आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात-धर्माची हजेरी बंद व्हावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षक सांगायचे, जात-धर्म माणसाला माणसापासून वेगळे करतात. माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकलं पाहिजे. मनातून आणि व्यवहारातून जात, धर्म संपवला पाहिजे. शिक्षक सोमनाथ वाळकेंंचे हे म्हणणे रोहन भोसले नावाच्या विद्यार्थ्याला मनोमन पटले होते; पण जात आणि धर्मानुसार असलेली ओळख संपवायची म्हणजे काय करायचे हे त्याला समजत नव्हते. गेले वर्षभर ११ वर्षे वयाचा हा खेड्यातला मुलगा विचार करीत राहिला. २०१६ हे वर्ष संपले तेव्हा तोही १२ वर्षांचा झाला. नव्या वर्षासाठी नवे चांगले संकल्प करण्याची सर्वांचीच तयारी सुरू होती तेव्हा रोहनला जात आणि धर्माने असलेली आपली ओळख पुसण्याची एक नामी कल्पना सुचली. नव्या वर्षातला शाळेचा पहिला दिवस. त्याने वर्गशिक्षक यायच्या आत कपाटातून हजेरीपत्रक काढले. आपल्याच वर्गातल्या एक मुलीकडून पेन घेतला आणि हजेरीपत्रकात आपल्या नावासमोर असलेला धर्म आणि जातीचा उल्लेख वाचता येणार नाही इतक्या ठळकपणे खोडून टाकला. शिक्षकांनी विचारले तेव्हा आपणच हे कृत्य केल्याचे त्याने कबूलही केले. तुम्हीच शिकवता की जात आणि धर्मानुसार ओळख नको. मग हजेरीपत्रकात कशाला हवे जात आणि धर्म? या त्याच्या प्रश्नाने शिक्षक सोमनाथ वाळके यांची छाती अभिमानाने भरून आली आणि डोळे आनंदाश्रूंनी. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील पारगावच्या जिल्हा परिषद शाळेतला हा किस्सा. कोणताही शेरा मारण्याची आवश्यकता नसलेला.

अवघ्या १२ वर्षे वयाच्या रोहनने हा विचार केला ही बाब त्याचे कौतुक करण्यासारखीच आहे यात शंका नाही. पण या निमित्ताने शिक्षक सोमनाथ वाळकेंच्या कामावरही प्रकाश पडला पाहिजे. तरुण वयाचा हा शिक्षक अत्यंत कृतिशील आहे. आपल्या कौशल्याने त्यांनी शाळेला आनंदघर केले आहे. त्यांच्याकडून ही मुले वाद्य वाजवायला शिकली, पुस्तकातून शिकायच्या कविता गायला शिकली, अभिनय करून पुस्तकातले पाठ शिकता शिकता इतरांनाही शिकवायला लागली.  पाठ्यपुस्तकांशिवाय इतर पुस्तकेही वाचायला शिकली. पाठ शिकता शिकता अवांतर विचारही ऐकायला लागली. ‘दिव्य मराठी’ने शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला होता तेव्हा केवळ त्यांच्या कार्याची ओळख झाली होती. रोहन भोसलेच्या कृतीने त्यांचे काम किती खोलवर आणि मुळाशी रुजते आहे यावरही प्रकाश पडला आहे. रोहनच्या कृतीने प्रभावित झालेली त्या शाळेतील मुलामुलींनी एक संकल्प केला आहे. त्यांना आता मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे आणि हजेरीपत्रकावरील जात आणि धर्म काढण्याची विनंती करायची आहे. 

अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सवलती आणि योजना शालेय पातळीवर राबवल्या जातात. त्यांची अंमलबजावणी करायची असेल तर विद्यार्थ्यांच्या जातीचा संदर्भ योजना राबवणाऱ्यांकडे असणे गरजेचे असते. पुढेही शिक्षण आणि नोकरीसाठी जातीचा उपयोग होत असल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही जातीचा उल्लेख केला जातो. जात आणि धर्म सरकारने असा जगण्याशीच जोडल्यामुळे त्याला हजेरीपत्रकावरून खोडून संपवता येणे शक्यच नाही हे उघड आहे. पण रोजच विद्यार्थ्यांच्या जात-धर्माची हजेरी कशासाठी हवी? शाळेतील प्रवेशाच्या वेळी करायच्या सर्वसाधारण नोंदीच्या वहीत जात आणि धर्माचा उल्लेख असणे समजू शकते; पण रोजच्या हजेरीपत्रकात तो असू नये, असे सोमनाथ वाळकेंनाही वाटते. त्याचा उपयोग तर काहीच नाही. उलट शिक्षकांच्या मनावर विद्यार्थ्यांची ती ओळख रोजच्या रोज बिंबवण्याचे काम मात्र त्यातून होत राहते. ते थांबले पाहिजे असा विचार पारगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात रुजला असेल तर त्या विचाराच्या रोपट्याचा वृक्ष होण्याइतपत पोषक प्रतिसाद त्यांना मिळेल का, हा प्रश्न आहे. सोमनाथ वाळकेंसारखे अनेक तरुण शिक्षक आज गावागावात उत्तम कामगिरी करीत आहेत. पारगावचे उदाहरण पाहिले तर खऱ्या अर्थाने पिढी घडवत आहेत. रोहनचे आई आणि वडील पूर्णपणे अशिक्षित आहेत. आपली सहीही त्यांना करता येत नाही. त्यामुळे शहरी शाळा पालकांकडून अपेक्षा करतात तशा अपेक्षा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्याची सोय वाळके आणि त्यांच्यासारख्या शिक्षकांना नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच त्यांच्या अशा कामाचे महत्त्व आणखी वाढले आहे. आता गरज आहे ती शासकीय पातळीवर त्यांना प्रतिसाद मिळण्याची. पुरोगामी म्हणवणाऱ्या या राज्यात  किमान हजेरी पुस्तकातून जात आणि धर्म काढण्याची पहिली पायरी तरी शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चढायला हवी.

- निवासी संपादक, औरंगाबाद