Home »Editorial »Columns» Dipak Patave Writes About Animal Welfare Board Of India

धोक्याची घंटा वाजते तेव्हा..

औरंगाबाद शहरात काही हाॅटेलांत भटक्या कुत्र्यांचे मांस बोकडाचे मांस म्हणून विकले जात असण्याचा संशय व्यक्त केला गेला आणि

दीपक पटवे | Oct 02, 2017, 03:00 AM IST

  • धोक्याची घंटा वाजते तेव्हा..
औरंगाबाद शहरात काही हाॅटेलांत भटक्या कुत्र्यांचे मांस बोकडाचे मांस म्हणून विकले जात असण्याचा संशय व्यक्त केला गेला आणि मांसाहारी औरंगाबादकर हादरले. कारण हा संशय व्यक्त केला होता ‘अॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडिया’च्या सदस्या मानद पशुकल्याण अधिकारी मेहेर मथानी यांनी. शहरातील काही भागात फिरताना कुत्र्यांचे धडाशिवाय असलेले शिर सापडले, याचा अर्थ त्यांच्या मांसाचा वापर झाला आहे, असा त्यांनी घेतला. त्यांच्या त्या संशयाने खळबळ निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यानंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांनी काही स्वस्तात नाॅनव्हेज पदार्थ विकणाऱ्यांकडून नमुने घेऊन ते तपासणीसाठीही पाठवले आहेत. त्याचा जो काही अहवाल यायचा तो येईल. पण त्या निमित्ताने इथल्या मांसाहारींना सावध राहायचा एक संदेश तर मिळालाच आहे.

औरंगाबाद शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, हे सांगणारी एक चित्रफीत मनेका गांधींकडे पाठवण्यात आली होती. ती त्यांनी ‘अॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडिया’कडे पाठवली आणि याची चौकशी करण्याची जबाबदारी मथानी यांच्याकडे आली. त्यामुळे त्या शहरात आल्या आणि त्यांच्या वक्तव्याने औरंगाबादकरांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी आपण असा काही संशय व्यक्त केल्याचा इन्कार केला. आपल्या सांगण्याचा माध्यमांनी विपर्यास केला, असेही त्या आता सांगताहेत. कुत्र्यांची धडाशिवाय असलेली मुंडकी का सापडतात, या प्रश्नावर आपण त्याची शक्यता काय असते हे सांगितले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे खरे असेल असे गृहीत धरले तरी भटक्या कुत्र्यांचे केवळ शिर मिळत असेल तरी त्यांचे मांस वापरले जातच नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. निवडणुकीच्या काळात शहराच्या हद्दीबाहेर मोठ्या संख्येने कुत्र्यांची मुंडकी सापडत होती, असे सांगतात. ही माहिती व्हाॅट्सअॅपवरून आली होती. त्यामुळे त्यात कितपत तथ्य होते, हा मुद्दा आहेच. ती माहिती खोटी असेल तर उत्तमच; पण मांसाहार करणाऱ्यांनी, विशेषत: स्वस्तात मांसाहार करू इच्छिणाऱ्यांनी सावध राहायलाच हवे, हे मात्र त्यातून अधोरेखित झाले आहे. धोक्याची घंटा वाजवली म्हणजे धोका होईलच असे नाही. पण आपण सावध होतो आणि काळजी घ्यायला लागतो. तसेच हे कुत्र्याच्या मांसाचेही प्रकरण आहे.

त्या मानद पशुकल्याण अधिकारी जे काही सांगून गेल्या आहेत त्यात तथ्य किती आणि गैरसमज किती, यावरचे संशोधन होत राहील. पण त्या निमित्ताने अन्य जे काही मुद्दे समोर आले आहेत, त्याकडे तरी गांभीर्याने पाहिले जाईल की नाही, हीदेखील शंकाच आहे. या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. केवळ संख्याच नाही तर त्यांची दहशतही वाढते आहे. त्या संदर्भात सातत्याने तक्रारीही केल्या जातात; पण महापालिका त्या तक्रारींची फारशी कधी दखल घेत नाही. अनेकदा एकाच दिवशी २०-२० जणांना कुत्रे चावल्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. लहान मुलांचे लचके तोडल्याच्या बातम्याही फोटोंसह प्रसिद्ध केल्या जातात. पण महापालिकेचे संबंधित अधिकारी तेवढ्यापुरता देखावा करतात आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. अर्थात, त्याला कारणेही तशीच आहेत. एक तर महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ यासारख्या कामांसाठी तर मुळीच नाही. संसाधनांचीही उणीव आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून आणण्यासाठी अवघ्या दोन गाड्यांची सोय आहे. त्यापैकी एक गाडी अाता आतापर्यंत विमानतळाजवळ उभी करण्यात येत होती. कारण विमानतळावर भटक्या कुत्र्यांचा त्रास सुरू झाला आहे आणि त्यांना आवर घातला नाही तर आणखी एखाद्या विमान अपघाताला औरंगाबादकर साक्षी होतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तिथे गाडी उभी करण्यावर फारशी कोणी हरकत घेतली नाही. दुसरी गाडी खूपच तक्रारी वाढल्या तर अचानक या कामासाठी बाहेर काढली जाते. पण एरवी ती काम चुकवत उभी राहते. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचीही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असते. त्याबाबतीतही औरंगाबाद महापालिकेची बोंबच आहे. कधी निधी नाही म्हणून तर कधी ठेकेदार पळून गेला म्हणून महापालिकेचे हे काम बंद असते. त्यामुळेच शहरात झपाट्याने अशा कुत्र्यांची संख्या वाढते आहे. मध्यंतरी महापालिकेचे पथक अशी कुत्री शेजारच्याच एखाद्या गावात ते सोडून यायचे. त्यामुळे त्या वेळी अशा खेड्यांच्या तक्रारी येणे सुरू झाले होते. आता तर त्या तक्रारीही येत नाहीत. म्हणजे महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी शेजारच्या खेड्यात भटकी कुत्री सोडून येत नाहीत, असे नाही तर आता कुत्री पकडण्याचे कामच होत नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच कुत्र्यांचा उपयोग मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी होत असावा, यावर औरंगाबादकरांनी चटकन विश्वास ठेवला, हे लक्षात घ्यायला हवे.
- दीपक पटवे, निवासी संपादक (औरंगाबाद)

Next Article

Recommended