आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद हीच विद्यापीठाची ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनावश्यक वाद निर्माण करणे किंवा होऊ देणे यासाठीच आता औरंगाबादचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ओळखले जाईल, अशी शक्यता वाढत चालली आहे. कारण एक संपत नाही तोवर दुसरा वाद उभा राहतो आहे आणि त्यासंदर्भात कुलगुरू हतबद्ध आहेत. विद्यापीठाचे प्रमुख या नात्याने ठोस आणि विद्यार्थी हितैषी भूमिका घेऊन वाद मिटवणे तर दूरच; पण कुलगुरू बी. ए. चोपडे अनेकदा वाद चिघळण्याची वाट पाहत असतात, असेच वाटते. सध्या विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे आणि त्यासंदर्भात कोणतीही भूमिका कुलगुरू घेत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षात या मुद्द्यावरून पुन्हा एकदा इथे सामाजिक दरी निर्माण होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. 
 

खरे तर हा वाद निर्माण होण्याचे कोणतेही कारण नव्हते. पण सन २०१५ मध्ये कुलगुरू चोपडे यांनीच विद्यापीठाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मनोदय व्यक्त केला आणि नव्या चर्चेला वाट करून दिली. चोपडे यांनी केवळ मनोदयच व्यक्त केला असे नाही तर दोन वर्षांत या पुतळ्यासाठी त्यांनी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात ४५ लाख रुपयांची तरतूदही करवून घेतली. पण त्याव्यतिरिक्त कोणतीही हालचाल झाली नाही म्हणून कुलगुरूंना आठवण करून देण्यात आली आणि त्यानंतर या पुतळ्याला विद्यार्थ्यांच्या काही संघटनांनी विरोध सुरू केला. तसेच दुसऱ्या गटाकडून पुतळ्याच्या समर्थनार्थही शक्तिप्रदर्शने सुरू झाली आहेत. सामाजिक सौहार्द आणि सलोख्याच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक आणि गंभीर बाब आहे.
 
 
विद्यापीठाच्या आवारात आणि समाेर अशा दोन ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. विद्यापीठाला नावच बाबासाहेबांचे  असल्याने विद्यापीठाच्या आवारात त्यांचा भव्य पुतळा असणे संयुक्तिकच आहेे. पण प्रवेशद्वारासमोरही पूर्णाकृती पुतळा उभारला आहे आणि दरवर्षी त्यांच्या जयंतीला त्या पुतळ्याला हजारो आंबेडकरवादी आणि इतरही नागरिक पुष्पमाला अर्पण करतात.
 
हाच पुतळा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या हजारो  नागरिकांसाठी अस्मितेचेही प्रतीक बनला आहे. त्यामुळे दोन पुतळे असूनही त्यांना कधी कोणी विरोध केला नाही. मग आता शिवरायांच्या पुतळ्याला विरोध का, असा प्रश्न करीत शिवप्रेमींनी आपली बाजू मांडायला सुरुवात केली आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सदस्य राहिलेले आमदार सतीश चव्हाण यांनी तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अन्य आमदारांसह कुलगुरूंना भेटून शिवाजी महाराजांचा पुतळा लवकर उभारला जावा अशी मागणी केली आहे. भाजपचे आमदार अतुल सावे नव्याने या पुतळा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे हा वाद राजकीय झाला तर आश्चर्य वाटू नये. 
 

विद्यापीठात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारायला आंबेडकरवाद्यांचा विरोध आहे, असे चित्र रंगवण्यात येत असले तरी वस्तुस्थिती पूर्णपणे तशी नाही. रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे आणि पँथर्स सेनेने सर्वप्रथम आपला विरोध नोंदवला. या सेनेने तर विरोध नोंदवण्यासाठी ठिय्या आंदोलनही केले. त्यामुळे आंबेडकरवादी शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करीत असल्याचे चित्र निर्माण झाले. पण रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाने आणि जय शिवराय - जय भीमराय फाउंडेशनने मात्र पुतळा उभारला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक प्रा. डाॅ. ऋषिकेश कांबळे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी कसे आदर्श होते आणि बाबासाहेबांनी नेहमीच शिवाजी महाराजांचा कसा जयघोष केला होता, त्यांच्या  कर्तृत्वावर कशी भाषणे दिली होती याचे संदर्भ देत पुतळ्याला विरोध करणाऱ्यांना अज्ञानीच ठरवले आहे. आंबेडकरवाद्यांपैकी अनेकांची ही भूमिका औरंगाबाद आणि परिसरात सामाजिक दुही निर्माण होऊ देणार नाही याचे  आश्वासन देणारी असली तरी काही मंडळी मात्र या वादाला जातीय रंग देण्यात रस घेत असल्याचेही समोर येऊ लागले आहे.  
 

खरे तर गंगाधर गाडे आणि पँथर्स सेनेने शिवरायांच्या पुतळ्याला विरोध केला असला तरी त्यांची भूमिकाही पुरोगामी विचारांशी नाते सांगणारी आहे. विद्यापीठात कोणताही नवा पुतळा उभारण्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारावीत आणि त्यांना अशा महापुरुषांची नावे द्यावीत, अशी त्यांची मागणी आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने उभारलेल्या वसतिगृहात त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचे एखादे दालन उभारले तर ते पुढच्या पिढ्यांसाठी अधिक प्रेरणादायी ठरू शकते. पण हा विचार येण्याऐवजी कुलगुरूंच्याही मनात पुतळ्याचाच विचार यावा यातच सर्व आले.       
 

-निवासी संपादक, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...