आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली बहुत दूर है! ( अग्रलेख )

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून फक्त शपथविधी बाकी आहे, असा आविर्भाव टीव्ही चॅनल्स, तथाकथित सोशल मीडिया आणि एकूण संघ परिवाराने आणला आहे. निमित्त आहे मोदींचे दिल्ली येथील श्रीराम कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर झालेले भाषण. विकास आणि कार्यक्षम कारभार या दोनच गोष्टींची देशात वानवा आहे आणि युवाशक्ती जर पुढे झाली तर ‘मेड इन इंडिया’ असे भारताचे जगभर ब्रँडिंग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी भाषणात कटाक्षाने ‘हिंदुत्व’, गुजरातमधील हिंस्र दंगे, राममंदिर हे विषय तर टाळलेच; पण ते नेहमी ज्या तुच्छतेने आणि नफरतीने यूपीए सरकार, डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया-राहुलबद्दल बोलतात, तसेही ते काही बोलले नाहीत. कॉलेजमधील तरुण (आणि तमाम नवमध्यमवर्ग) मंत्रमुग्ध झाला होता. असेही म्हटले जाऊ लागले आहे की, आता त्यांच्या करिश्म्याने भारतवासीयांचे मन जिंकले आहे आणि उरला आहे तो फक्त पंतप्रधानपदाचा शपथविधी! लोकसभा निवडणुकीत (मग त्या कधीही घेतल्या जावोत) काय होईल याबद्दलची खात्री संघ परिवाराला आणि तमाम निवडणूक अंदाजतज्ज्ञांना आताच वाटू लागली आहे आणि मोदी व राहुल गांधी यांच्यातच जणू थेट निवडणूक होणार, अशा रीतीने पंडित मंडळी चर्चा करू लागली आहेत. भारतात अजून तरी संसदीय लोकशाही आहे आणि पंतप्रधानाची निवड अमेरिकेतील अध्यक्षासारखी होत नाही.

नरेंद्र मोदींना देशातील सर्व राज्यांमध्ये गुजरातप्रमाणेच पाठिंबा आहे, असेही गृहीत धरले जात आहे. ती वस्तुस्थिती नाही. दक्षिणेत तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भाजपचे नावापलीकडे अस्तित्वही नाही. कर्नाटकमध्ये भाजपने आत्मदहन करण्याचे ठरवले आहे. म्हणजे जवळजवळ सव्वाशे जागांपैकी भाजपला काही हाताला लागणार नाही. महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेचे बोट धरून चालावे लागते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनाच विघटन व्हायच्या स्थितीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपला 12-15 जागांच्या वर जाता येणार नाही; विशेषत: गडकरी-मुंडे यांच्यात सुरू असलेल्या यादवीमुळे.

पंजाबमध्ये अकाली दल, बंगालमध्ये ममता किंवा मार्क्सवादी, ओरिसात बिजू जनता दल, उत्तर प्रदेशात मुलायम-अखिलेश, बिहारमध्ये नितीशकुमार म्हणजे तेथील सुमारे दोनशे-सव्वादोनशे जागांपैकी जास्तीत जास्त 40 जागा त्यांना मिळू शकतात. त्यानंतर उरला मध्य आणि पश्चिम भारत - गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश ही राज्ये म्हणजे भाजपचे बालेकिल्ले मानले जातात. या राज्यांतील सुमारे दीडशे जागांपैकी अगदी 70 जागा त्यांना मिळाल्या तरी भाजपची एकूण खासदार संख्या 140च्या वर जात नाही. भाजपला स्वत:च्या जोरावर दोनशेच्या आसपास जागा मिळाल्याशिवाय त्यांचा उमेदवार (म्हणजे नरेंद्र मोदी!) पंतप्रधानपदासाठी दावा करू शकणार नाही. अगदी किमान (गेला बाजार!) 180 जागा तरी मिळायला हव्यात, ज्या त्यांना 1998 आणि 1999मध्ये मिळाल्या होत्या. त्या संख्येच्या आधारे त्यांनी एकूण 24 मित्र पक्ष मिळवले होते; परंतु त्यासाठी त्यांना अटलबिहारी वाजपेयींचे नाव पक्षाचा नेता म्हणून पुढे करावे लागले; लालकृष्ण अडवाणींचे नाही. अडवाणींच्या सारथ्याखाली भाजपची रथयात्रा 1990मध्ये निघाली होती. त्यांच्याच नेतृत्वाखाली 1992मध्ये बाबरी मशिदीवर संघ स्वयंसेवकांनी ‘स्वारी’ केली होती.

बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर जो हिंदुत्वाचा उन्माद देशभर पसरला, त्या उन्मादाची पार्श्वभूमी नसती तर 1998 आणि 1999मध्ये भाजपला 180 जागा मिळाल्या नसत्या. स्वत: वाजपेयी त्या रथयात्रेत कधीही गेले नव्हते. किंबहुना रथयात्रेला त्यांचा विरोध होता. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेल्या मुस्लिमविरोधी दंगली या देशाला काळे फासणा-या आहेत, असे पुढे वाजपेयींनी जाहीर विधान केले होते. त्या विधानालाही पूर्वपीठिका होती, वाजपेयींच्या बाबरीसंबंधातील विधानाची. बाबरी मशिदीचा विध्वंस ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात खेद व उद्वेगजनक घटना होती, असे विधान त्यांनी केले होते. म्हणजेच, भाजपतील उदारमतवादी प्रवाहाचे वाजपेयी हे प्रतिनिधी होते आणि अडवाणी जहाल व हिंदुत्ववादी विचाराचे. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री, असे प्रशस्तिपत्र अडवाणींनी दिले होते आणि तेसुद्धा त्या हिंस्र दंगलींनंतर! हे सर्व संदर्भ लक्षात घेतले की संघ परिवार ही हवेली आता सुंदोपसुंदीने कशी व्यापलेली आहे, हे लक्षात येईल. ज्या दिवशी मोदी विकासाच्या मंत्राचा जप करत होते, त्याच दिवशी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह कुंभमेळ्यातील साधूंबरोबर गंगास्नान करत होते.

विशेष म्हणजे, राजनाथ सिंह यांनी तेव्हाच जाहीर केले की ‘त्याच जागी’ राममंदिर बांधण्याचे कंकण भाजपने बांधलेले आहे! म्हणजे, एकाच वेळेस देशाला 15व्या शतकात नेण्याचा प्रकल्प आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट उद्योगाच्या माध्यमातून 21व्या शतकात जाण्याचे स्वप्न भाजप लोकांसमोर ठेवत आहे. हे भाजपच्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे की दुटप्पी राजकारणाचे, हे लवकरच स्पष्ट होऊ लागेल. मुद्दा हा की, नरेंद्र मोदी हे भाजपचे सर्वमान्य नेते नाहीत. अडवाणी आणि सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि यशवंत सिन्हा, राजनाथ सिंह आणि मुरली मनोहर जोशी असे अनेक रथी-महारथी निष्प्रभ केल्याशिवाय मोदीयात्रा लाल किल्ल्यापर्यंत पोहोचणार नाही. हळूहळू मोदींनाही ध्यानात येऊ लागेल की, ‘दिल्ली बहुत दूर है!’