आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा बदलली; मानसिकता केव्हा?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी दारात येऊन उभी ठाकली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना साडेअकरा महिन्यांपूर्वी शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या अग्नितांडवाचे स्मरण वारंवार होते आहे. पोलिस प्रशासनालाही तो अग्निप्रपात विसरता येण्यासारखा नसल्यामुळे यंदा ताकही फुंकून पिण्याची भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली आहे. परिणामी अयोध्यानगरीतील मैदान या एकाच ठिकाणी शहरातील नागरिकांना फटाके खरेदीसाठी जावे लागणार आहे. वाळूजसाठी स्वतंत्र फटाका मार्केटला परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त दरवर्षी शहरात विविध भागात उभारल्या जाणाऱ्या एकाही फटाका बाजाराला यंदा पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. अर्थात, शहरातल्या लांबच्या टाेकावरून अयोध्यानगरीत याव्या लागणाऱ्या फटाके ग्राहकांना ही व्यवस्था काहीशी गैरसोयीची वाटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून या निर्णयावर टीका होण्याचीही शक्यता आहे. पण ज्या ज्या वसाहतीत मागच्या वर्षापर्यंत फटाके बाजार लागायचे त्या वसाहतीतल्या नागरिकांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.  
 
अर्थात, ‘यह तो होना ही था’ असेच म्हणायला हवे. मागच्या वर्षी जिल्हा परिषदेच्या मैदानावरील संपूर्ण फटाका बाजार एका ठिणगीने भस्मसात केला. कोट्यवधी रुपयांच्या मालाचे आणि वाहनांचे या आगीत नुकसान झाले. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. त्यानिमित्ताने फटाका मार्केटच्या उभारणीतील चुका तर समोर आल्याच; पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांचे संगनमत झाले तर संपूर्ण शहरच कसे संकटात सापडू शकते हेही अनुभवायला मिळाले. अर्थात, या आगीनंतरही हे संगनमत कायम असल्याचाच प्रत्यय येत राहिला आहे. अजूनही या प्रकरणात एकाही व्यक्तीला थोडीही शिक्षा झालेली नाही हे त्या अनैतिक संगनमताचेच द्योतक नाही का? सिगारेटच्या थोटकामुळे आग लागली, असा निष्कर्ष काढून एका फटाका विक्रेत्यावर या आगीचे खापर फोडण्यात प्रशासकीय पातळीवरचे सर्वच घटक सरसावले. कोणातरी एकाला दोषी ठरवले तर इतर सर्व निर्दोष होतात या तत्त्वावर सर्वांनी अविचल निष्ठा दाखवली आणि त्यानुसार वर्तन करीत आपल्याला आणि आपल्या कोंडाळ्याला दोषमुक्त करवून घेतले. व्यक्ती दोषी असल्याचे सिद्ध केल्यामुळे व्यवस्था दोषी असण्याचा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही आणि व्यवस्थेच्या दोषांवर चर्चाच होणार नसेल तर ती व्यवस्था बदलण्याचाही प्रश्न येत नाही, अशी या फटाका बाजार अग्नितांडवाची स्थिती आहे. त्यामुळे यंदा फटाका बाजाराचे स्थान बदलले असले तरी मागच्या वर्षीची व्यवस्था बदलण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.  
 
मागच्या वर्षी अग्निशमन विभागाचा बंब फटाका बाजाराजवळ उभा करण्यात आलेला नव्हता. प्रत्येक दुकानात आवश्यक असलेले अंतर ठेवण्यात आले नव्हते. दुकानांमध्ये पटकन आग पकडतील अशा लाकूड आणि कापडाचा वापर बंदी असतानाही करण्यात आला होता. अग्निशमनासाठी आवश्यक असलेल्या साधनांची व्यवस्था केलेली नव्हती. रेतीच्या बादल्या भरून ठेवलेल्या नव्हत्या. स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नव्हती. मर्यादेपेक्षा किती तरी अधिक प्रमाणात ज्वलनशील फटाके तिथे आणण्यात आले होते. या सर्व बाबींसाठी जबाबदार कोण होते हे विचारण्याची गरजच उरली नाही. कारण या कारणांमुळे आग लागल्याचे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस यांनी स्वतंत्रपणे केलेल्या चौकशीपैकी कोणत्याही चौकशी अहवालात नमूद नाही.
 
मागच्याच वर्षी हे सारे घडले असल्यामुळे  कदाचित यंदा त्याबाबतीत काळजी घेण्याची समयसूचकता प्रशासनाकडून दाखवण्यात येईल. अग्निशमन विभागाचा बंबही २४ तास फटाका मार्केटजवळ उभा राहील. पण पुढे किती काळ हे टिकून राहील याची कोणालाही शाश्वती नाही. ज्या बाबी उघडपणे समोर दिसत होत्या त्याबाबतीत यंदा काळजी घेतली गेली तरी नियमांचे खरोखरच काटेकोर पालन होईल याची शक्यता मात्र दिसत नाही. शहरात किती फटाके (स्फोटके) आले याची खरी माहिती शेवटपर्यंत पोलिसांकडे येणार नाही. कारण त्यासाठी प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन मालाची तपासणी करणे अभिप्रेत आहे. किंबहुना ज्या वाहनाने फटाके शहरात आणले जाणार आहेत त्या वाहनावरही पोलिसांचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. तेवढी तसदी घेण्यापेक्षा अन्य सोप्या मार्गाने फटाके बाजारालाच नियंत्रित कसे करता येईल याची काळजी पोलिस यंत्रणा घेताना दिसते आहे. पोलिस काळजी घेत आहेत म्हटल्यानंतर महापालिकेलाही काळजीचे कारण नाही. कारण फटाका विक्रेता संघटना आहे स्थानिक राजकीय नेत्यांच्या हातात. त्यांच्याशी वाईटपणा कोण घेईल? ही मानसिकता बदलेल, तो खरा बदल.
 
बातम्या आणखी आहेत...