आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा की फसवणूक (दीपक पटवे)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण, गंगापूर आणि बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यासारख्या गोदावरी पट्ट्यातील शेतकऱ्यांची अवस्था ‘दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत’ अशी झाली आहे. दुष्काळ असूनही त्यांनी मागच्या वर्षी ऊस लावण्याची हिंमत केली. जायकवाडी धरणातील मृत साठ्यावर तो ऊस कसाबसा तगवला आणि आता तो विकायची वेळ आली तर मागच्या वर्षी सुरू असलेला संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यंदा सुरूच झाला नाही. अनुकूलता असूनही तो का सुरू झाला नाही याची कारणे अनेक आहेत आणि त्या खोलात आता जायचे नाही; पण हक्काचा कारखाना बंद राहिल्याने शेतातला ऊस विकला जावा म्हणून कारखान्यांच्या दारोदार फिरण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातून उसाच्या दराविषयी अनिश्चितता निर्माण केली गेली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या संघटनेला मराठवाड्यात पाय ठेवायला संधीही मिळाली. या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी ५ दिवसांपासून पैठणला आंदोलन चालवले होते. रविवारी सायंकाळीच त्याची सांगता झाली.

संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर आठ जिल्ह्यांत मिळून एकूण ७६ साखर कारखाने आहेत. यंदा त्यातले १०-१२ कारखाने कसेबसे सुरू झाले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वातील कारखान्यांचा त्यात समावेश आहे. या दोन्ही कारखान्यांनी पहिली उचल म्हणून २१०० रुपये जाहीर केले आहेत. तिथे बहुतांश शेतकरी ऊस देत आहेत. असे असताना अहमदनगर जिल्ह्यातल्या तीन कारखान्यांना जाणारा ऊस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाहेरून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी पैठणमध्ये अडवला आणि दर जाहीर केल्याशिवाय ऊस जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अचानक पैठणमध्ये कसे आले आणि त्यांनी तीनच कारखान्यांना जाणारा ऊस का अडवला, भाजप नेत्यांच्या कारखान्यांकडे जाणाऱ्या उसाच्या दराविषयी का प्रश्न निर्माण केला नाही, हा संशोधनाचा विषय आहे; पण या आंदोलनामुळे पाच दिवस साधारण १२ ते १५ हजार टन तोडलेला ऊस ट्रॅक्टर ट्राॅली आणि बैलगाड्यांमध्ये पडून होता. रविवारी सायंकाळी चार कारखान्यांनी २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा काही प्रमाणात फायदा झाला असे म्हणता येईल. आता जे कारखाने २१०० रुपये देत आहेत त्यांच्याकडे ऊस जाईल की नाही आणि जे २५०० रुपये द्यायला तयार झाले ते सर्व ऊस घेतील की नाही हे प्रश्न समोर आले आहेत. त्याची उत्तरे कशा स्वरूपात समोर येतात ते लवकरच कळेल.

मध्यंतरी पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर साखर कारखान्याला ऊस दिला. मात्र, तिथे असलेल्या वजनाच्या यंत्राने साधारण १८०० किलो वजन कमी दाखवले, अशी तक्रार त्या शेतकऱ्याने लेखी स्वरूपात केली आहे. त्यावरून बहुतांश साखर कारखाने शेतकऱ्यांची अशीच फसवणूक करत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली आहे. पैठणच्या त्या शेतकऱ्याला अालेला अनुभव हा अपवाद होता की तो आता कारखान्यांनी नियमच बनवून घेतला आहे, हे कळायला सध्या तरी मार्ग नाही. वजनात घट दाखवली जात असेल तर उसाचा दर ही शेतकऱ्यांची दिशाभूलच म्हणायला हवी. त्या संदर्भात सरकारची भूमिका अजून जाहीर झालेली नाही. सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील उसाची लागवड आधीच घटली आहे. त्यामुळे यंदा सुरू न होऊ शकलेले मराठवाड्यातील साखर कारखाने पुढे तरी सुरू होतील की नाही हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रबोधन आणि संघटन हा कळीचा मुद्दा बनला आहे.

मराठवाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाहेरचे कार्यकर्ते आले, असा आरोप केला जातो आहे. मात्र, स्थानिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी काय केले, असाही प्रश्न त्यामुळेच विचारावासा वाटतो. एकेकाळी शेतकऱ्यांना दिलासा वाटणारी शेतकरी संघटना सध्या अस्तित्वहीन झाल्यासारखी आहे. मराठवाड्यात तरी तिचे अस्तित्व अगदीच दिसेनासे झाले आहे. नेत्यांना मिरवण्यासाठी संमेलने आणि परिषदा भरवण्यापुरतेच ते दिसले तर दिसले. जयाजीराव सूर्यवंशींसारख्या थोडी धडाडी असलेल्यांनी वेगळी संघटना तयार करून संघटनात्मक ताकद क्षीण का करून घेतली, असा प्रश्न या पार्श्वभूमीवर पडतो. तसे झाले नसते तर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना इथे येऊन आंदोलन करण्याची आणि २१०० ऐवजी २५०० भाव द्यायला भाग पाडण्याची संधीच मिळाली नसती. यापुढेही या परिस्थितीत बदल घडवायचा की नाही, हे स्थानिक शेतकरी संघटनेनेच ठरवायला हवे.

दीपक पटवे
- निवासी संपादक, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...