आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकानुनयाचा जुगार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारच्या दैनिकातील बातम्या वाचून औरंगाबादकर धन्य झाले असतील. आपण किती महान विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून दिले याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत असेल. कारण गणपती उत्सवात रात्री मंडपात पत्ते आणि जुगार खेळणाऱ्यांना अभय देण्याची मागणी या लोकप्रतिनिधींनी जाहीरपणे केली आहे.
 
मंडळाचे कार्यकर्ते रात्रभर मांडवात थांबले तर कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही ही या विचारामागची मूळ कल्पना होती. आता रात्रभर थांबायचे तर त्यांना काहीतरी करमणूक तर हवी ना? म्हणून मग त्यांनी पत्ते आणि जुगार खेळला तर त्यांना विरोध करू नका, असे या लोकप्रतिनिधींचे म्हणणे होते. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी हा मुद्दा मांडला. त्याला शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी समर्थन दिले आणि शिवसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांनी त्याला आणखी एक जोड दिली. गणपतीच्या काळात दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करू नका, अशी मागणी त्यांनी यानिमित्ताने पुन्हा मांडली. काय ही कार्यकर्त्यांची चिंता आणि किती हा दयाभाव? व्वा!  भाग्यवान आहेत गणपतीच्या मांडवात जुगार खेळू इच्छिणारे आणि स्वत:च्या जिवाचीही पर्वा नसल्याने हेल्मेट न घालता कायदा मोडीत फिरू इच्छिणारे औरंगाबादमधील ‘कार्यकर्ते.’
 
शांतता समितीच्या बैठकीत या आमदार, खासदारांनी ही भूमिका मांडली. गणेशोत्सवाच्या काळातच बकरी ईद येते आहे. त्यामुळे दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी काय करता येईल यासाठीचे मंथन करण्यासाठी ही शांतता समितीची बैठक होती. अशा बैठकीत लोकप्रतिनिधींनी काही व्यवहार्य सूचना कराव्यात या अपेक्षेने त्यांनाही आमंत्रित केले जाते. त्यानुसार शहरातील तिन्ही आमदार आणि खासदार बैठकीला हजर होते. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचा अपवाद वगळला तर उर्वरित तिघांनीही आपली वैचारिक पातळी दाखवून दिली. लोकानुनयासाठी आम्ही आमची घटनात्मक जबाबदारीही विसरू शकतो आणि ज्यांच्यावर कायदेभंग रोखण्याची जबाबदारी आहे त्यांनाच कायदेभंग करायलाही अधिकारवाणीने आणि तेही जाहीरपणे सांगू शकतो हे या लोकप्रतिनिधींनी औरंगाबादकरांना दाखवून दिले आहे. करमणूक म्हणून कार्यकर्ते थोडीफार दारूही तिथे प्यायले तरी त्याकडे पाहू नका, एवढेच काय ते त्यांनी सांगायचे शिल्लक ठेवले आहे.
 
आपण विधिमंडळाचे सदस्य आहोत आणि राज्याच्या सुसंचालनासाठी कायदे बनवणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे याचे तरी भान या लोकप्रतिनिधींनी ठेवायला नको का? गणपती मंडळांच्या मांडवात रात्री जुगार खेळण्याचे समर्थन ते जर जाहीरपणे करीत असतील तर या लोकप्रतिनिधींनी कायद्यात तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव कायदेमंडळात (विधानसभा आणि लोकसभा) द्यायला हवा. तसा प्रस्ताव देणार आहेत का हे आमदार आणि खासदार? अतुल सावे भाजपचे आहेत. चारित्र्य आणि वेगळेपणाच्या गप्पा मारणाऱ्या या पक्षाने किती गुन्हेगारांना आधीच स्वपक्षात घेऊन ‘पवित्र’ करवून घेतले आहे हा वेगळा विषय आहे. त्या संगतीला आता कोणाचाच अपवाद राहिलेला नाही एवढेच त्याबाबतीत म्हणता येईल. पण जे केवळ बेकायदाच नाही तर अनैतिक आणि विघातक आहे त्यासाठी जाहीरपणे आग्रह धरणे ही तर वैचारिक आणि नैतिकही दिवाळखोरीच म्हणायला हवी. भाजपचे हेच वेगळेपण आहे का? शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष हिंदू धर्माच्या रक्षणाचा ठेका आपल्याकडेच असल्याचे भासवत असतात. त्यांनीच हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीसमोर अशा कृत्याचे समर्थन करावे? ही मंडळी धर्माचे रक्षण करायला निघाली आहे की धर्माच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे रक्षण करायला, या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने स्वत:च पडताळून पाहायला हवे.
 
पुण्यातील गणेश मंडळांनी आपापल्या परिसरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजवून घेण्यासाठी यंदा पुढाकार घेतला आहे आणि पुण्याशी जवळीक सांगणाऱ्या औरंगाबादमध्ये मात्र मंडळांना पैसे कमी पडतील म्हणून जुगार खेळण्याचे सल्ले इथले लोकप्रतिनिधी देत आहेत. कुठे नेऊन ठेवताहेत हे औरंगाबादला? इथे डीएमआयसी झाली, त्यासाठी शेकडो एकर जमीन संपादित केली गेली. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून सोयी-सुविधा करण्यात आल्या आणि जगभर त्याचा डांगोराही पिटण्यात आला. तरीही इथे देशी-विदेशी मोठे उद्योग यायला तयार नाहीत. विदेशी उद्योजक येतात, भेट देऊन जातात आणि नंतर इथे यायला नाही म्हणत पुण्याचा रस्ता धरतात. त्याची कारणे अशा अपप्रवृत्तीच्या समर्थनाच्या कार्यसंस्कृतीत दडलेली आहेत का हेही आता तपासून पाहावे लागणार आहे.
 
गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे समाजप्रबोधन हा हेतू होता. वाईट गोष्टींना विरोध करण्यासाठी हा उत्सव सुरू करण्यात आला हे ‘गणेशभक्तां’चे नाव घेत अप्रत्यक्षपणे या लोकप्रतिनिधींना सांगायची वेळ याच कार्यक्रमात पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर आली.  या उत्सवाची परंपरा नसलेल्या राज्यातून आलेल्या अधिकाऱ्यावर ही वेळ यावी याची लाज या लोकप्रतिनिधींना वाटायला हवी की त्यांना निवडून देणाऱ्या औरंगाबादकरांना हेही आता ज्याने त्यानेच ठरवायचे आहे. ते ठरविण्याइतपत बुद्धी या बुद्धीच्या देवतेने निदान औरंगाबादकरांना तरी नक्कीच दिली असेल याविषयी शंका नाही.  
 
यानिमित्ताने औरंगाबादबरोबरच इथल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या सर्वच कार्यकर्त्यांचीही बदनामी झाली आहे. इथल्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने जुगार खेळायचा असतो, अशीच औरंगाबाद बाहेरच्या सर्वांची आणि इथल्या अन्य धर्मीयांचीही समजूत होण्याची शक्यता आहे. वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. जागरणासाठी मांडवात जुगार खेळण्याची अपेक्षा करणारे मंडळ आणि कार्यकर्ते अपवादानेच असतील. म्हणूनच ‘अशी’ धारणा होऊ द्यायची नसेल तर इथल्या सर्वच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अशी मागणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ‘आम्हाला ही सवलत नको’ असे जाहीरपणे ठणकावून सांगायला हवे.
 
बातम्या आणखी आहेत...