आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषेचा अभिमान बाळगा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणजे ‘क्लासिकल लॅग्वेज स्टेटस’ द्यावे यासाठी शिरूळचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अाढळराव पाटील यांनी लोकसभेत जोरकसपणे मागणी केली. ही मागणी नवी नाही. अनेकदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एखाद्याकडून संसदेत विषय मांडण्याचा प्रयत्न झाला परंतु शून्य प्रहर किंवा विशेष उल्लेखाद्वारे झालेल्या या मागणीला सामूहिक स्वर न लाभल्याने या मागण्या त्याच दिवशी विरून गेल्यात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी मागणी केली होती, एवढेच समाधान त्या लोकप्रतिनिधीच्या खात्यात जमा होते. संस्कृत, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओरिया या सहा भाषांना हा दर्जा मिळू शकतो तर मग मराठीला का नाही? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने २०१३ च्या १२ जुलै आणि १६ नोव्हेंबर ला यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. तो केंद्रात कुठे दडपून ठेवला गेला माहिती नाही. परंतु त्यावर नंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही. राज्यातील आणि केंद्रातील सरकार बदलले आणि हा विषय मागे पडला. शिवाजीराव अाढळराव पाटील यांनी हा विषय लावून धरला त्याबाबत ते अभिनंदनास पात्र आहे. परंतु ही पात्रता केवळ एकट्या शिवाजीरावमध्ये असून चालणार नाही. इतरांनीही पात्र व्हायला पाहिजे. मराठी भाषेचा दर्जा हा विषय थोडा बाजूला ठेवला तरी सभागृहात किती खासदार मराठीत बोलतात हा खरा प्रश्न आहे. दक्षिण भारतातील खासदार त्यांच्या मातृभाषेतून बोलण्यास प्राथमिकता देतात. त्यांची भाषा अन्य भाषिकांना कळावी म्हणून राज्यसभा आणि लोकसभेत अनुवादक ठेवले असतात. पर्यायाने त्या - त्या राज्यातील लोकांना अनुवादक म्हणून उत्तम रोजगार उपलब्ध होतो. मराठीबाबत शोकांतिका आहे? त्यासाठी खासदारांना मराठीत बोलावे लागेल. हे होत नाही म्हणून मराठीचा अनुवाद करणाऱ्यांनाही त्यांची नोकरी कितपत टिकेल याबाबत त्यांच्या मनावर दडपण असते. एरवी सातत्याने मराठीचा पुरस्कार करणारी शिवसेनासुद्धा मातृभाषेविषयी आग्रही नाही. शिवसेनेचे विदर्भातील सोडले तर अन्य सदस्य सभागृहात तोडक्या मोडक्या हिंदीतून बोलून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहाेचवतात. परंतु हे करताना ते हिंदीची ‘वाट’ लावतात. याची त्यांनाही जाणीव असते. परंतु दाक्षिणात्यांचा कित्ता गिरविण्याचे धाडस ते करीत नाहीत. जेव्हा हे सदस्य हिंदी बोलायला सुरुवात करतात तेव्हा पत्रकार गॅलरीत बसलेल्या मराठी पत्रकारांनाही काही काळ श्वास रोखून धरावा लागतो. आनंदराव अडसूळ सारखे संसद रत्न ठरलेले खासदार मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा असख्खलित बोलू शकतात. मात्र ते इंग्रजीच्या बाहेर कधी पडताना दिसत नाहीत. शिवसेनेचे खासदार बॅकफूटवर का गेलेत हा चिंतनाचा विषय आहे.
एनसीईआरटीच्या सातवीच्या पुस्तकात हमारे अतित मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ पाच ओळींमध्ये मांडण्यात आला असल्याकडे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत सरकारचे लक्ष वेधले. मोगलांचे चरित्र पाठ्यपुस्तकात रंगविलेले असल्याची टीकाही त्यांनी केली. हा मराठीचा अपमान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात. खरे तर हा विषय शिवसेनेचा होता. प्रत्येक श्वासागणिक छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत, असे भासविणारी शिवसेना या विषयावरही सरकारवर तुटून पडत नाही याला काय म्हणावे. भगवा शर्ट परिधान करून सभागृहात अयोध्येत राम मंदिर केव्हा बांधणार आहात? याचा जाब विचारणारे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांनीही हा विषय दूर सारला. वेळप्रसंगी २४ वर्षे वयाच्या आदित्य ठाकरेंच्या पायाकडे झुकणाऱ्या खैरेंकडून सभागृहात तात्पुरत्या ब्रेकिंग न्यूजचीच अपेक्षा करावी का?. मात्र, केंद्रात आपण मंत्री होऊ याचे डोहोळे त्यांना लागले आहे. ही स्वप्नपूर्ती होण्यासाठी
शिवाजी महाराज आणि मराठी मुद्दा त्यांनी लावून धरल्यास उद्धव ठाकरेही त्यांना पावतील!
लोकसभेत कॉँग्रेसचे दोनच खासदार आहेत. एक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि दुसरे राजीव सातव. अनेक प्रकरणात अशोक चव्हाणांच्या मागे खेकटे लागले असल्याने ते सभागृहात कमी दिसतात. विरोधी नेता म्हणून राजीव सातव किल्ला लढवित असतात. त्यांचे अनुकरण करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्यही कधी लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न करताना दिसतात. हे होत असताना शेवटी मूळ मुद्दा शिवसेनेच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो. परवा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मराठीत बोलून सर्वांचे लक्ष वेधले. शिवसेना मात्र ‘आ’ वासून पाहत राहिली. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील फळबागांचे गारपिटीमुळे नुकसान झाल्याकडे लक्ष वेधले. डाळिंब, द्राक्ष पिकासाठी तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. त्या पोटतिडकीने बोलल्यात. प्रादेशिक भाषेतून बोलण्यासाठी आधी लोकसभा सचिवालयाला तशी सूचना द्यायची असते. त्यानुसार अनुवादक त्याचे भाषांतर अन्य सदस्यांना समजण्यासाठी इंग्रजी व हिंदीतून करतो. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही मराठीतच या मुद्द्याचे समर्थन कोणास करायचे आहे का ते विचारले. याला म्हणतात मराठी बाणा. एरवी दिल्लीतही मराठी समुदाय एकमेकांशी फटकून वागतो. जवळपास ५० मराठी मित्र मंडळे आहेत. परंतु ते कधीही एकत्र येत नाहीत. महाराष्ट्र सदनातील गणेशाेत्सवातही मराठी लोकांचा शुकशुकाट असतो. निवासी आयुक्त बिपीन मलिक आणि प्रधान सचिव लोकेशचंद्र हे मराठीतून बोलतात. परंतु नवीन महाराष्ट्र सदनामध्ये ते मराठी लोकांना आणू शकले नाहीत. या महाराष्ट्र सदनात प्रवेश केल्यापासून बाहेर निघेपर्यंत कानावर हिंदी स्वर येतात. एखादा कोणी मराठीत बोललाच तर त्याच्याकडे मान सहजरीत्या वळते. मराठी भाषेचे एवढे दुर्दैव याठिकाणी आहे. शिवसेनेला हे कधी दिसले का नाही? ‘ रोजा-रोटी’ नंतर हे इतके गारठले आहेत की आपण मावळे असल्याचे भानही दिल्लीच्या थंडीत त्यांना राहिले नाही. संयुक्त महाराष्ट्र राहील अशा बोंबा ठोकणाऱ्या शिवसेनेचा दिखावा वरवरचा आहे. विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपच पुढे जाणार नाही हे दिल्लीत जवळपास निश्चित झाले आहे. दिव्य मराठीने विदर्भ राज्यासाठी केंद्रातील भाजपच सरकारची भूमिका सकारात्मक नसल्याकडे सातत्याने लक्ष वेधले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीतून ते स्पष्ट झाले. पुढे भाजप शिवसेनेचा धाक दाखवणार आहे. विदर्भाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे हे मारल्यासारखे करतील आणि देवेंद्र फडणवीस हे रडल्यासारखे करतील. हे सगळे झाले तरी विदर्भातील शिवसेनेच्या खासदारांच्या मनात विदर्भ राज्य व्हावे या ‘भावना’ आहेत. वरवर कितीही विरोध दर्शवला तरी पोटात असलेल्या काही गोष्टी ओठात येतात. परवा भावना गवळींच्या बाबत लोकसभेत असेच घडले. त्यांनी विदर्भात म्हणण्याऐवजी ‘विदर्भ राज्यात’ बेकारांसाठी उद्योग उपलब्ध करून द्यावेत यासाठी लोकसभेत जोरकस मागणी केली. खा. गवळी यांच्या मनात ‘विदर्भ राज्यातील’ तरुणांच्या रोजगाराबाबतची तळमळ दिसून आली. बॅँका कर्ज उपलब्ध करून देत नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्जाची परतफेड कशी करणार? हा प्रश्न बॅँक या तरुणांना करतात त्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सभागृहाच्या बाहेर मात्र त्यांनी ‘स्लिप टंग’ असे सांगून सावरासावर केली असली तरी कधीतरी भावना बोलतात असे म्हणतात ते खरे आहे.