आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रियाजी को गुस्सा क्यों आया?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी औरंगाबाद शहरात आल्या होत्या. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या प्रचंड संतापल्या. कार्यकर्ते आणि पदाधिकारी  यांनीच औरंगाबाद जिल्ह्यात पक्ष संपवला, असा शेरा मारीत काम न करणाऱ्यांनी निघून जावे, असे फर्मानही त्यांनी साेडले. आई मेल्यावर पोरंही जगतात. हा तर पक्ष आहे आणि आम्ही ताे वरून येऊन चालवू, असे ठणकावून सांगत त्यांनी कोणाचेही नाव न घेता सगळ्यांचीच हजेरी घेतली. सुप्रिया यांचा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव सर्वश्रुत आहे. तरीही त्यांना इतक्या चिडलेल्या कुणी पाहिले आणि ऐकले नव्हते. आता असे काय घडले की त्या इतक्या संतापल्या आणि टोकाचे बोलून गेल्या? 

सुप्रियांच्या उपस्थितीत बोलावलेल्या पक्षाच्या जिल्हा बैठकीला एक छोटा हाॅलही भरला नाही. महिलांची उपस्थिती मोजून २७. त्यात शहरातील चारपैकी एका नगरसेविकेची हजेरी. उपस्थितांमध्ये मुलांचा भरणा अधिक. तेही १०-१५ मिनिटांनंतर उठून जाण्याच्या पवित्र्यात. ज्यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी पक्षातील भांडणे आणि हेवेदावे यांचेच दर्शन घडवले. आम्हाला पक्षाच्या कार्यक्रमाला बोलावले जात नाही, मान दिला जात नाही, अशा तक्रारीच केल्या. समाधान वाटेल, विश्वास निर्माण होईल असे काहीही घडत नव्हते म्हणून खासदार सुळे संतापल्या हे उघडपणे दिसत होते. पण जे दिसत होते त्यापलीकडेही संतापण्यासारखे खूप काही होते आणि आहे. सुप्रियांच्या मनातील त्याची सल बैठकीच्या वातावरणामुळे बाहेर पडायला निमित्त मिळाले, असे झाले असेल. 

मोदी लाटेने राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लागली. मराठवाडा आणि औरंगाबाद जिल्हा त्याला अपवाद नाही. पण त्यातल्या त्यात अन्यत्र पक्ष आपल्याच नेते आणि कार्यकर्त्यांच्या गटबाजी आणि स्वार्थात इतका गुरफटला गेलेला नाही जितका तो औरंगाबाद जिल्ह्यात आहे. पक्षाच्याच बळावर मोठे झालेल्यांनी एक तर पक्षाकडे पाठ फिरवली अाहे किंवा आपल्या दावणीलाच पक्ष बांधून घेतला अाहे. कार्यकर्ते सैरभैर आहेत आणि सर्वसामान्यांनी पक्षाकडून अपेक्षा करणे सोडून दिल्यात जमा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपासून पक्षाची जी काही घसरण सुरू आहे ती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. औरंगाबाद महानगरपालिकेत पक्षाच्या नगरसेवकांची संख्या १२ वरून चारपर्यंत खाली घसरली आहे. जिल्हा परिषदेतील पक्षाचे संख्याबळ १६ वरून घसरून थेट तीनवर येऊन ठेपले अाहे. पंचायत समित्यांमध्येही तशीच दुरवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ९ पैकी फक्त एका जागेवर पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. तेच आज जिल्हाध्यक्ष आहेत. पण पंचायत समिती निवडणुकीत त्यांना मुलालाही निवडून आणता आले नाही. अशा सततच्या घसरणीतून स्थानिक पक्षनेत्यांनी सावरायला नको का? पण गटबाजी आणि पक्षाचे खासगीकरणच वाढते आहे. 

अर्थात, हे सारे अचानक घडलेले नाही आणि ते घडायला केवळ स्थानिक नेतेच जबाबदार आहेत असेही नाही. वरचे नेते येऊन इथला पक्ष चालवतील, असे सुप्रिया सुळे आता म्हणत असल्या तरी इतकी वर्षे काय होते आहे? जिल्ह्यात सुप्रिया सुळेंचे नेतृत्व मानणारा एक गट आहे आणि दुसरा अजित पवारांचेच ऐकणारा. हे सुप्रिया यांना माहिती नाही यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. गुरुवारी सुप्रियांच्या उपस्थितीत झालेल्या दोन कार्यक्रमांना पक्षनेत्यांपैकी कुणाची हजेरी नव्हती हे पाहिले तरी अधिक बोलायची गरजही राहत नाही. ही गटबाजी मिटवण्यासाठी वरच्या नेत्यांनीच पुढाकार घ्यायला नकाे का? काही वर्षांपूर्वी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक झाली. त्यात अजित पवार समर्थक सतीश चव्हाण यांना ताकद पुरवली गेली आणि त्यातून मधुकर मुळे आणि त्यांच्या समर्थकांना संस्थेबाहेर करण्यात आले. हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच. संस्था तेव्हाही आणि आताही राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्याच हातात होती; पण वरच्या नेत्यांनी दोघांमध्ये समेट घडवण्याऐवजी त्यांच्यात दरी निर्माण केली आणि ती दरीच पक्षाची अदृश्य फाळणी करायला कारणीभूत ठरली. त्याच वेळी दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी वरचे नेते आले असते तर आज पक्ष चालवण्यासाठी येण्याची भाषा कदाचित करावी लागली नसती. मराठा क्रांती मोर्चाचे श्रेय घेण्याच्या स्थानिक पक्षनेत्यांच्या प्रयत्नामुळे दुरावलेला दलित आणि ओबीसी समाज, एमआयएमच्या आक्रमकतेने दूर गेलेला मुस्लिम समाज यांच्यासाठी पक्षाकडे काही कार्यक्रमच नाही.  अनेक महिन्यांपासून जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. नवा नेता नेमायला वरच्या नेत्यांना वेळ नाही आणि म्हणे पक्ष चालवायला आम्ही औरंगाबादला येऊ!  रागावून आणि धमकावून होणार नाही. कार्यकर्त्यांना नेत्यांच्या कृतीतून विश्वास निर्माण झाला तरच पक्षाची घसरण थांबेल हे सुप्रियांनी लक्षात घ्यायला हवे.   

- निवासी संपादक, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...