आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कर लो दुनिया मुट्ठी में’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सुईच्या टोकावर मावेल एवढीही सवलत जनतेला मिळणार नाही,’ अशी गर्जना करत दहा वर्षे जनतेला वनवासात धाडणा-यांची धडधड आता अचानक वाढली आहे. महाभारताचे युद्ध तोंडावर आहे, असे दिसू लागताच राज्यकर्त्यांच्या अभिमानाची कवच-कुंडले गळून पडू लागली आहेत. त्यात झाड़ूवाल्यांनी प्रस्थापितांची कुंभकर्णी झोप उडवल्याने अराजकतेचा माहोल ( पक्षांमध्ये ) आहे. आपणच जनतेचे वाली आहोत, असे भासवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सारे अस्वस्थपणे सैरावैरा पळताहेत.
राजवाड्यात सन्नाटा पसरलेला आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेले ‘बाबा महाराज’ अस्वस्थपणे येरझारा घालताहेत. ‘काय करावे, कसे करावे,’ या विवंचनेत ‘बाबा महाराज’ आकंठ बुडालेले आहेत. ‘दिव्यदृष्टी’ लाभलेले संजय खिडकीच्या बाहेर बघत आहेत. ‘बाबा महाराज’ डोळ्यावरची पट्टी खाली सरकवतात, जागरणाने लाल झालेले डोळे चोळतात व पट्टी पुन्हा वर सरकवतात.
‘झाले महाराज डोळे खाजवणे ?’
‘खाजवणे नाही, चोळणे म्हणतात त्याला संजय,’ म्हणताच संजय क्रोधाने महाराजांकडे बघतात, पण महाराजांना काहीच दिसत नसल्याने महाराज त्यांची दखलही घेत नाहीत.
‘तुमचे नेहमीचेच आहे,’ असे म्हणत संजय निषेध व्यक्त करतो.
‘कशाबद्दल बोलताय संजय तुम्ही?’
‘कशाबद्दल काय ? अहो, रागाची वेळीच दखल घेतली असती तर ही वेळ आलीच नसती ना महाराज.’
‘खरेच, तुमचेही योग्यच आहे संजय, पण आम्ही पट्टी लावून आहोत, आमचाही नाइलाज आहे. तुम्ही जेवढे मला सांगताहेत तेवढेच मला कळते आहे.’
‘महाराज तुमच्या या नाकर्तेपणामुळे मला दोन दिवस रणांगणावर उपोषण करावे लागले.’
‘संजय ! अरे वेळ बिकट आहे. तेव्हा आता थोडे कामाला लागावे’
‘आमचा आराम तेवढा डोळ्यात येतो!’
‘संजय, लढाई रणांगणावर, आपापसात भांडायची वेळ नाही.’
‘बाबा महाराज! पण मग ते अंबानी कुठे आपले शत्रू आहेत ? मग त्यांच्याशी भांडण का?’
‘संजय, आता सांगा बरे, रणांगणावर आता काय काय घडते आहे?’
‘महाराज, पाची पांडव आक्रमक झाले आहेत. कोणी टोलला विरोध करीत आहेत तर काही माझ्याप्रमाणे वीजदरावरून रान उठवत आहेत.
‘वीज दराचे पेटंट तर तुम्ही घेतले आहे ना ? मग अजून कुणी या मुद्द्यावरून आंदोलन करू शकते?’
‘बरं! तो महाविनाशी भीम काय करतो आहे ? त्यावर खास लक्ष ठेवा हं!
‘कोण भीम महाराज?’ ‘अरे बाबा, ते झाडूवाले!’
‘धैर्य ठेवा महाराज. आपण आता नवा मंत्र द्यावा सैन्यात चैतन्य फुलवण्यासाठी.
‘नवा मंत्र? हे काय नवीनच ?’ ‘ओके ! कर लो दुनिया मुट्ठी में’
‘हा अंबानी बंधूंनी वापरलेला मंत्र आहे!’
‘महाराज त्याचे पेटंट 'अंबानी' बंधूंकडे आहे.’
‘अरे संजय, त्यांना कळव, काही दिवस तुम्ही आमच्या मुठीत राहा. एकदा का पुन्हा सत्तेवर आलो की आम्ही तुमच्या मुठीत येऊ म्हणा बाबांनो.’
‘कळले बाबा महाराज. महाराजांचा विजय असो, काय पण विचारसरणी आहे म्हणायची. धन्य आहात आपण आणि आपले सैन्य’
‘बरं! आता वेळ न दवडता तिकडे कळवताय ना?’
‘होय महाराज. हा काय मुकेशभार्इंना मोबाइल लावायचा प्रयत्न करतो आहे.’ संजय कपाळावर आलेला घाम पुसतो. तसे महाराज समजून घेतात की पलीकडून फोन उचलला आहे.
‘हॅलो ! मुकेशभाई, सॉरी अनिलभाई ! हाँ, आपका बंदा बात कर रहा हूँ, पहचाना नहीं, सेवक आपका, संजय बात कर रहा हूँ. फिर भी नहीं पैचाना, अरे बाबा, आपकी वजह से दो दिन रस्ते पर भूखा सोया वोच. बाबा महाराजचा निरोप आहे, दोन-तीन महिने ‘बिजली का करंट’ जरा कमी करा बुवा! धा, पंधरा, वीस टक्के. दोन-चार महिना फकस्त. नंतर आम्ही पुन्हा सरकार बनवणार. तो सिर्फ दो-तीन महीने तुम हमारी मुट्ठी में. बाद में हमीच तुम्हारी मुट्ठी में. तब्बल पाच वर्षांपर्यंत. लिहून देऊ का तसे ? को-ऑपरेट करा बुवा. शुक्रिया भाई हाँ.’