आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष यात्रेत अंगार कमी, मरगळ मात्र अधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजवादी पक्ष, शेकाप, भारतीय शेतकरी पक्ष, कवाडे गट यांचे एकत्र कडबोळे बांधून काँग्रेस – राष्ट्रवादीने तयार केलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रातून पार झाला. जिजाऊंच्या सिंदखेड राजा येथून सुरू झालेली ही संघर्षयात्रा जळगाव, नाशिक मार्गे शहापूरला विसर्जित होत आहे.
 
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी विरोधकांनी सुरू केलेल्या या संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काय फरक पडला या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांनाच कोड्यात टाकणारे आहे. विरोधकांच्या पहिल्या टप्प्यातील ‘संघर्ष’नंतर ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतीच्या प्रश्नांबाबत राज्यातील शेतकऱ्यांशी थेट ‘संवाद’ साधायला सुरुवात केली एवढाच काय तो फरक. अन्यथा दर दिवशी राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना मात्र विरोधकांच्या ‘संघर्ष’ने थांबलेल्या दिसत नाहीत की सत्ताधाऱ्यांच्या ‘संवाद’ने. शेतीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यापर्यंत विरोधकांचा संघर्ष आणि सत्ताधाऱ्यांचा संवाद मात्र कुठेच पोहोचताना दिसत नाही.  
 
गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी भाव यंदाच्या उन्हाळ कांद्याला मिळत आहे. परंतु कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बाजार समितीच्या आवारात संघर्ष यात्रा पोहोचली तेव्हा शेतकऱ्यांचा असंतोष आणि विरोधकांच्या संघर्षाचा झंझावात यापेक्षा बाजार समितीचे सभापती असलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी केलेले नेटके इव्हेंट मँनेजमेंटच लक्षवेधी ठरत होते. सभेच्या ठिकाणी पाहुण्यांसाठी अंथरण्यात आलेले हिरवे-लाल गालिचे, आवारात घातलेल्या रांगोळ्या आणि प्रवेशद्वारावरील ढोल-ताशांसह सामूहिक नृत्य यामुळे ही संघर्ष यात्रा आहे की स्वागत यात्रा असा प्रश्न पडावा असेच वातावरण होते.

यात्रेत सहभागी प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीस बोलण्याची संधी मिळेल असे नियोजन करून सगळ्यांची भाषणे झाली; पण त्यापैकी एकाही भाषणात जान नव्हती की धार नव्हती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रवीण गायकवाड असे एकापेक्षा एक दिग्गज व्यासपीठावर होते. एकेकाळी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरलेले पण सध्या धुळे जिल्हा दूर नाही, कुसुंबा मतदारसंघातही ज्यांचा प्रभाव राहिलेला नाही ते माजी मंत्री रोहिदास पाटलांपासून काँग्रेस – राष्ट्रवादीचे आजीमाजी आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष या साऱ्यांवर संघर्ष यात्रेची जबाबदारी देण्यात आली होती. ती सर्वजण नेटाने पार पाडतानाही दिसत होते.

पण त्यांच्या लेखी ती जबाबदारी पार पाडणे म्हणजे संघर्ष यात्रेचे ‘नियोजन’ व्यवस्थित पार पाडणे आणि आपापल्या नेत्यांची योग्य ती ‘बडदास्त’ ठेवणे एवढेच दिसत होते. शेतीवरील संकट, शेतकऱ्याची सध्याची अवस्था आणि सरकारची धोरणे याबाबत निवडक वक्ते सोडले तर इतरांच्या  चेहऱ्यावरील रेषाही हलत नव्हती. अडचणीत असलेल्या पक्षाला कर्जमाफीच्या निमित्ताने एक कार्यक्रम मिळाला आहे आणि आपली त्यात हजेरी अत्यावश्यक आहे याच भूमिकेतून स्थानिक नेते सहभागी झालेले दिसत होते. आपापल्या सभांच्या ठिकाणी गर्दी जमविण्याचे कर्तव्य पार पाडत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्यांची देहबोली यात संघर्षाचा अंगार नव्हता की शेती प्रश्नांबाबतचा संताप. उलट प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्ष अंगात भिनलेला सरंजामी सत्ताधारी आविर्भावच अधिक होता. त्यामुळे घोषणा काय द्यायच्या याचा नेत्यांना लाऊड स्पीकरवरून सराव करून घ्यावा लागत होता, तर खुर्च्या रिकाम्या ठेवू नका, पत्रकार तेच फोटो छापतील अशा जाहीर सूचनाही द्याव्या लागत होत्या. त्यातच अाडगावमधील म्हाडाच्या प्रकल्पाला होणारा स्थानिकांचा विरोध ते समृद्धी महामार्गासाठी सिन्नरच्या शेतकऱ्यांचा विरोध या अन्य मुद्द्यांच्या तापल्या तव्यावर संघर्ष यात्रेची पोळी भाजून घेण्याचा सारा आटापिटा लपत नव्हता.
 
नाशिक जिल्हा परिषदेत भाजपसोबत राष्ट्रवादीही सत्तेत असल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा दादांचा संयम सुटला. संघर्ष यात्रेत भाजपच्या विरोधात रस्त्यावर आणि जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्तेत या विसंगतीवर पत्रकारांनी नेमके बोट ठेवले. त्यामुळे उत्तर नसल्याने अडचणीत आलेल्या अजित दादांनी त्यांचे नेहमीचे चिडण्याचे हत्यार बाहेर काढले. दोन भुजबळ आणि एक पिंगळे या गजाआड गेलेल्या नाशिकमधील राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांमुळे अडचणीत आलेल्या पक्षाच्या पायाखालची घसरलेली वाळू सावरण्याचा प्रयत्न पक्ष कार्यकर्ते करीत असताना नेमक्या याच प्रश्नांमुळे पक्ष नेहमीच अडचणीत सापडतो. दुसरीकडे स्वत:ला समुद्राची उपमा देणाऱ्या काँग्रेसचे नाशिकमधील नेतेही - माजीमंत्री रोहिदास पाटलांपासून शोभा बच्छावांपर्यंत – लोकांना दिसतात ते त्यांचे नेते आल्यावरच. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते जे स्वत:ची पक्ष संघटना, स्वत:चे मतदारसंघ आणि स्वत:चे नेतेपद सांभाळू शकले नाहीत ते शेतकऱ्यासाठी कसा संघर्ष करणार? संघर्षासाठी लोकांना कशी प्रेरणा देणार? आणि ड्रोनद्वारे सुरू असलेल्या शूटिंगच्या पलीकडे जाऊन जमिनीशी नाळ कशी जाेडणार? एकूणच सारी मरगळ दिसत होती.

अपवाद फक्त एका घटनेचा. जळगाव जिल्ह्यात विरोधकांच्या या संघर्ष यात्रेचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केलेले स्वागत, चहापान आणि गप्पा. या मागेही शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक कारणीभूत की खडसेंचा संघर्ष हा प्रश्न आहेच.

dipti.raut@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...