आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमताचा कौल घेऊन आपली फुटपट्टी आपणच मोजून घेण्याची संधी धुळे शहर आणि जिल्ह्यातील राजकारण्यांना जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली होती. जिल्हा परिषदेत धुळे ग्रामीणमध्ये गेलेली पत माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी परत मिळवली, पण त्यांना धुळे शहराने पुन्हा एकदा परके समजून महापालिकेत अपेक्षित यश त्यांना मिळू दिले नाही. त्यांच्या विनंतीनुसार प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनाही अपयशाचे धनी व्हावे लागले. अशीच परिस्थिती आमदार गोटे यांची झाली आहे. गोटे यांनी महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सरकारपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन 50 नव्हे, तर महिलांना 100 टक्के उमेदवारी देऊन ‘महिला राज’ आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यात 99 टक्के अपयश आले. याचा अर्थ निवडणुकीच्या पूर्वपरीक्षेत गोटे नापास झाले आहेत. त्यांना आता या निकालातून धडा घेत विधानसभेसाठी ‘हार्डवर्क’ करावे लागणार आहे.
धुळे महानगरचे आमदार अनिल गोटे असले तरी महपालिकेच्या माध्यमातून राष्टÑवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचेच शहरात वर्चस्व राहिले आहे. विधानसभा जिंकून आमदार व्हायचे असेल तर तुल्यबळ प्रतिस्पर्धी अनिल गोटे यांना महापालिकेतच लगाम लावण्यासाठी कदमबांडे यांनी प्रयत्न केले आणि यात त्यांना यश आले. दरम्यान, कदमबांडेंचे स्वप्न हे स्वप्नच राहावे म्हणून माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी प्रथमच शहराच्या राजकारणात लक्ष घालून राष्टÑवादीशी आघाडी न करता सर्वच जागा लढवण्याचा प्रयोग केला. या तिघांमध्ये शिवसेना-भाजपची परिस्थिती अधिकच मरगळल्यासारखी झाली. प्रत्यक्ष निवडणुकीतील चित्रही तसेच झाले. शिवसेनेने कशाबशा 11 आणि भाजपने पूर्वीइतक्याच तीन जागा मिळवून शहरातील आपले संख्याबळ घटवून घेतले. चौरंगी लढतीत स्पष्ट बहुमताएवढ्या म्हणजे 70 पैकी 34 राष्टÑवादी आणि दोन पुरस्कृत उमेदवार पक्षाला मिळाले आहेत. त्यामुळे काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची गरजही राष्टÑवादीला राहिली नाही. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समाजवादी पार्टी प्रथमच निवडणूक लढली आणि तीन जागा जिंकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याउलट राज्यभरात शिरकाव करणार्या मनसेने महापालिकेची दुसर्यांदा निवडणूक लढवून खातेही उघडू शकली नाही. विशेष म्हणजे मनसेने या वेळेस अधिक उमेदवार उभे केले आणि गतवेळपेक्षा कमी मते मिळवली. याचाच अर्थ मनसेला शहरात खूप काम करावे लागेल किंवा काम करणारे लोक द्यावे लागणार आहेत.
आमदार गोटेंना का नाकारले?
शहराचे आमदार अनिल गोटे यांनी पांझरा नदीवर ब्ल्यू लॉन टाकू, मनमाड-इंदूर रेल्वेचे काम 2011पर्यंत करू, सफारी गार्डन आणि बरेच काही आश्वासन देऊन ठेवले होते. दिलेल्या आश्वासनांपैकी पांझरेवर केटीवेअर बंधारा आणि चौपाटी ही दोन कामे नजरेत भरण्यासारखी दिसतात; पण त्यातून जनतेचे मन भरले नाही. विरोधकांनी नेमका हाच प्रचार केला आणि लोकांच्या मनातून गोटेंना हद्दपार करण्याच्या पहिल्या परीक्षेत ते यशस्वी झाले. आता अंतिम परीक्षा म्हणजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबतच जनमत गेले तर गोटेंवर पुन्हा पाच वर्षे मागे जाण्याची वेळ येईल; पण गोटे म्हणजे दूरदृष्टी आणि व्हीजन असणारं धाडसी व्यक्तिमत्त्व. एक निवडणूक हरल्यानंतर हार मानणार्यांपैकी ते नाहीत; त्यामुळे निवडणुकीपूर्वीच्या आठ महिन्यांत मतदारांची मने वळवण्यासाठी ते नवीन प्रयोग करतील, हे मात्र तेवढेच खरे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.