आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divay Marathi Editorial On American Foreign Policy

साहसवादावर मात (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या अध्यक्षपदी 2012 मध्ये दुसर्‍यांदा निवड झाल्यानंतर अध्यक्ष बराक ओबामा यांनी 2014 या वर्षाच्या अखेरीस अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजा माघारी येतील, असे जाहीर केले होते. पण बुधवारी त्यांनी न्यूयॉर्क येथील मिलिटरी अकॅडमीत केलेल्या भाषणात अफगाणिस्तानात तैनात केलेल्या अमेरिकी फौजा 2016 पर्यंत टप्प्याटप्प्याने मायदेशी येतील, असे स्पष्ट केले आहे. ओबामा यांची ही नवी घोषणा अफगाण-पाकिस्तान सीमेवरील दहशतवाद्यांना जसा एक इशारा आहे तसेच त्यांच्या परराष्ट्र धोरणावर अमेरिकेत चोहोबाजूंनी जी टीका चाललेली आहे त्यालाही प्रत्युत्तर आहे. ओबामा यांनी हा कार्यकाळ का वाढवला याची काही कारणे आहेत. येत्या काही दिवसांनी अफगाणिस्तानात करझाई यांचे सरकार जाऊन नवे सरकार अस्तित्वात येईल व हे सरकार प्रस्थापित झाल्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेत दहशतवादी गट बर्‍याच सरकारी यंत्रणांचा ताबा घेतील, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडे होती. त्याचबरोबर ओबामांनी हा निर्णय घेताना भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तान या तिन्ही देशांमधील बदललेली राजकीय परिस्थितीही समजून घेतली आहे. या तीनही देशांत नव्या राजवटी आल्याने अनेक राजकीय संदर्भ बदलले आहेत. भारतात भाजपची सत्ता आली असल्याने आणि भाजपची आक्रमक हिंदू राष्ट्रवाद व दहशतवाद्यांसंदर्भातील ‘झीरो टॉलरन्स’ भूमिका पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांना चेतावणारी असल्याने परिस्थिती अधिक बिघडू शकते. दुसरीकडे पाकिस्तानात नवाझ शरीफ सरकार आर्थिक पातळीवर भरीव असे काही करू शकलेले नाही. त्यामुळे नवाझ शरीफ यांनी आपल्या भारत भेटीत व्यापारावर अधिक भर देण्यात यावा, अशी विनंती केली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट आखणारे मुख्य सूत्रधार भारताच्या हवाली करण्याचा मुद्दा, काश्मीरमधील दहशतवादी कारवाया वा घुसखोरी हे प्रश्न चर्चेद्वारे सुटतील, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. भारत केवळ दहशतवादाचा मुद्दा घेऊन पाकिस्तानपुढे अटी घालतो यावर पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पाकिस्तानचे लष्कर हे खुद्द अंतर्गत असंतोषाशी लढत आहे व लष्करातील काही गट हे भारतविरोधी कारवायांना बळ देतात हे वास्तव समजून घेण्याची गरज आहे, असे नवाझ शरीफ यांना वाटते. ही राजकीय पार्श्वभूमी पाहता ओबामा यांनी तालिबान दहशतवाद्यांच्या संभाव्य कारवायांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. तसे केले नसते तर दहशतवादी गटांना अफगाणिस्तान-पाकिस्तान, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या राजकीय संबंधांचा फायदा घेऊन आपला पाया अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली असती. आता दोन वर्षे अमेरिका अफगाणिस्तानात पाय रोवून उभी राहिल्याने भारत-पाकिस्तान संबंध अधिक मैत्रीपूर्ण होतील ही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय नरेंद्र मोदींना पाकिस्तानशी संबंधांबाबत जे काही भरीव कार्य करायचे आहे त्यालाही मोठा राजकीय अवकाश मिळाला आहे. त्याला अर्थातच अमेरिकेचा पाठिंबा मिळालेला आहे. ओबामा यांच्या भाषणात त्यांच्या टीकाकारांना उत्तरही होते. त्यांनी अमेरिकी नागरिकांवर हल्ले किंवा अमेरिकी हितसंबंधांवर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल व त्यासाठी युद्ध किंवा हल्ले यांचा मार्ग वापरण्यास अमेरिका कुचराई करणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. सिरियातील गृहयुद्ध व युक्रेनमधील यादवी रोखण्यात अमेरिकेला अपयश आल्याची टीका सध्या ओबामा यांच्यावर चोहोबाजूंनी होत आहे. ओबामा यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या आजपर्यंतच्या एकूण साडेपाच वर्षांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय राजकारणात दादागिरी किंवा युद्धखोर धोरण न राबवता आर्थिक सहकार्य व शांतता या मुद्द्यांना आपल्या परराष्ट्र धोरणात प्राधान्य दिले. अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेतून बाहेर पडलेली असताना तिचे लष्करी सामर्थ्य जगाला दाखवून देण्याच्या अनेक संधी आल्या असतानाही ओबामा यांनी तणाव निवळण्याच्या दृष्टीने वाटाघाटी, चर्चा अशा शांततामय पर्यायांवर भर दिला असे या टीकाकारांचे मत आहे. दुसरे महायुद्ध ते आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याची हत्या या कालखंडात अमेरिकेचे जगाच्या राजकारणावर वर्चस्व होते. आता हे वर्चस्व गेल्या दोन वर्षांमध्ये झपाट्याने कमी होत असून चीन, भारत, रशियासारख्या नव्या सत्ता जगाच्या राजकारणाची सूत्रे हाती घेत असल्याचे टीकाकारांचे मत आहे. 2016 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होत असून विरोधी रिपब्लिकन पक्षाची ओबामा यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाविरोधातील ही प्रचार मोहीम आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. शीतयुद्धाच्या काळातील अमेरिकी थिंकटँक तर युक्रेन वा सिरियाच्या प्रश्नात रशियाने अमेरिकेवर कडी केल्यामुळे खूप नाराज झाला आहे. ओबामांवर टीका करणार्‍यांच्या मतांमध्ये तथ्य वाटत असले तरी लष्करी हस्तक्षेपामुळे प्रश्न मिटत नाहीत व अमेरिकेचा साहसवाद बर्‍याच वेळा अंगाशी आला आहे, हा ओबामांचा युक्तिवाद अधिक रास्त आहे. त्यामुळे सध्याच्या काळात अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे सैन्य अधिक काळ तैनात असणे हे भारत-पाकिस्तानच्या दृष्टीने फायद्याचे आहे.