आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली वार्तापत्र : अस्वच्छ मनांच्या हाती केजरीवालांचा झाडू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवटी दिल्ली विधानसभा भंग झाली. एकाही पक्षाकडे बहुमत नव्हते तरीसुद्धा उपराज्यपाल नजीब जंग यांनी "सरकार बनवता का सरकार ऽऽ' अशी भाजप, आम आदमी पार्टी आणि कॉँग्रेसला विचारणा करून सगळ्यांचीच खिल्ली उडवली होती.

केवळ 28 आमदार असलेल्या दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचे हाल देशाने पाहिले. 49 दिवसांत केजरीवालांना परिस्थितीनुरूप रामराम ठोकावा लागला. त्यानंतर डावपेच खेळूनही भाजपला आमदारांची संख्या वाढवून सरकार बनवता आले नाही. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही संख्याबळासाठी गोळाबेरीज करण्याचे मराठी मंत्र दिल्ली प्रदेश भाजपला दिलेत. त्याचाही उपयोग झाला नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशात होत असलेला जयजयकार आणि महाराषट्र, हरियाणाचे निकाल पाहून दिल्लीत बहुमताचे सरकार येऊ शकते याबाबत भाजपला विश्वास वाटत आहे.

केंद्र सरकारने दिल्ली विधानसभा भंग केली आणि लागलीच भाजप, कॉँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते मैदानात उतरले. निवडणुकीची अधिसूचना अद्याप निघायची असली तरी दिल्लीकरांच्या मनात काय आहे याची चाचपणी या नेत्यांनी सुरू केली आहे. भ्रष्ट असल्याचा ठपका ठेवणाऱ्या कॉँग्रेसच्याच मदतीने अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले होते. या काळात केजरीवाल यांनी जे निर्णय घेतले ते गरीब आणि सामान्य लोकांच्या हिताचे होते त्यामुळे केजरीवालांचे अद्यापही नाव घेतले जाते. ही त्यांची जमेची बाजू असली तरी मोदींची पोकळ आश्वासने का असेना, परंतु त्यांच्या झंझावातापुढे आपण टिकणार नाही याची कल्पना केजरीवाल आणि कंपनीला आली आहे. दिल्ली विधानसभेच्या डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत केजरीवाल 55 ते 60 आमदार निवडून येतील, असे सांगत होते मात्र अर्धे आलेत. यावेळी त्यांनी हा आकडा 45 वर आणला आहे. अर्थात केजरीवालांना दिल्लीत बहुमत मिळू शकले तर तो चमत्कार म्हणावा लागेल अन्यथा त्यांना राजकारणातील गाशा गुंडाळावा लागणार आहे. राजकारणाचा जराही अनुभव नसलेल्या केजरीवालांनी नवी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. एरवी मोदींवर तुटून पडणाऱ्या केजरीवाल यांनी ‘मोदी फॉर पीएम आणि केजरीवाल फॉर सीएम’ अशा मुलाखती द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरून या जाहिरातीही येत आहेत. त्यात मोदींचाही फोटो वापरण्यात आला आहे. केजरीवालांचा हा डाव भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी असू शकतो, परंतु केजरीवाल समजतात तेवढे मतदार अडाणी नाहीत. केजरीवाल वाराणसीतून मोदींच्या विरोधात उभे होते ते सीएमसाठी की पीएमसाठी? याचाही मतदार विचार करतीलच. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनीही मोदींचा असाच वापर केला होता. मोदींचे फोटो वापरले. या लफड्यात राज ठाकरे झीरोवर आऊट झालेत. केजरीवालांची इतकी दुर्दैवी अवस्था दिल्लीत नसली तरी पावले मात्र राज ठाकरेंच्या मार्गाने पडत आहेत.

केजरीवालांच्या या प्रयोगाने भाजपचे स्थानिक नेते बावचळले आहेत. काय करू आणि काय नाही हे त्यांना सूचेनासे झाले आहे. जो-तो उठतो आणि मोदींसारखा हातात झाडू घेऊन रस्ते झाडायला लागतो. खरे तर रस्ता साफ करण्यापेक्षा त्यांना त्यांचे मन स्वच्छ करावे लागणार आहे. भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये अहंकाराची घाण साचलेली आहे. हे नेते आताच सावध झाले नाही तर येणाऱ्या काळात मतदारच त्यांना कचऱ्यासारखे दूर सारतील. भाजपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी रस्त्यावर कचरा टाकून स्वच्छतेचे नाटक केले. कॅमेऱ्यांनी कचरा टाकण्याचा क्षणही टिपला आहे. गांधीजींची विचारधारा सांगून मोदींनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान केवळ देखाव्यापुरते ठरते आहे. फोटो काढण्यासाठीचा हा सोपस्कार आहे. गांधी जयंतीला नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेतला आणि कचरा साफ केला त्यात हिरवी पानेच अधिक होती; त्यावरही आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यांनी काय झाडून काढले यापेक्षा देशाचा पंतप्रधान झाडू हाती घेतो हा संदेश महत्त्वाचा आहे. केजरीवाल समाजसेवेत आले तेव्हापासून त्यांनी हातात झाडू घेतला आहे. अनेक गटारे साफ केलीत तेव्हा ते राजकारणात नव्हते आणि त्यांच्या पाठीशी कॅमेरे नव्हते. केजरीवाल राजकारणात आले ते ‘झाडू’ हे चिन्ह घेऊनच. गेल्या डिसेंबरमध्ये अरविंद केजरीवालांच्या झाडूने कमाल केल्याने दिल्लीतील निवडणुकांची चाहूल लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने केजरीवालांचा झाडू पळविला आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. मोदींच्या हाती असलेला झाडू हा महात्मा गांधीजींचा विचारधारेचा कधीच नव्हता; नाही. केवळ राजकीय स्वार्थापोटी आहे.
देशाचा पंतप्रधान झाडू हाती घेतो हा संदेश महत्त्वाचा आहे. केजरीवाल समाजसेवेत आले तेव्हापासून त्यांनी हातात झाडू घेतला आहे. अनेक गटारे साफ केलीत तेव्हा ते राजकारणात नव्हते आणि त्यांच्या पाठीशी कॅमेरे नव्हते. केजरीवाल राजकारणात आले ते ‘झाडू’ हे चिन्ह घेऊनच.