आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचखाऊ वृत्तीची इजा, बिजा, तिजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी माणूस हे एक अजब रसायन आहे. देशभरात मराठी माणसांबाबत आणि महाराष्ट्राबाबत अनाहूत कुतूहल असते. सध्याच्या युगात त्याची कारणं विभिन्न असली तरी अगदी ऐतिहासिक काळापासूनच मराठी माणसाची काही वैशिष्ट्ये कायम आहेत. त्यातील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे कचखाऊ वृत्ती. मराठी माणूस किंगमेकर असू शकतो; पण का कोण जाणे, ज्या क्षणी किंग बनण्याची वेळ येते, त्या वेळी त्याची कचखाऊ वृत्ती उफाळून येते. दिल्लीचे तख्त फोडण्याची ताकद राखणार्‍या विश्वासराव पेशव्यांत त्याच तख्तावर पेशव्यांचा वंशज बसवण्याची किंवा छत्रपतींच्या कुणाही वारसदाराला नेमण्याची ताकद होती. मात्र, ते तख्त फोडल्यानंतरही त्या तख्तावर पुन्हा मांडलिक म्हणून का असेना मुघलांच्या वारसदारालाच नेमून विश्वासरावभाऊ दिल्लीहून रवाना झाले. त्याचे व्हायचे तेच परिणाम पुढे सबंध उत्तर हिंदुस्थान आणि यथावकाश हिंदवी स्वराज्यालाही भोगावे लागले. (1857च्या लढाईतही युद्धाची खरी धुरा नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे अशा मराठी खांद्यांवरच होती. मात्र, उठाव करणार्‍यांकडून दिल्ली जिंकल्यानंतर त्या गादीवर जर्जर झालेल्या बहादूरशहा जफरचीच नियुक्ती करण्यात आली होती.)
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या बोलावण्यानंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाची गादी सोडून दिल्लीला देशरक्षणासाठी धावलेले ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीतही काहीसा असाच प्रकार घडला. चीनच्या 1962 च्या युद्धातून धडा घेतल्यानंतर लष्कराच्या उभारणीवर मेहनत घेऊन पाकिस्तानला 1965च्या लढतीत धूळ चारल्यानंतर संरक्षणमंत्री यशवंतराव हे लालबहादूर शास्त्रीनंतरचे सर्वाधिक लोकप्रिय मंत्री होते. पक्षसंघटनेतही त्यांचा खूप दबदबा होता. ताश्कंदच्या विजयी करारानंतर शास्त्रीजींचे अचानक निधन झाले. त्यानंतरचा पंतप्रधानपदाचा दावा खरे तर यशवंतराव यांचाच होता. त्या दृष्टीने हालचालीदेखील अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र, पंडितजींचे नाव पुढे करून ऐन वेळी यशवंतरावांना दर्शनी प्रिय भासेल अशा शब्दांत प्रेमळ गळ घालण्यात आली. त्या स्थितीतही यशवंतरावांनी त्यांचा दावा कायम ठेवला असता, तर कदाचित देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहासही वेगळा लिहावा लागला असता. इथेही पुन्हा एकदा दिल्ली मराठी माणसाच्या हातातून निसटली. त्यानंतर ती संधी पुन्हा महाराष्ट्राला कधीच मिळाली नाही. (त्यांचाच ‘वारसा’ सांगणार्‍यांना ‘पुढची टर्म आता त्यांचीच’ असे आतापर्यंत दोन-तीनदा तरी वाटत आले आहे. 2014च्या निवडणुकीनंतरदेखील काहीतरी चमत्कार घडेल आणि आपली पंतप्रधानपदाची स्वप्नपूर्ती होईल, असेही त्यांना वाटत आहे. मात्र, ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याची शक्यता सद्य:स्थितीत तरी कमीच दिसते.)
इजा, बिजा झाले; आता कचखाऊ वृत्तीचा हाच प्रत्यय दिल्लीतील ‘आप’ विजयातही दिसून येत आहे. ज्या अण्णांच्या आंदोलनामुळे खरे तर दिल्लीतील राजकीय हवा तापली त्याच दिल्लीत ‘आप’ला मिळालेले यश हे अण्णांच्या आंदोलनामुळेच मिळाले आहे. आजही अण्णा बरोबर असते तर दिल्लीत ‘आप’ला निर्विवाद यश मिळाले असते, हे सांगणार्‍यांमध्ये ‘आप’चेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे आंदोलन अण्णांनी उभे केले; त्याचे हीरो अण्णाच; मात्र, दिल्लीतील ‘जंतरमंतर’नंतर ज्या वेळी राजकीय घमासान सुरू करण्याची वेळ आली, त्या वेळी अण्णांनी राजकीय पक्षासाठी काम करण्यास तसेच साधा पाठिंबा देण्यासही नकार दर्शवला. पुन्हा एकदा कचखाऊ वृत्तीच आडवी आली. आता अरविंदला माझे आशीर्वाद आहेत, मी तिथे असतो तर संपूर्ण बहुमत मिळाले असते, अशी वाक्ये माध्यमांसमोर मारण्यातच सुख मानले जात आहे. परंतु आता त्याचा कोणताही उपयोग नाही. कारण पुन्हा तेच. कचखाऊ वृत्ती पुन्हा आडवी आली; अन्यथा दिल्लीचा इतिहास पुन्हा वेगळा झाला असता. त्यामुळे ही वृत्ती कधी आपल्या मनातून हद्दपार होईल, हाच खरा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उफाळून आला आहे.
दिल्ली जिंकणे हे केवळ लाक्षणार्थिक म्हणजे देशावर अधिराज्य, असेच धरले तर त्याचे खेळातील उदाहरणही फार जुने नाही. द्रविडला (तोदेखील पूर्ण मराठीच, कर्नाटकातील त्याच्या घरात मराठीच भाषा बोलली जाते.) कप्तानपदाचे ओझे वाटू लागल्यावर त्याने पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी बीसीसीआयचे अध्यक्ष असणार्‍या शरद पवार (पुन्हा मराठी) यांनी ती जबाबदारी पेलण्याची विनंती दुसर्‍या मराठी माणसाकडे (भारतरत्न सचिन तेंडुलकर) केली. त्याने ती जबाबदारी नम्रपणे नाकारत (असं म्हणण्याची प्रथा आहे, अन्यथा त्याला जबाबदारी टाळणे किंवा कचखाऊ वृत्तीच म्हणतात.) धोनीकडे सोपवण्यास आणि तोच योग्य पर्याय असल्याचे सांगून टाळली. पुढे जे काही घडले तो इतिहास सर्वज्ञात आहे. आता धोनी भारताचा सर्वकालीन महान कर्णधार बनला आहे. त्याचे श्रेय अर्थातच मराठी माणसाला. म्हणजे किंगमेकर सचिनच. मात्र, सचिन स्वत: कर्णधार म्हणून अपयशी ठरला. तिथेही कचखाऊ वृत्तीच आड आली, असाच निष्कर्ष कुणी काढत असेल तर दोष कुणाला द्यायचा?