आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाके अपघाताचा धडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फटाका मार्केटला आग लागली आणि सुमारे १० कोटी रुपयांचे फटाके आणि वाहने भस्मसात झाली. या आगीचे निश्चित कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरी हा एक अपघातच असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. दिवसा ही घटना घडली म्हणून सावधपणे सर्वांना आगीपासून लांब पळणे शक्य झाले आणि त्यामुळे मनुष्यहानी टळली; पण हा अपघात रात्री घडला असता तर त्याची भीषणता अधिक तीव्र राहिली असती, यात शंका नाही.

कोणत्याही अपघातांना मानवी चुकाच बहुतांशी जबाबदार असतात, असे म्हणतात.या फटाका अपघाताला मानवी चुकांपेक्षा मानवाची स्वार्थी आणि बेजबाबदार प्रवृत्तीच अधिक जबाबदार असल्याचे समोर आले. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या प्रमुखाला निलंबित करण्याचे सोपस्कर महापालिका आयुक्तांनी केले आहेत; पण तेवढ्याने फार काही साध्य होईल, असे वाटत नाही. कारण स्वार्थाची ही मुळे समाजाच्या सर्वच घटकांमध्ये खोलवर रुजली आहेत हेही या घटनेने दाखवून दिले आहे. ही केवळ औरंगाबादची स्थिती आहे, असे नाही. काँग्रेस गवतासारखा सर्वत्रच तिचा प्रसार झाला आहे. परिणामी जे अग्नितांडव औरंगाबादला झाले ते इतर शहरात देखील घडू शकते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इतर शहरांनी यापासून धडा घ्यावा, यासाठी काही निरीक्षणे आवर्जून इथे नोंदवित आहे.

गेले पाव शतक म्हणजे १९८६ पासून फटाक्यांचा हा बाजार औरंगाबादमधल्या मध्यवर्ती ठिकाणी भरतो आहे. आतापर्यंत तिथे अपघात झाला नव्हता, ही बाब वेगळी; पण केव्हाही हा अपघात घडू शकतो, या भीतीने आसपासच्या वसाहतींनी तो तिथून हलवावा अशी मागणी गेल्या वर्षापासून लावून धरली होती. त्या आधी २००३ मध्ये तो एकदा लोकवस्तीपासून लांब असलेल्या मैदानावर हलविण्यात आला हाेता; पण तिकडे फटाके व्यावसायिकांचा त्यांना हवा तेवढा व्यवसाय झाला नाही. परिणामी त्यांच्या संघटनेने पुन्हा तो मूळ जागी आणण्याचा आग्रह धरला आणि त्या व्यवसायात भागिदारी करणाऱ्या अनेक नगरसेवकांनीही पक्षभेद विसरून त्या मागणीला पाठींबा दिला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मागणी फेटाळली गेली. परिणामी या बाजाराशेजारी असलेल्या वसाहतींनाही या आगीचा फटका बसला आहे. त्यांनी खबरदारी घेत घरातील स्वयंपाकाच्या गॅसचे सिलींडर तातडीने बाहेर काढले आणि वसाहत रिकामी केली म्हणून पुढचा विद्ध्वंस टळला.

ही दूर्घटना घडण्याच्या बरोबर २४ तास आधी पोलिस आयुक्तांनी सुरक्षेच्या दृष्टीने एक बैठक घेतली होती. त्यात सुरक्षेचे सर्व उपाय योजले गेले आहेत, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. सर्व उपाय योजले म्हणजे काय केले होते? तर महापालिकेने ठरवून दिलेले सर्व निकष पाळले गेले आहेत, असा त्यांचा दावा होता. काय होते हे निकष? फटाक्याच्या प्रत्येक दुकानामध्ये किमान चार फुटांचे अंतर असायला हवे (केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे तर ते १० फूट असायला हवे), प्रत्येक दुकानात अग्निशमनाची साधने सज्ज असावीत, दुकाना समोर पाण्याचा ड्रम भरलेला असावा, तिथे २४ तास अग्निशामक बंब तैनात असावा, पार्कींगची मोकळी व्यवस्था असावी, नागरी वसाहतीपासून किमान ५० मीटर्सवर ही दुकाने असावीत, काही अपघात घडलाच तर बाहेर जाण्याचे मार्ग प्रशस्त असावेत इत्यादी. ही सर्व व्यवस्था आहे, असा अहवालही (फायर आॅडीट रिपोर्ट)महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ तासांपूर्वीच सादर केला होता. तरीही अपघात घडला. कारण वर नमूद केलेल्या निकषांपैकी एकही निकष पाळण्यात आला नव्हता. अनेक दुकानदारांनी अग्निशमनाची साधने शोपीस म्हणून आणून ठेवलेली होती. पाण्याचा ड्रम अपवादानेच एखाद्या दुकानासमोर होता. प्रत्येक दुकानात अंतर केवळ एका पत्र्याच्या आडोशाइतकेच होते. सर्वात उच्चांक म्हणजे तिथे पालिकेने अग्निशामक बंबाची व्यवस्थाच केलेली नव्हती. तरीही फायर आॅडिट रिपोर्टमध्ये सर्व काही व्यवस्थित असल्याचे नमूद झाले होते. हे कसे घडले असेल याचा ‘अर्थ’ वेगळा सांगायची गरज नाही.

कोणत्याही शहरात हेच घडत असते. जिथे संबंधित अधिकारी अधिक दक्ष असतात, संघटनांना स्वत:च्या सदस्यांची आणि त्यांनी आपल्या परवान्यावर भाड्याने (अर्थात, बेकायदा) ज्या व्यावसायिकांना ती जागा दिली असेल त्यांची काळजी असते तिथे काही प्रमाणात काळजी घेतली जाते, हेही खरे आहे. या अपघातात फटाका व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहेच; पण जे नागरिक फटाके घ्यायला आले होते त्यांचीही वाहने जळून खाक झाली. काहींचा जीव थोडक्यात बचावला आहे. त्यामुळे असल्या व्यवसायांच्या बाबतीत प्रशासन आणि व्यापारी हातमिळवणी करीत असले तरी सर्वसामान्य नागरिकांनीच अधिक दक्ष राहाण्याचा धडा औरंगाबादच्या घटनेने दिला आहे. तेही दक्ष नसले तर मात्र, याची पुनरावृत्ती ठरलेली आहे.
(निवासी संपादक, औरंगाबाद)
बातम्या आणखी आहेत...