आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असुरक्षित कुलगुरूंच्या छत्रात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारण १३५ वर्षांपूर्वी तत्कालीन बंडखोर महिला लेखिका ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ नावाचा ग्रंथ लिहून महिलांवर पुरुष कसा अन्याय करीत राहतात हे उदाहरणांसह दाखवून दिले होते. तोच संदर्भ घेऊन मराठवाड्यातील स्त्रीवादी लेखिका डाॅ. प्रतिभा अहिरे सध्या न्यायालयात दाद मागत आहेत. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवला नाही तर आपल्या विद्यार्थिनींनी आपल्याकडून  काय शिकायचे, असा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या विद्यार्थिनी म्हणजे औरंगाबादच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातील विद्यार्थिनी. डाॅ. प्रतिभा अहिरे यांची आठ महिन्यांपूर्वी या केंद्राच्या संचालिका आणि प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सक्षम समितीने अनेकांमधून त्यांची निवड केल्यानंतर झाली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने ९ व्या पंचवार्षिक योजनेत या अभ्यास केंद्राला मान्यता दिली होती आणि नंतरच्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेत त्याला मान्यता मिळत आली आहे. ३१ मार्च २०१७ ला १२ वी पंचवार्षिक योजना संपली. त्यानंतर पुन्हा एक वर्षासाठी या केंद्राला आयोगाने मुदत वाढवून दिली. तरीही कुलगुरू डाॅ. चोपडे यांनी ३१ मार्च रोजी अचानक पत्र देऊन डाॅ. प्रतिभा अहिरे यांना त्यांच्या पदावरून कार्यमुक्त  केले. हा पुरुषी मानसिकतेकडून झालेला अन्याय आहे आणि तो आपण सहन करणार नाही, असे प्रतिभा अहिरे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा विषय त्यांनी थेट न्यायालयात नेला आहे.
 
खरे तर असे अनेक विषय विद्यापीठाच्या आवारात घडत असतात. कधी प्राध्यापक, कधी शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी तर कधी विद्यार्थीही विद्यापीठ आणि कुलगुरूंच्या विरोधात न्यायालयात जातच असतात. त्यात नवे ते काय? असे अनेकांना वाटू शकते. पण हा विषय आता एवढ्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. या प्रकरणात कुलगुरूंच्या दालनापर्यंत तृतीयपंथीयांचे शिष्टमंडळ आणले गेले. त्यांनी तिथे घोषणाबाजी केली आणि १४ एप्रिलनंतर केव्हाही तृतीयपंथीयांचा मोर्चा आणण्याचा इशाराही दिला. प्रकरण इथपर्यंतच मर्यादित असते तरी प्रश्न नव्हता. पण या प्रकरणातून कुलगुरू चोपडे यांच्यावर हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष शाखेकडे आली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी कुलगुरू डाॅ. चोपडे यांना सरकारी खर्चाने सशस्त्र बंदोबस्त पुरवला आहे. त्यामुळे हे विद्यापीठ आणि त्याचा परिसर असुरक्षित असल्याचा शिक्का पुन्हा एकदा बसला आहे. याआधी डाॅ. पांढरीपांडे कुलगुरू असताना त्यांनाही सशस्त्र पोलिस बंदोबस्त घ्यावा लागला होता.
 
डाॅ. प्रतिभा अहिरे यांना पदावरून हटवून विद्यापीठाने डाॅ. स्मिता अवचार यांची तिथे नियुक्ती केली आहे. डाॅ. अवचार या विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. एकेकाळी त्यांनी डाॅ. प्रतिभा अहिरे यांना शिकवले आहे. पण तरीही प्रतिभा अहिरे यांचा त्यांच्या नियुक्तीला आक्षेप आहे. कारण पदाच्या मुलाखतीच्या वेळी त्याही स्पर्धेत होत्या आणि समितीने त्यांची निवड केली नव्हती, असे अहिरे यांचे म्हणणे आहे. यावर विद्यापीठाची भूमिका वेगळीच आहे. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार अनुदान आयोगाने केंद्राला एकाच वर्षाची मुदत वाढवून दिली आहे. त्यात पगाराच्या खर्चाचा उल्लेख नाही. त्यामुळे मोठ्या पगाराचे हे पद विद्यापीठातीलच विभागप्रमुखाला देऊन मोठा खर्च वाचला आहे, असा विद्यापीठाचा दावा आहे. अर्थात, पगाराचा खर्च करणार नाही, असेही आयोगाने पत्रात म्हटलेले नाही आणि पगाराचा खर्च केला जाईल, असे आयोगाने सांगितले तर प्रतिभा अहिरे यांना पुन्हा पद दिले जाईल का, याचेही उत्तर विद्यापीठाकडे नाही.
 
एका महिलेला पदावरून काढून दुसऱ्या महिलेलाच ते पद सोपविले असेल तर पुरुषी मानसिकतेचा संबंध कुठे येतो, असाही प्रश्न केला जातो आहे. त्याचे उत्तर शोधायचे तर कथितरीत्या पडद्याआड झालेल्या हस्तक्षेपाच्या आरोपांवर विश्वास ठेवावा लागेल. या आरोपानुसार कुलगुरूंनी डाॅ. प्रतिभा अहिरे यांना पदमुक्त करण्याच्या काही दिवस आधी अकॅडमिक स्टाफ काॅलेजच्या दोघा पुरुष प्राध्यापकांना पदमुक्त केले होते. जर दोन पुरुषांना पद सोडायला लावत असाल तर तोच न्याय डाॅ. प्रतिभा अहिरे यांना का नाही, असा प्रश्न एका पुरुष आमदाराने विचारला आणि त्यामुळे अहिरे यांना मुदतवाढ देऊनही अचानक पदमुक्त करण्यात आले. ही पुरुषी मानसिकताच आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठात सर्वत्र संघ विचारांची माणसे बसवली जात आहेत आणि प्रतिभा अहिरे त्याच्याच बळी ठरल्याचाही आरोप होतो आहे. खरे-खोटे न्यायालयात सिद्ध होईलच; पण इथले कुलगुरूही सुरक्षित नाहीत, हा संदेश मात्र आजच सर्वत्र गेला आहे. त्यामुळे ताराबाईंसारख्या धारिष्ट्यवान महिलेच्या नावाने असलेल्या स्त्री अभ्यास केंद्रापर्यंत यायला स्त्रिया धजावतील का, हा प्रश्न आहे.   
- निवासी संपादक, औरंगाबाद 
बातम्या आणखी आहेत...