आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिथे मनच निर्भय नसेल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कामातुराणाम् न भयं न लज्जा’ ही संस्कृत म्हण सार्थ ठरवणारी शिक्षकाची विकृती औरंगाबादमधल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नुकतीच समोर आली. त्यापाठोपाठ आणखी एका इंग्रजी माध्यमाच्याच शिक्षकाला शालेय विद्यार्थिनींचा पाठलाग करणे आणि त्यांच्याकडे विकृत नजरेने पाहणे या आरोपांमुळे अटक करण्यात आली आहे. या लागोपाठ समोर आलेल्या दोन्ही घटना शालेय विद्यार्थिनींच्या पालकांना चिंतेत टाकणाऱ्या आहेत. असले प्रकार केवळ अशा इंग्रजी शाळांमध्येच घडतात, असे मात्र समजण्याचे कारण नाही. दोन वर्षांपूर्वी शहरातल्याच एका नामांकित मराठी शाळेच्या विद्यार्थिनींचे रिक्षाचालक शोषण करीत असल्याचे समोर आले होते. एका शाळेत बाहेरच्या तरुणाने येऊन मुलीची छेड काढली म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अशी विकृती कुठे असेल आणि काय करीत असेल हे ठामपणे कोणीही सांगता येत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या पालकांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे.  
 
पहिल्या घटनेत संस्थाचालकांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न समोर आला. तो संबंधित शिक्षकाच्या विकृतीपेक्षा अधिक धोकादायक  आणि चिंता वाढवणारा आहे. सध्या इंग्रजी माध्यमाच्या बहुतांश शाळा या व्यवसाय केंद्र झाल्या आहेत. स्वाभाविकच त्यांच्यात प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. अशा प्रकारच्या घटना शाळेची प्रतिमा डागाळत असल्यामुळे स्पर्धेत त्या मोठ्या अडचण निर्माण करतात. त्यामुळे  अशा घटना घडल्या तरी समोर येऊ नयेत असाच या शाळांचा प्रयत्न असतो. संबंधित संस्थाही गणित शिकवणाऱ्या या शिक्षकाला निलंबित करून हे प्रकरण संपवण्यात यावे असा प्रयत्न करीत होती. विद्यार्थिनींच्या पालकांनी आग्रहाने प्राचार्यांना पोलिस ठाण्यात नेले म्हणून त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा तरी दाखल झाला. या शिक्षकाविरोधात विद्यार्थिनींनी तक्रारी केल्या होत्या. पण त्या शिकवण्याच्या पद्धतीविषयी होत्या, असेही त्या शाळेच्या प्राचार्यांनी म्हटले आहे.

त्यात तथ्य असेल असा विचार केला तरी त्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाच्या बाबतीत संस्थेचे धोरण कसे राहिले हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. त्या तक्रारीची काेणतीही दखल प्राचार्यांनी घेतली नसेल आणि उलट विद्यार्थिनींनाच समज देण्यात आली असेल तर त्या शिक्षकाच्या विकृतीविषयी तक्रार करायला विद्यार्थिनी कशा धजावतील? त्या प्रकरणातही त्यांनाच दोष दिला जाण्याची भीती या विद्यार्थिनींना वाटत असावी. इतक्या दिवसांपासून त्या शिक्षकाचे गैरवर्तन सुरू असताना विद्यार्थिनींना आपल्या पालकांनाही त्याबाबतीत सांगायची हिंमत होऊ नये ही बाबही तितकीच गंभीर आहे आणि शाळेइतकाच त्यात पालकांचाही दोष आहे. एका विद्यार्थिनीने हिंमत करून पालकांना ही बाब सांगितली म्हणून हा प्रकार उघडकीस तरी आला. या शिक्षकावर पोलिस कारवाई झाल्यामुळे दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थिनींना आपला पाठलाग करणाऱ्या आणि विकृत नजरेने पाहणाऱ्या आणखी एका शिक्षकाविरोधात तक्रार करायची हिंमत आली हेही लक्षात घेतले पाहिजे. पहिले प्रकरण उजेडात आले नसते तर कदाचित दुसऱ्या प्रकरणातही तक्रार आली नसती आणि या दोन्ही विकृतांनी पुढे जाऊन काय केले असते याचा विचारही न केलेला बरा.

 
आज शालेय गुणांना अवाजवी महत्त्व आल्यामुळे गुण कमी होऊ नये म्हणून विद्यार्थी असले प्रकार सहन करतात हाच या दोन्ही प्रकरणांनी दिलेला धडा आहे. इथेच पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. गुण कमी झाले तरी किंवा एखाद्या वर्षी अनुत्तीर्ण झाली तरी चालेल; पण असले प्रकार मुळीच सहन करायचे नाहीत, अशी शिकवण किती पालक आपल्या पाल्यांना देत असतील?  अशा पालकांची संख्या वाढेल त्या वेळीच अशा विकृतींना वेळीच पायबंद घालण्याची, त्यांना विरोध करण्याची हिंमत मुला-मुलींमध्ये वाढेल. सर्वच शिक्षण संस्थाचालकांनी आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पालकत्व असलेल्या प्राचार्य, मुख्याध्यापकांनीही या प्रकरणातून धडा घेतला पाहिजे. विद्यार्थी आणि विशेषत: विद्यार्थिनी जर शिक्षकाविषयी तक्रार करीत असतील तर त्याची तातडीने दखल घेतली गेली पाहिजे. कदाचित तक्रारीपेक्षा खरा प्रकार अधिक गंभीर असू शकतो असाच विचार करून गांभीर्याने प्रकरण हाताळायला हवे.  

असे प्रकार रोखण्यासाठी कायदे आणि नियमही खूप आहेत; पण त्यांचे काटेकोर पालन होत नाही. त्यासाठी नियंत्रणाची काठी हाती असलेली यंत्रणाही हात बांधून बसते. त्यामुळे अशा विकृतांना संधी मिळते. प्रत्येक संस्थेत विशाखा समिती असायला हवी, त्या समितीने अालेल्या तक्रारी कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय हाताळाव्यात, समितीकडे तक्रार करण्याइतपत निर्भय वातावरण संस्थेत असावे अशी स्थिती जितक्या प्रमाणात वाढत जाईल तितके असे प्रकार कमी होतील हीच या दोन्ही प्रकरणांनी दिलेली शिकवण आहे.     
 
 
बातम्या आणखी आहेत...