आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेट्रॉइट : आपण धडा घेणार का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात 1701 मध्ये डेट्रॉइट या छोट्या गावात कॅडीलॅक या फ्रेंच सरदाराने आपल्या 100 सहका-यांसह वसाहत स्थापन केली. जवळून वाहणा-या डेट्रॉइट नदीचे नाव या वसाहतीला दिले गेले. मऊ लोकरीचा धंदा या गावात सुरू झाला. 1704 मध्ये फ्रान्स सरकारने या गावचा मालकीहक्क कॅडीलॅकला दिला, पण कॅडीलॅकच्या लोभी व जुलमी स्वभावामुळे त्याला विरोध झाला. त्याची बदली न्यू ओर्लियन्स येथे गव्हर्नर म्हणून झाली. त्यानंतर रोमन कॅथॉलिक जनतेची इथे वस्ती वाढत गेली. अमेरिकेतली दुस-या क्रमांकाची ही सर्वात जुनी रोमन कॅथॉलिक वसाहत फ्रॅँको मारी पिकोट या शेवटच्या फ्रेंच सरदाराने 29 नोव्हेंबर 1760ला शरणागती पत्करून डेट्रॉइटचा ताबा ब्रिटिशांना दिला. 1795ला ब्रिटिशांनी डेट्रॉइट अमेरिकेच्या हवाली केले, पण 1812 मध्ये ब्रिटिशांच्या एका छोट्या तुकडीने केलेल्या हल्ल्याला घाबरून गव्हर्नर हूल याने डेट्रॉइट पुन्हा ब्रिटिशांना दिले. गव्हर्नर हूलला या घाबरटपणाची सजा म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, पण अमेरिकेच्या त्या वेळच्या अध्यक्षांनी ही शिक्षा माफ केली. अमेरिकेने 1813मध्ये डेट्रॉइट पुन्हा ब्रिटिशांकडून जिंकून घेतले व तिथे कायमचे सैनिकी तळ उभारले. 1805मध्ये लागलेल्या आगीत या गावाचे अतोनात नुकसान झाले, पण डेट्रॉइट पुन्हा डौलाने उभे राहिले. या आगीचे चिन्ह डेट्रॉइटच्या मानचिन्हांवर आहे. ए. बी. वूडवर्ड यांनी या गावाची वॉशिंग्टन शहरासारखी पुनर्आखणी केली. या शहरात हळूहळू विविध उद्योगधंदे येऊ लागले व शहर विकसित होऊ लागले. फ्रेंच पद्धतीच्या वास्तुशास्त्राचा इथल्या इमारतींच्या रचनेत पगडा होता. त्यामुळे ‘पश्चिमेचे पॅरिस’ हे विशेषण या शहराला लाभले.


उद्योजकांकडून मिळणा-या करउत्पन्नातून शहराचा विकास होत गेला. ‘ग्रेट लेक रिजन’च्या कक्षेत असल्याने डेट्रॉइट शहराला वाहतुकीचा रस्ता, जलमार्ग व रेल्वेमार्ग या तिन्हींचा चांगलाच फायदा झाला. ‘ट्रान्सपोर्टेशन हब’ असे म्हटले जाऊ लागले. 1870मध्ये पार्के डेव्हीस या औषध कंपनीने इथे आपले बस्तान बसवले. पाठोपाठ प्रेडरिक स्टर्न कंपनी व ग्लोब टोबॅको कंपनी डेट्रॉइटला आल्या. मोठमोठ्या सडकांच्या बांधकामासाठी, मिशिगन राज्य व अमेरिकन केंद्र सरकाराने मोठी मदत दिली. डेट्रॉइट फुलू लागले, पण ख-या अर्थाने डेट्रॉइट वाढीला लागले हेन्री फोर्ड यांच्या 1904 च्या मोटार निर्मिती कारखान्याने. त्यानंतर जनरल मोटार्स, स्टुडबेकर मोटार आली व डेट्रॉइट मोटो टाऊन झाले. फोर्ड यांनी जादा पगार जादा उत्पादन या तत्त्वाचा अवलंब करून दिवसाला 5 डॉलर किमान पगार देण्याचे धोरण ठेवले. 1910मध्ये त्या वेळी सर्वसाधारणपणे दिवसाला किमान 2 ते 3 डॉलर मिळत. वाढता मोटार धंदा, चांगला पगार यामुळे या शहरांकडे सर्वांची रीघ लागली. दुस-या महायुद्धापर्यंत डेट्रॉइटच्या मोटार धंद्याने पूर्ण विकास साधला होता. देशांतर्गत नवश्रीमंत मोठ्या प्रमाणात तयार होत होता, त्यामुळे मोटारींना मागणी भरपूर होती. जगातल्या इतर देशातही मागणी होती. त्यामुळे निर्यातीला वाव होता. त्यातच पेट्रोलच्या नव्या खाणी सापडत होत्या. त्यामुळे मोटार धंदा वाढतच होता. जागतिकीकरणाचा पूर्ण लाभ अमेरिकन भांडवलदार लाटत होते.


नोकरीची हमी, चांगला पगार यामुळे बाहेरून मोठ्या प्रमाणात कामगार येऊ लागले. सुरुवातीला फ्रेंच व इंग्रज त्यानंतर जर्मन व पोलंडचे निर्वासित इथे मोठ्या प्रमाणात स्थाईक झाले. त्यांनी नोक-यांबरोबरच इतर छोटे मोठे धंदे उभारले. सुरुवातीला राहण्यासाठी मोठमोठ्या इमारतीही बांधण्यात आल्या. 1765मध्ये डेट्रॉइटची लोकसंख्या 800 होती. 1900 ते 1930 या तीस वर्षांच्या कालावधीत लोकसंख्या 2,65,000वरून 15 लाखांवर पोहोचली. 1950मध्ये 18,50,000 लोकसंख्या होती. त्यात सुमारे 84 टक्के गोरे होते. जर्मन, जर्मन ज्यू, पोलीश आदी लोकांचा समावेश होता. उरलेले निग्रो, अरब होते. या प्रत्येक समूहाचे वेगवेगळे अस्तित्व होते. प्रत्येकाचे स्वार्थ वेगळे होते. शहराच्या ऐक्याच्या दृष्टीने हे घातक होते.
नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेच्या दक्षिण भागातून निग्रो कामगारांचा ओघ हळूहळू वाढला. मोटार कारखान्यात 1942मध्ये निग्रोचे प्रमाण 4 टक्के होते. 1945मध्ये 15 टक्क्यांनी, तर 1960मध्ये 16 टक्क्यांनी झाले. गोरे आणि काळे यांच्यातला संघर्ष वाढू लागला. पहिली घटना 6 मार्च 1863ला घडली. त्यात दोन निग्रोंचा मृत्यू व अनेक निग्रो जखमी झाले होते. कारण, गो-यांचा वरचश्मा होता. त्यानंतर जून 1943 ला काळे- गोरे यांच्यातला संघर्ष पेटला. तीन दिवस रस्त्या-रस्त्यांवर चौका-चौकात मारामा-या चालल्या होत्या. 25 काळे व 9 गोरे मारले गेले. 433 जखमी दवाखान्यात दाखल झाले. शेवटी लष्कराने शांतता निर्माण केली. शहराच्या अधोगतीला जशी आर्थिक कारणे आहेत, तशी वर्णभेदाचा संघर्ष हे सामाजिक कारणही मोठ्या प्रमाणात आहे.


आज या शहरातली लोकवस्ती फक्त 6,85,000 एवढीच उरली आहे. श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय गो-यांनी जवळपासच मोठ्या प्रमाणात बंगले खरेदी करून त्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. त्यामुळे मुख्य शहरातल्या इमारती मोठ्या प्रमाणात ओस पडल्या आहेत. इमारतींच्या किमती ढासळल्या आहेत. त्यामुळे कर उत्पन्नांवर विपरीत परिणाम झाला आहे. 60 ते 70च्या दशकात पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम मोटारींच्या खपावर झाला. त्यातच जर्मन, जपानच्या मोटार कंपन्या स्पर्धेत उतरल्या. जागतिकीकरणाचे वर्तुळ पूर्ण झाले होते. तोटा अमेरिका या राष्टÑाला होत होता, पण भांडवलदार मात्र फायद्यातच होता. डेट्रॉइटमधील मोटार धंदा आज बुडल्यातच जमा आहे. उत्पन्न कमी व खर्च जास्त, अशा दुर्दैवी फे-यात डेट्रॉइट नगरपालिका अडकली आहे. जून 2000मध्ये इन्कमटॅक्सच्या स्वरूपात डेट्रॉईट शहराला 378 दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. जून 2012ला ती रक्कम 233 दशलक्ष डॉलर एवढी कमी झाली होती. प्रत्येक प्रकारच्या कर उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शहरात बेकारीचे प्रमाण फार वाढत आहे. जून 98 ला 7 टक्क्यावर असलेली बेकारी आज 25 टक्क्यावर पोहोचली आहे. परिणामी गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. डेट्रॉइट शहराच्या म्युनिसिपालटीवर आज 20 अब्ज डॉलरचे देणे आहे. पेन्शनरांचे हप्ते भागवायला त्यांच्याकडे पैसा नाही. पगार भागवणे अवघड झाले आहे. गव्हर्नर रीक स्रायडर यांनी या आर्थिक समस्येवर इलाज काढण्यासाठी के. डी. ओएर यांना इमर्जन्सी मॅनेजर नेमले आहे. त्यांनी 20 अब्ज डॉलर माफीची सूचना करून नादानीचा सल्ला दिला आहे. त्याप्रमाणे अर्जही दाखल झाला आहे. भारतातल्या कित्येक नगरपालिका आज सुपात आहेत. मुंबई, कोलकाता अशा प्रचंड तर कोची, लखनऊसारख्या लहान नगरपालिकेत उत्पन्न कमी व खर्च जास्त आहे. त्यातच लाचलुचपतीचा महारोग आहेच. कालांतराने त्यांचे डेट्रॉइट न होवो.