आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला खिंडार(अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका काँग्रेसने निर्विवाद जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा तब्बल दुप्पट जागा मिळवून शरद पवारांच्या नाकावर टिच्चून काँग्रेसच्या चिल्ल्यापिल्ल्या नेत्यांनी ही महानगरपालिका खेचून आणली. स्थानिक स्वराज्य संस्थेतील विजय हा राज्याच्या अथवा देशाच्या राजकारणाचा विचार करता फारसा महत्त्वाचा मानला जात नाही. मात्र, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेबाबत असे विधान करणे धैर्याचे ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म हाच मुळी पश्चिम महाराष्ट्रातील दबंग नेत्यांच्या जिवावर झालेला आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडताना शरद पवारांनी कोणताही मुहूर्त पाहिला नव्हता, कारण घरातून मिळालेल्या डाव्या शिकवणीमुळे देव-धर्म आणि शकुन-अपशकुन असल्या भानगडींमध्ये पवारसाहेब कधीही पडत नाहीत. मात्र, काँग्रेसमधून बाहेर पडताना त्यांनी राज्य सहकारी बँकेची सूत्रे आपल्या माणसाच्या हातात आहेत ना, याची व्यवस्थित चाचपणी केली होती. कारण राज्य सहकारी बँकेच्या जिवावर राज्यातील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध महासंघ या सगळ्यांवरील मांड मजबूत करता येते हे त्यांना पक्के ठाऊक होते. काँग्रेसमधून बाहेर पडताना सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, पुणे, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्येच आपल्याला वर्चस्व सिद्ध करावे लागणार याची त्यांना कल्पना होती. याचे कारण मराठवाड्याने पुलोदच्या प्रयोगात शरद पवार यांना आजमावले होते. 1986च्या अखेरीस शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्यानंतर या धरसोड प्रवृत्तीला मराठवाड्यातील जनतेने कायमचा रामराम केल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले होते.

विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला पाडणे शक्य नाही हेही त्यांना माहीत होते. कोकण व मुंबईत शिवसेना व काँग्रेस यांच्या लढाईत नव्या पक्षाला फारसे स्थान राहणार नव्हते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र हा साखरपट्टाच त्यांचे प्रमुख लक्ष्य होते. त्या दृष्टीनेच सगळी आखणी होती व त्याचे फळही पवार यांना मिळाले. पवार यांच्या चोवीस तास राजकारण करण्याच्या कलेपुढे काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात हतबल झाली हे जसे खरे आहे, तसेच पश्चिम महाराष्ट्राला स्वातंत्र्यापूर्वीपासूनच काँग्रेसविरोधाचा इतिहास होता हेदेखील त्यातील महत्त्वाचे कारण आहे. पश्चिम महाराष्ट्र हा संपूर्ण महाराष्ट्रात पुरोगामी पट्टा आहे. या पश्चिम महाराष्ट्रातच महात्मा फुले आणि शाहू महाराज जन्माला आले व पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाल बावटा खांद्यावर घेऊन इंग्रजांना जेरीस आणणारी तरुणांची फळीही याच पश्चिम महाराष्ट्रात जन्मली. दत्ता देशमुखांसारखे उत्तुंग डावे नेतृत्वही याच विभागातले. सांगण्याचा मुद्दा हा की, याच पश्चिम महाराष्ट्रातील नव्या पिढीला नेतृत्वाची स्वप्ने दाखवली की ते काँग्रेसच्या प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात उभे राहतात हे पवार यांचे आराखडे योग्यच होते.

सांगली-मिरजच्या महानगरपालिका निवडणुकीने शरद पवार यांनी 14-15 वर्षांपूर्वी बांधलेले हे गणित कोलमडून गेले आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र, कुठे तरी गडाचे चिरे खिळखिळे व्हायला लागले आहेत, हे या महापालिकेच्या निकालावरून नक्कीच स्पष्ट झाले आहे. सांगलीमधून राष्ट्रवादीने दोन-दोन शक्तिशाली मंत्री पुढे आणले. आर. आर. पाटील म्हणजे राष्ट्रवादीचा चेहराच जणू! त्यांची स्वच्छ प्रतिमा, राजकीय धूर्तपणा यापुढे भले भले चितपट होतात. दुसरे जयंत पाटील उच्चविद्याविभूषित, संयत बोलणे, बुद्धिशाली प्रतिमा सगळे डावपेच थंड डोक्याने आखणारे. हे दोन्ही नेते म्हणजे महाराष्ट्राचे भावी नेतृत्व म्हणून गेल्या पंधरा वर्षांत पुढे आले. त्या मानाने काँग्रेसमध्ये पतंगराव कदम यांच्यासारखे अघळपघळ नेते. दुसरीकडे वसंतदादांच्या घराण्यातील प्रतीक पाटील यांच्यासारखे प्रसारमाध्यमांना फारसे सोयरसुतक नसलेले नेते.

आर. आर. आणि जयंतराव म्हणजे प्रसारमाध्यमांचे डार्लिंगच जणू! तर अशा या निर्नायकी अवस्था असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीला चारही मुंड्या चित केले. याचे कारण महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादीने काही चमकदार कामगिरी केली नाही म्हणून नव्हे. कारण काम न केल्याबद्दल मतदार जर धडा शिकवत असतील तर मुंबई महानगरपालिकेत वर्षानुवर्षे खड्ड्यांमुळे अनेक मुंबईकरांचे दर पावसाळ्यात जीव जाऊनसुद्धा शिवसेना कशी काय निवडून येऊ शकते? राष्ट्रवादीच्या हरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये बदललेली देहबोली. राजकीय नेता जितकी ताकद कमावतो तितका तो नम्र झालेला जनतेला दिसायला हवा. स्व. यशवंतराव चव्हाण असोत की शरद पवार, यांना हे गणित चांगले समजले, मात्र त्यांच्या चेल्यांना काही हे पचत नाही.

राष्ट्रवादीतील ही मधली फळी अजूनही मध्ययुगीन सरंजामी पद्धतीनेच ‘वाड्यावरून निरोप आलाय, समजलं का’, अशाच गुर्मीत वावरत असते. गेल्या वेळी ही महानगरपालिका राष्ट्रवादीला मिळवून देण्यात ज्या इद्रिस नायकवडी यांचे महत्त्वाचे योगदान होते, त्यांनाच व्यक्तिगत रागापोटी जयंत पाटील यांनी पक्षातून हाकलले. चाणाक्ष काँग्रेसने त्यांना तत्काळ आपल्या तंबूत घेतले. दुसरीकडे राजू शेट्टींनी राष्ट्रवादीचे वाभाडे काढायला सुरुवात केलीच होती. राजू शेट्टींवर ते विशिष्ट जातीचे असल्याचा आरोप पवार यांनी वैतागून केला आणि सांगलीतील जैन समाज राष्ट्रवादीच्या पूर्ण विरोधी गेला. पुन्हा शेट्टींच्या आंदोलनातून काही प्रमाणात मराठा शेतकरीही राष्ट्रवादीच्या विरोधात होताच. त्यातच विविध भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही राष्ट्रवादीचे नेतृत्व ढिम्म हलण्यास तयार नव्हते. या सगळ्या गोष्टी जनता पाहत असते. मनाच्या कोप-यात साठवत असते व योग्य वेळ आली की त्याचे विश्लेषण करून निर्णय घेत असते, याचा विसर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला. सांगलीमध्ये आपल्याला कोण हात लावणार, अशा मुजोरीत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यामुळेच जनतेने जमिनीवर आणले आहे.

इद्रिस नायकवडी यांना काढून टाकण्यामुळे स्थानिक गणिते तर बिघडलीच. मात्र, भाजपने मोदी यांच्या हातात 2014ची सूत्रे दिल्यापासून मुस्लिम समाज काँग्रेसच्या झेंड्याखाली येऊ लागल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे, ते सांगलीच्या बाबतीतही खरे ठरले असण्याची शक्यता आहे. एकूण या निकालामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खचले आहेत आणि याचा परिणाम दोन्ही पक्षांच्या संघटना यंत्रणेवर होणे अपरिहार्य आहे. आता या सगळ्या विश्लेषणात शिवसेना-भाजपचा साधा उल्लेखही नाही, असे काहींना वाटेल; मात्र निवडणुकीच्या निकालांमध्ये ज्यांना मतदारांनीच अनुल्लेखाने मारले आहे, त्यांचा उल्लेख करून वेळेचा व शाईचा अपव्यय कशाकरिता करावा?