आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर-रुग्ण संबंध दुरावताहेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वैद्यकीय व्यवसाय ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आणल्यापासून रुग्णाने ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचे आणि ग्राहक न्यायालयाने रुग्णाला डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबद्दल नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. दिल्लीतील एका नेत्र चिकित्सकाला ‘नॅशनल कन्झ्युमर रिड्रेसल कमिशनने रुग्णाची डाव्या डोळ्याची दृष्टी जाण्यास दोषी ठरवून रु. 50,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या प्रकरणात कमिशनने नेत्र चिकित्सकाला ‘लिमिटेड मेडिकल निग्लिजन्स’ म्हणजे मर्यादित वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरवले आहे. त्याचबरोबर रुग्णालाही दोषी ठरवले आहे. कमीअधिक प्रमाणात अशा प्रकारच्या घटना वैद्यकीय व्यवसायात नेहमीच घडत असतात. म्हणूनच या विषयावर चर्चा होणे आवश्यक झाले आहे. वरील केसमध्ये रुग्ण डोळ्यात झालेल्या एका निरुपद्रवी वाढीसाठी नेत्र चिकित्सकाकडे गेला होता. नेत्र चिकित्सकाने त्याला एका छोट्याशा शस्त्रक्रियेने ही वाढ काढून टाकता येईल व लवकरच पूर्ण बरे वाटेल, असे सांगून त्याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पोटात घेण्यासाठी काही औषधे व ही वाढ पुन्हा उद्भवू नये म्हणून औषधाचे थेंब ‘प्रिस्क्राइब’ केले. हे थेंब एका इंजेक्शनपासून बनवले होते. त्याचा एकच व्हायल बनवून रुग्णाला दिला होता व रुग्णाने ते दोन आठवड्यांपुरते डोळ्यात टाकायचे होते. हे थेंब पुन्हा वाढ होऊ नये म्हणून डोळा कोरडा राखण्यासाठी होते.

ही औषधे घेऊन रुग्ण गेला. कोणत्याही फॉलोअपसाठी न येता रुग्णाने डोळ्यात थेंब टाकणे सुरूच ठेवले. समस्या वाढल्यावर रुग्णाने दुस-या नेत्र चिकित्सकांचा सल्ला घेतला. त्यांनी त्या औषधी थेंबामुळे डोळा कोरडा होऊन त्या डोळ्याची दृष्टी गेली असल्याचे रुग्णाला सांगितले. म्हणून रुग्ण ग्राहक न्यायालयात गेला. औषधी थेंब केवळ दोन आठवडे टाकावेत, असे डॉक्टरांनी सांगितले असतानाही रुग्णाने ते अधिक काळ वापरले. खरे तर याचा दोष मोठ्या प्रमाणात रुग्णाकडे जातो. परंतु डॉक्टरने औषध लिहिण्याच्या कागदावर औषधाचे प्रमाण आणि वापरायचा कालावधी लिहिला नसल्याने कमिशनने डॉक्टरला निष्काळजीपणासाठी- मर्यादित वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरवून नुकसान भरपाईचा आदेश दिला. आपण लिहून दिलेली औषधे किती, कशी, कोणत्या वेळी घ्यायची हे डॉक्टरने रुग्णाला व रुग्ण अल्पवयीन वा अशिक्षित असल्यास त्याच्या नातेवाइकाला तोंडी समजावून सांगायला हवे. परंतु तितकेच पुरेसे नाही तर ते प्रिस्क्रिप्शनवर लिहूनही द्यायला हवे, ही गोष्ट डॉक्टरांनी कटाक्षाने पाळायला हवी. घाई असल्याने वा अन्य काही कारणाने काही वेळा असे होत नाही. अमेरिकेसारख्या देशात ही जबाबदारी केमिस्टवर सोपवलेली असते व औषधांच्या दुष्परिणामांसाठी केमिस्ट जबाबदार असतो.

रुग्ण एखादे औषध जास्त काळ किंवा पुन:पुन्हा वापरतो, याचेही कारण शोधायला हवे. काही वर्षांपूर्वी माझे एक डॉक्टर मित्र मुंबईच्या एका प्रख्यात रुग्णालयात दाखल होते. त्यांना भेटायला गेलो असता त्यांनी त्यांच्या डोळ्यांची आग होते आहे, असे मला सांगितले.त्यांचा मुलगा तेथेच होता. तो सिस्टरला बोलावण्यासाठी बेल मारण्याअगोदरच माझे डॉक्टर मित्र म्हणाले की, सिस्टरला बोलवू नकोस. ती नेत्र चिकित्सकाला बोलावेल आणि दहा रुपयांच्या आय ड्रॉप्सच्या प्रिस्क्रिप्शनसाठी हजार रुपये व्हिजिटिंग फी द्यावी लागेल.

डॉक्टरांची, विशेषत: तज्ज्ञ डॉक्टरांची फी सर्वसामान्यच नव्हे, तर मध्यमवर्गीय माणसाच्याही आवाक्यात राहिलेली नाही. म्हणूनच ब-याचदा रुग्ण फॉलोअपला जाण्याचे वा डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. जुन्या प्रिस्क्रिप्शनवरचे औषध तशाच लक्षणांवर तेच प्रिस्क्रिप्शन सांगून औषध घेण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. याचे उत्तर अशी औषधे देणे बंद करावे हे नाही; तर वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांना परवडणारे करावे वा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करणे हे आहे.

डॉक्टरांना कंझ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्टखाली आणून आम्ही फार मोठी क्रांती केली, असा समज बरेच कंझ्युमर अ‍ॅक्टिव्हिस्ट बाळगतात. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे, रुग्णाची तपासणी करून रोगनिदान, जे आधी मोठ्या प्रमाणावर केले जायचे; ते बंद होऊन आता सरसकट पॅथॉलॉजिकल आणि रेडिआॅलॉजिकल तपासण्या केल्या जातात. ब-याचदा त्या खरोखर अनावश्यक असतात. पण पुढे काही गुंतागुंत झाल्यास आपल्यावर जबाबदारी नको म्हणून डॉक्टर मंडळी अशा तपासण्या करूनच औषधोपचार करतात. परिणामी उपचार आणखी महाग होतात. अर्थात जे घडत आहे ते परिस्थितीला धरूनच घडत आहे. एकेकाळी डॉक्टरला जवळजवळ देवासारखे मानले जात असे. फॅमिली डॉक्टर हा केवळ कुटुंबाचा डॉक्टर नव्हता. वडीलधा-यांचा मित्र, सल्लागार आणि लहानग्यांचा डॉक्टर काका होता. डॉक्टरची फी त्या काळातही दिली जायची. पण ते नाते दुकानदार आणि ग्राहकाचे नव्हते. त्या नात्यात सच्चाई आणि जिव्हाळा होता. प्रत्येक क्षेत्राचे व्यापारीकरण करताना आम्ही नात्यातली ही सच्चाई आणि जिव्हाळा यांचा बळी देऊन हे व्यापारीकरण करत आहोत. डॉक्टर-रुग्ण नाते दुकानदार आणि ग्राहकाचे करून - अगदी कायद्याने करून - आपण या नात्यातला ओलावाच नष्ट केला आहे.