आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरा ना मानो होली है...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकमेकांना ऑफिशियली शिव्या देण्याचा सण आला अन् यंदाची होळी ‘दादां’कडे असे ठरले. ठरल्याप्रमाणे सर्वांनी दादांचे घर गाठले. उद्धव, आठवले, भुजबळ, राज, पृथ्वीराज बाबा, शरद पवार, आर.आर. आबा, गडकरी, मुंडे सारे जमले. घराच्या गेटवर पोहोचताच ‘जो बोंब नाही मारणार त्याच्या बैलाला रे ... भो ...! अशी सामूहिक आरोळी ठोकली! दादा चिडूनच बाहेर आले! तेव्हा राज पुढे येऊन म्हणाले असे चिडायचे नाही आणि कपाळावर आठ्या आणायच्या नाहीत!' हे ऐकताच रामदास आठवले फिस्सकन हसतात. ‘हे तुम्ही सांगणार दादांना ? हद्द झाली.’

‘रामदासजी! असे नाही. कवितेतून सांगा तुम्हाला काय म्हणायचे आहे ते. ओके ?’ उद्धव हसतच म्हणाले. तसे रामदास पुढे सरसावतात,
‘कोण कुणाबरोबर लढतो कळत नाही’
कशा तुटल्या जन्मोजन्मीच्या गाठी ?
दादा - राज ऐका तुम्ही माझे,
आजच्या दिवस कपाळावर नको आठी !’
रामदासांनी कविता ऐकवताच हास्याचा फवारा उसळतो. तसे रामदास अजून खुश होतात. शरद पवार कौतुकाने त्यांच्याकडे बघतात.
‘बर, ते सगळे सोडा, आता गाण्याच्या भेंड्या खेळून होळी साजरी करूया आणि खेळताना एकमेकांवर राजकीय कॉमेंट मात्र करायची नाही हं!’ शरद पवार प्रस्ताव ठेवतात. तसे सारे अनुमोदन देतात. एका गटात मुंडे, गडकरी, राज ठाकरे, शरद पवार तर दुसर्‍या गटात पृथ्वीराजबाबा, अजितदादा, उद्धव ठाकरे, रामदास आठवले व भुजबळ असे ठरते .
‘श्रीगणेशाय नम:’ आता ‘ह’वरून गाणे म्हणा. उद्धवजींची टीमपासून सुरुवात करा,’ असे शरद पवार म्हणतात आणि उद्धव गडकरीकडे पाहत गाणे म्हणण्यास सुरुवात करतात,
‘हमारे सिवा, तुम्हारे और कितने दीवाने हैं...?’
गाणे ऐकताच गडकरी उसळतात ‘हे बरोबर नाही. राजकीय टोमणे मारायचे नाहीत असे ठरले आहे ना ?’
‘तुम्हाला तसे वाटत असेल तर मी काय करू ? बरं, गाणे म्हणा ‘ह’ अक्षर आले तुमच्यावर’ असे म्हणून उद्धव सुटका करून घेतात.
गाणे म्हणण्यास मुंडे पुढे सरसावतात, ‘हम बने, तुम बने एक दूजे के लिए....’
‘गोपीनाथराव दरवेळेस सांभाळून घेतात बुवा! ‘य’आलं रे तुमच्यावर, रामदासजी, आपली कविता ऐकवू नका.’अशी प्रतिक्रिया अजितदादांनी देताच पुन: एकवार हास्याचा स्फोट होतो. तसे आठवले खळाळून हसत गातात, ‘ये लाल रंग कब मुझे छोड़ेगा....'
कुठला लाल रंग म्हणताय रामदासजी ? रेड वाइनचा की तुमच्या लाल रंगाच्या पँट आणि शर्टबद्दल बोलताय ?’ शरद पवार हसून फिरकी घेतात. पवार गटाने ‘ग’वरून पटकन गाणे म्हणावे, नाहीतर भेंडी चढवतो, असे उद्धव फर्मान काढतात. तसे गडकरी राजच्या गळ्यात हात टाकून गायला सुरुवात करतात, ‘गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल...’
‘कशातले गाणे आहे हो हे नितीनजी ?’ पृथ्वीराजबाबा मौन सोडतात. ‘गाइडमधले आहे हो हे,’ राज उसळूनच बोलतात, तसे गडकरी खो-खो हसू लागतात. ‘बरोबर आहे नितीनजी! तुम्ही गाइडच झाले आहात ना आता मनसेचे...
‘उद्धवजी खेळीमेळीने घ्या बुवा, असे चिडू नका ना प्रत्येकावर,’ शरद पवार काकांच्या अधिकाराने झापतात. तसे उद्धव नाराजीनेच खाली बसतात.
‘बर, गाणे म्हणा, एवढा वेळ नाही घ्यायचा. 'ल’ आले तुमच्यावर’ मुंडे सूचना करतात.
रामदास पुन्हा एकवार बाह्या सरसावून तयार होतात. ‘लंबी जुदाई...चार दिनो दा...प्यार ओ रब्बा... बड़ी लंबी जुदाई...' गाणे म्हणता म्हणता आठवले पवारसाहेबांकडे बघतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागतात.
‘पुरे, पुरे! रामदासजी! महायुतीत करमत नाही का ? सारखे मोठ्या साहेबांकडे पाहून उसासे टाकत असता?’ उद्धव पुन्हा उखडतात. दादा तातडीने उद्धवची समजूत काढायला पुढे सरसावतात.
‘ओके, ‘इ’ अक्षरावरून गाणे म्हणा बरं पटकन पवारसाहेब, गडकरीजी, किंवा गोपीनाथराव तुमच्यापैकी कोणीही...’ भुजबळ आपले मौन सोडतात, तसे इशारा समजून मुंडे गायला सुरुवात करतात ...मीना.. डिका... डे डाय डामनिका... माका नाका माका...’ ‘आयला, हे कुठल्या भाषेतले गाणे आहे हे ? एक शब्द कळला तर शप्पथ,’ अजितदादा पुन्हा चिडतात. ‘दादा, किशोरकुमारचे फेमस गाणे आहे. ‘क’ वरून गाणे म्हणा,’ मुंडे आव्हान देतात. दादा गायला लागतात...
‘कोमेजून निजलेली एक परीराणी उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी...
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या ‘बाबांची’ तुला कहाणी...
शेवटची ओळ म्हणताच सारे पृथ्वीराजबाबांकडे बघून खिदळतात. तसे बाबा घुश्शातच उठतात आणि दादांच्या मागे धावतात. सारे आपापल्या पिचकार्‍या काढतात. दोघांवरही रंगांचा मारा करतात आणि एका सुरात म्हणतात.. ‘बुरा ना मानो होली है!’