आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेतले ‘राज-का-रण’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ताकारण म्हणजे खऱ्या अर्थाने ‘राज-का-रण’ अर्थात, राज्य करण्यासाठीचे युद्ध असते. युद्धात जसे सर्वकाही माफ असते तसेच या सत्ताकारणातही असावे, असेच या पातळीवरचे सत्ताकारणी मानत असावेत. औरंगाबाद महापालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांची तर त्याबाबतीत खात्रीच झालेली दिसते. त्यामुळेच शनिवारी जाणीवपूर्वक सर्वसाधारण सभेत गदारोळ घडवून आणला गेला आणि त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांची छुपी युती झाली. प्रकरण हाणामारीपर्यंत नेण्यात आले आणि कोणत्याही मुद्द्यावर चर्चा न करता सभा गुंडाळण्यात आली. आता ही सभा जेव्हा केव्हा नव्याने घेण्यात येईल तोपर्यंत सध्याचे वादग्रस्त मुद्दे थंड बस्त्यात टाकले गेलेले असतील.
 
शनिवारी सभा सुरू होताना वंदे मातरम हे राष्ट्रीय गान वाजवण्यात आले. ही प्रथा महापालिकेत प्रारंभापासून आहे. दरवेळी ती पाळली जाते आणि सभागृहातील सर्वच त्या वेळी उभे राहतात. त्यात काँग्रेसचे मुस्लिम सदस्य आणि एमआयएमचे मुस्लिम सदस्यही असतात. शनिवारी मात्र एमआयएमचे सय्यद मतीन आणि काँग्रेसचे सोहेल शेख हे राष्ट्रगान सुरू असताना बसून राहिले. हेच सय्यद मतीन १६ आॅगस्टला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याच राष्ट्रगानाच्या वेळी उभे होते. याआधीच्याही सर्व सभांना ते उभे राहत आले आहेत. जे मतीन यांचे तेच सोहेल शेख यांचेही आहे. शनिवारीच त्यांना अशी कोणती उपरती झाली होती की हे राष्ट्रगान सुरू असताना ते उभे राहिले नाहीत? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. इथे धर्माचा आणि पक्षाच्या भूमिकेचाही प्रश्न नाही. कारण एमआयएम आणि काँग्रेसचे अन्य मुस्लिम नगरसेवक उभे राहिले होते. शिवाय, राष्ट्रगानाला सन्मान देण्यासाठी उभे राहिले पाहिजे, हीच एमआयएमची भूमिका आहे, असे आमदार इम्तियाज जलील यांनी लगोलग जाहीरही केले आहे. त्यामुळेच या दोघांना या वेळी मुद्दाम बसून राहायला सांगितले गेले असावे, अशा शंकेला जागा आहे.  येथूनच वाद सुरू करता येईल आणि सभेची दिशा भरकटवून ती उधळून लावता येईल, असे नियोजन झाले  होते, असा आरोप शिवसेना आणि एमआयएमचे नेते करीत आहेत आणि दोघांचाही रोख भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे आहे.  
 
भाजपच्या नेत्यांवर शंका घेण्याचे कारण शनिवारच्या या सभेत त्यांना अडचणीच्या मुद्द्यांवरून शिवसेना वाद घालणार होती आणि तो वाद वाढला असता तर भाजपच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उठणार होते. याचे संकेत शुक्रवारीच शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिले होते. निमित्त होते निलंबित असलेल्या तीन अधिकाऱ्यांना तडकाफडकी कामावर रुजू करून घेण्याचे. या तीन अधिकाऱ्यांमध्ये शहर अभियंता, प्राणिसंग्रहालयाचे संचालक आणि शाखा अभियंता यांचा समावेश आहे. मंत्रालयातून सोयीचे पत्र मिळवून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीच पुनर्नियुक्तीची ही शाळा केली आणि त्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. यात ‘वाटाघाटी’ झाल्या आहेत असा थेट आरोप पालकमंत्री रामदास कदम यांनी केला. तो करताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. असलेच आरोप सभेत झाले तर पक्षाची प्रतिमा काय राहील, या विवंचनेत असलेल्या भाजपला म्हणूनच ही सभा नको होती.

म्हणून त्यांनीच या दोन नगरसेवकांना हाताशी धरून सभा उधळण्याचे नाटक केले, असा आरोप लगेचच सुरू झाला. अशा प्रकारे भावनिक मुद्दा उपस्थित करून सभा उधळून लावण्याचे तंत्र औरंगाबाद महापालिकेत नवे नाही. खूप आधीपासून या पद्धतीनेच भावनिक मुद्दे ऐनवेळी आणून नको असलेल्या सभा उधळून लावल्या जात आहेत. मग कधी त्यासाठी ‘संभाजीनगर’ हा उल्लेख वापरला जातो, कधी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातले वाक्य उचलले जाते तर कधी एखादा नगरसेवक अचानक उर्दू भाषेत सभेचा अजेंडा मागून सभा उधळण्याचे निमित्त मिळवून देतो. ज्या ज्या वेळी सत्ताधारी अडचणीत येणार असतील, त्या त्या वेळी हमखास हाच खेळ महापालिकेत होत आला आहे. त्याला कोणताही पक्ष अपवाद राहिलेला नाही. शिवसेनेकडे महापालिकेची संपूर्ण सत्ता होती त्या त्या वेळीही अशाच भावनिक मुद्द्यांवर सभा उधळल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिवसेना या प्रकाराचे आता भांडवल करणार असली तरी त्यांचेही पाय याच वाटेवर उमटलेले आहेत हे त्यांना विसरता येणार नाही.  

निलंबित अधिकाऱ्यांना चौकशीविना कसे कामावर घेतले हा शिवसेनेचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी वर्ष-दीड वर्ष त्यांना चौकशीशिवाय निलंबित ठेवायचे आणि कामाशिवायच ७५ टक्के पगार सुरू ठेवायचा, यात कोणाचे हित साधले जात होते, असा प्रश्नही एका भाजप पदाधिकाऱ्याने उपस्थित केला आहे. पण महापालिकेत ‘कारभार’ करण्यापासून त्यांना रोखले होते यातच औरंगाबादकरांचे मोठे हित होते, असे उत्तरही त्यावर दिले जाते आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...