आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नियोजनाचा दुष्काळ (दीपक पटवे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यातील दुष्काळाचे प्रतीक बनलेल्या लातूरकरांचा आनंद सध्या मांजरा धरणासारखा ओसंडून वाहतो आहे. कारण तिथल्या मांजरा धरणाच्या सहा दरवाजांतून पाणी सोडण्यात आले आहे. हेच मांजरा धरण कोरडेठाक झाल्यामुळे काही महिन्यांपूर्वी खास रेल्वेने पिण्याचे पाणी आणावे लागले होते आणि त्यामुळे लातूर वेगळ्या अर्थाने बातम्यांच्या केंद्रस्थानी आले होते. आता त्यातून १४७ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. लातूर आणि परिसरासाठी ही एक पर्वणी आहे. कारण असा प्रसंग तब्बल सहा वर्षांनी आला आहे. गेली तीन वर्षे तर धरणातील पाण्याने तळ गाठला होता आणि त्यामुळे तिथला पाण्याचा साठा मृतावस्थेतच होता. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्येच धरण कोरडे पडायला लागले होते. त्या पार्श्वभूमीवर आजची परिस्थिती मोठा दिलासा देणारी आहे यात शंकाच नाही. गेल्या चार दिवसांपासून बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा फायदा लातूरच्या या धरणाला झाला आहे. केवळ लातूरच्याच धरणाला नाही, तर माजलगाव, बिंदुसरा ही धरणेही भरत आली आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मराठवाडा दुष्काळमुक्त झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
जायकवाडी धरणातही यंदा ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे. या धरणाला त्याच्या भव्यतेमुळे नाथसागर असे नाव देण्यात आले आहे. ही भव्यता आणि त्यातील ७० टक्के पाणीसाठा लक्षात घेता मोठा दिलासा आधीच मिळाला आहे; पण जायकवाडीचे पाणी संपूर्ण मराठवाड्याला मिळत नाही. त्यामुळे ते १०० टक्के भरून ओसंडून वाहिले असते आणि मांजरा, माजलगाव, बिंदुसरा ही धरणे रिकामी राहिली असती तरी लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांना पुन्हा दुष्काळाच्या झळा बसल्या असत्या. नुकत्याच झालेल्या पावसाने ही भीती दूर केली आहेे. अर्थात, मराठवाड्यातील एकूण धरणांतील पाणीसाठ्याचे प्रमाण आजही अवघे ५९ टक्के आहे हेही लक्षात घ्यायला हवे. तरीही आधीच्या चार वर्षांपेक्षा परिस्थिती चांगली असल्यामुळे पाणीटंचाई, पाणी वाटप आणि दुष्काळ असल्या विषयांपासून मराठवाडा यंदा तरी दूर राहील, अशी आशा करायला हरकत नाही. त्याचा परिणाम म्हणून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही यंदा त्यांच्या जिल्ह्यातील धरणातले पाणी मराठवाड्यासाठी सोडावे लागण्याची भीती राहिलेली नाही.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इथल्या धरणात झालेला पाणीसाठा दिलासा देत असला तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात या पाण्याचा किती उपयोग होईल, याविषयी शंकाच आहे. कारण धरणातील पाणी शेतीपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था सुसज्ज असायला हवी. मुळात आधी व्यवस्था तरी असायला हवी; पण मराठवाड्यात जायकवाडी धरण असो किंवा अन्य मध्यम आणि लहान धरणे असोत, त्यांच्या कालव्यांची बहुतांश कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे धरणांच्या नियाेजित सिंचन क्षमतेनुसार मराठवाड्यात १८ टक्के सिंचन झाले आहे, असे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षातील सिंचन आणखीनच कमी आहे. जायकवाडी धरणाच्या कालव्यांचे जेवढे काम झाले आहे त्यातील बहुतांश भाग पाणी वाहून नेण्यासाठी उपयोगाचा रािहलेला नाही. कालव्यांमध्ये अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उगवली आहेत. अनेक ठिकाणी देखभाल- दुरुस्तीअभावी माती आत ढासळली असून त्यामुळे कालवे बुजल्यासारखे झाले आहेत. खूप कमी शेतीला प्रत्यक्षात जायकवाडी धरणातील पाण्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो, ही वस्तुस्थिती अाहे. कालव्यांची ही अवस्था असेल तर चाऱ्या आणि पोटचाऱ्या यांची अवस्था तर विचारायलाही नको. मराठवाड्यात बहुतांश काळ दुष्काळच असतो. त्यामुळे कालवे आणि चाऱ्यांचा विषय फारसा चर्चिला जात नाही. यंदा धरणांमध्ये पाणी असल्यामुळे तो चर्चेत येऊ शकतो. पण केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहिला तर मात्र काही उपयोग नाही. त्यासाठी यापुढच्या काळात कालवे, चाऱ्या आणि पोटचाऱ्या यांचे नियोजन राज्यकर्त्यांनी प्राधान्याने करायला हवे. तयार होणारे हे कालवे आणि चाऱ्या दरवर्षी व्यवस्थित राखल्या जातील, याची काळजीही घ्यायला हवी. त्यासाठी आर्थिक तरतूद करायला हवी. त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्येही त्यांच्या जपणुकीच्या जबाबदारीची जाणीव पेरायला हवी. अन्यथा शेतकऱ्यांसाठी धरणातील पाणी म्हणजे “लंकेत सोन्याच्या विटा’ अशीच अवस्था होईल.

(लेखक औरंगाबाद आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...