत. छुपा असंतोष बाळगणारे इतरही नेते जिल्ह्यात आहे. त्याचा फायदा, सुरेश जैन यांच्याविषयी सहानुभूती आणि पैसा यांचा वापर करून खडसे यांचा पुन्हा त्याच निवडणुकीत पराभव करायचा, असेच ठरलेले दिसते.
(लेखक औरंगाबाद आवृत्तीचे संपादक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...