आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धीरोदात्त सेन ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्धिलोलुपता हा डॉ. अमर्त्य सेन यांचा गुणविशेष नाही. कुणा राजकीय पक्षाच्या वा व्यक्तीच्या हातचे बाहुले होऊन पोपटपंची करण्याचा त्यांचा लौकिक नाही. सरकारी योजनांची फुकाफुकी तारीफ करून लाभ पदरात पाडून घेणा-या लोचटांइतके ते खुजे नाहीत. जाती-धर्माच्या नावाने आग ओकून झाल्यानंतर माणुसकीच्या नावाने नक्राश्रू ढाळणा-यांचा जयघोष करणा-यांइतकी त्यांची पत खालावलेली नाही की हस्तकांकरवी सोशल मीडियाचा चलाखीने वापर करून स्वत:चे श्रेष्ठत्व लादणा-या इतरांप्रमाणे त्यांच्यात सत्तांधळेपण उतरलेले नाही. म्हणूनच कातावलेल्या (खरे तर अखंड हिंदूराष्‍ट्राचे दिवास्वप्न पाहणा-या) गोबेल्सच्या वारसदारांनी आणि मीडियातील त्यांच्या सहानुभूतीदार पत्रपंडितांनी गेले काही दिवस समन्यायी व्यवस्थेची, वैश्विक कल्याणाची पाठराखण करणा-या डॉ. सेन यांच्यासारख्या प्रज्ञावंताला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याचा नादानपणा चालवला आहे. याच नादानपणामुळे आपला चेहरा विद्रूप दिसतो याचा दोष चेह-यासमोर आरसा धरणा-याचा नसतो, हेही समजून घेण्याची गोबेल्सच्या या भाऊबंदांची क्षमता हरवत चालली आहे. कोण हा सेन? याचा भारताशी काय संबंध? आम्हाला कसल्या विकासाच्या बाता सांगतो, असा सगळा या गोबेल्सच्या वारसदारांचा सध्याचा तोरा आहे.

नोबेल पुरस्कार हे डॉ. सेन यांच्याकडील एकमेव भांडवल नाही. सम्राट अशोक-सम्राट अकबर यांनी रुजवलेल्या देदीप्यमान भारतीय वाद-परंपरेचा समृद्ध वारसा जपत प्रदीर्घ अशा चिंतन आणि मननाच्या प्रक्रियेतून आकारास आलेली मानवतेचा स्पर्श असलेली त्यांची वैचारिक प्रभा यात त्यांचे खरे मोठेपण आहे, हे गोबेल्सच्या भारतीय वारसदारांना मान्य नसले तरीही जगभरातल्या जाणकार-अभ्यासकांनी कधीच मान्य केलेले आहे. इथे मुद्दा डॉ. सेन यांची आरती ओवाळण्याचा नाही, तर सेन यांना यूपीएचे एजंट, पंतप्रधानांचे चमचे असे म्हणून हिणवत अज्ञान, असहिष्णुता आणि असभ्यतेचे प्रच्छन्न दर्शन घडवणा-यांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून मोकाट सुटण्याचा आहे. केंद्रातील यूपीए सरकारने अध्यादेश जारी केलेल्या अन्नसुरक्षा विधेयकाला त्यांनी पाठिंबा दर्शवला (परंतु, संसदेत या विधेयकावर चर्चा नाही झाली, यावर टीकाही केली.) या एका कारणाने एका विशिष्ट वर्गाचा तिळपापड झालेला आहेच; पण एनडीएच्या भावी पंतप्रधानांच्या योग्यतेविषयी जाहीर नापसंती दर्शवल्याने हिंदूराष्‍ट्राची आतुरतेने वाट पाहणा-या गोबेल्सच्या वारसदारांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

द्वेषाचा उन्माद इतका टोकाला पोहोचला आहे की, डॉ. सेन इतक्या पोटतिडकीने अन्नसुरक्षेचा मुद्दा का उचलून धरताहेत, त्यांचा पाठिंबा नेमका कुणाला आहे, सध्याच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक व्यवस्थेबद्दलचे त्यांचे अवलोकन काय आहे, त्यांच्या अर्थविषयक विचारसरणीमागील प्रेरणा काय आहेत, हे न तपासताच गोळीबारी सुरू आहे. हे पुरेसे स्पष्ट आहे की, गोबेल्स तंत्रनीतीचा सारा खेळ जनतेच्या भावनांभोवती मांडलेला असतो. यात सत्य जनतेपर्यंत पोहोचू नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली असते. याचाच प्रत्यय सध्या ज्या प्रकारे डॉ. सेनविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे, त्यावरून येत आहे. परंतु, नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘अ‍ॅन अनसर्टन ग्लोरी’ (या ग्रंथाचा सविस्तर परिचय 4 ऑगस्ट रोजी प्रकाशित होणा-या ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक’ पुरवणीत करून देण्यात आला आहे.) या इंग्रजी ग्रंथाद्वारे सत्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा धीरोदात्त प्रयत्न त्यांनी आणि अर्थतज्ज्ञ ज्याँ द्रेझ यांनी मिळून केला आहे. आधीच ‘नरेगा’मुळे सरकारी तिजोरीला भले मोठे भगदाड पडलेले आहे. त्यात सार्वजनिक वितरण यंत्रणा सडलेली असताना अन्नसुरक्षा विधेयकासाठी सरकारी तिजोरीवर 27 हजार कोटी रु.चा अनावश्यक बोजा कशाला, या सध्या उच्चरवात विचारल्या जाणा-या लाखमोलाच्या (?) प्रश्नाचे समर्पक उत्तर त्यांनी यात दिले आहे.

तसे करताना कित्येक वर्षे पेट्रोलियम पदार्थ आणि फर्टिलायझर सवलतीत घेताना सरकारी तिजोरीवर जवळपास 1 लाख 65 हजारांचा बोजा टाकणा-या, सोने आणि हि-यांवरील आयात शुल्कात माफी मिळवून सरकारी तिजोरीवर जवळपास 57 हजार कोटी रु.चा बोजा टाकत अन्नसुरक्षा विधेयकाला विरोध करणा-या वर्गाचा कावेबाजपणा त्यांनी उघड केला आहे. ज्या जात व्यवस्थेने आजवर उपेक्षितांच्या आरोग्य-शिक्षण-आर्थिक प्रगतीच्या वाटा रोखल्या, तीच जातव्यवस्था गेली कित्येक वर्षे राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेवर दबाव आणत समाजातील एका वर्गाला आरोग्य-शिक्षण-रोजगार आणि अन्न सुरक्षेपासून वंचित ठेवत आहे. आणि याच जातव्यवस्थेच्या वर्चस्वामुळे एक रुपयातले नाममात्र 15 पैसे लाभार्थीपर्यंत पोहोचत आहेत. या वास्तवाचा पुनरुच्चार करून ‘आहे रे’ वर्गाला शिंगावर घेण्याचे धाडसही त्यांनी दाखवले आहे. एरवी, जागतिकीकरणाच्या मार्गाने येणा-या आर्थिक विकासाच्या आड डॉ. सेन कधीही नव्हते. मात्र, गरिबांना गरीब आणि श्रीमंतांना अतिश्रीमंत करणा-या, मानवी चेहरा नसलेल्या अर्थव्यवस्थेला तसेच आर्थिक वृद्धीमुळे असमानतेचा प्रश्न आपोआप निकालात निघेल, असा सरंजामी विचार प्रसृत करणा-यांना त्यांनी कायमच विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकांमध्ये गेल्या 20 वर्षांत तसूभरही बदल झालेला नाही. किंबहुना याच विचारसातत्याचे प्रतिबिंब अन्नसुरक्षा विधेयकासंदर्भातील त्यांच्या वक्तव्यांत पडलेले आहे.

भारतीय इतिहासाचे, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक व्यामिश्रतेचे, जात आणि धर्म व्यवस्थेत वाहणा-या अंत:प्रवाहांचे त्यांचे आकलन इतर तज्ज्ञ-जाणकारांपेक्षा (यात त्यांचे समकालीन नोबेल पुरस्कार स्पर्धेत गेली दोन दशके मागे पडत गेलेले जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती हेदेखील आले) अधिकच सखोल आहे, हेही या निमित्ताने दिसून आले आहे. असे करताना हा आपला म्हणून त्याला झाकून ठेवायचे आणि विरोधातला म्हणून त्यांच्यावर टीकेच्या फैरी झाडायच्या, असा राजकीय कावेबाजपणा त्यांनी केलेला नाही. म्हणूनच त्यांचे ‘दि आयडिया ऑफ जस्टिस’ हे पुस्तक असो वा अलीकडेच प्रकाशित झालेले ‘अ‍ॅन अनसर्टन ग्लोरी’, भारतातील राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेच्या उणिवांवर त्यांनी कुणाचीही तळी न उचलता बोट ठेवले आहे. अशा वेळी सर्व बाजूंनी त्यांच्या विरोधात चिखलफेक होणे स्वाभाविक आहे. परंतु, इतकेही करून ज्यांचे समाधान झालेले नाही, त्यांनी बेबंद सोशल मीडियाचा वापर करून दुरान्वये संबंध नसताना डॉ. सेन यांची अभिनेत्री कन्या नंदना सेन हिच्या चारित्र्यहननाचा हीन प्रयत्न चालवला आहे. रक्तहीन हिंसेचाच हा प्रकार गोबेल्सचे भारतीय तंत्रप्रचारक आणि मीडियातील त्यांच्या सहानुभूतीदारांच्या लौकिकास सर्वार्थाने साजेसा आहे. परंतु रक्तहीन हिंसा केव्हा रक्तरंजित रूप धारण करते हे लक्षातही येत नाही, इतके सध्याच्या परिस्थितीत लक्षात ठेवणे आवश्यक आहे.