आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divay Marathi Editorial On Jammu kashmir Railway Line

मने जोडणारा बोगदा (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये साकारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा हा केवळ दळणवळणच नव्हे, तर राजकीय, लष्करी, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक अशा अनेक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रस्ते, रेल्वेमार्ग वा दळणवळणाच्या अन्य सुविधा म्हणजे कुठल्याही ठिकाणच्या विकासासाठी जणू रक्तवाहिन्या समजल्या जातात. पण, या रेल्वे बोगद्याचे महत्त्व केवळ तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही. कारण ज्या जम्मू-काश्मीरमध्ये तो साकारला गेला, तेथील स्थिती एकुणातच इतर ठिकाणांपेक्षा सर्वच बाबतीत भिन्न आहे. साहजिकच या रेल्वे बोगद्यामुळे केवळ दोन भौगोलिक प्रदेशच नव्हे, तर दुभंगलेली मनेदेखील जोडण्याची प्रक्रिया कळत-नकळत आपसूकपणे सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, प्रस्तुत बोगद्यामुळे आता काश्मीर खोर्‍याचा वर्षातील बाराही महिने देशाशी अखंडित संपर्क राहील. गुंतागुंतीच्या राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीमुळे काश्मीर खोर्‍यातील बहुसंख्य जनतेच्या मनात एकटेपणाची, उपेक्षेची, दुर्लक्षिततेची छटा असताना भौगोलिक स्थिती आणि हवामान यामुळे वर्षातून काही काळ या परिसराचा देशातील अन्य भागांशी असलेला संपर्क खंडित व्हायचा. त्यातून त्यांच्यात एकटेपणाची, विलगतेची भावना अधिक रुजत जायची. हे टाळण्यासाठी कायमस्वरूपी संपर्क व्यवस्था निर्माण करणे अत्यंत गरजेचे होते. त्या दृष्टीने प्रथम रस्ता मार्गे दळणवळणावर भर देऊन जवाहर बोगद्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तडीस नेला गेला. पण, विशेषत: हिवाळ्यात जेव्हा बर्फवृष्टी होते तेव्हा अनेकदा हा मार्गसुद्धा निरुपयोगी ठरतो. आता मात्र नव्या महाकाय रेल्वे बोगद्यामुळे ही समस्या पूर्णांशाने दूर होऊ शकणार आहे. पीर पंजाल पर्वतीय प्रदेशात खोदण्यात आलेल्या या बोगद्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तब्बल अकरा किलोमीटर अंतराचा हा बोगदा देशातील सर्वात मोठा तसेच आशिया खंडातील तिसर्‍या क्रमांकाचा आहे. न्यू ऑस्ट्रियन पद्धतीने तो खोदण्यात आला असून रुळांच्या दोन्ही बाजूंना तीन मीटर रुंदीचा सिमेंटचा रस्ता, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा अशी त्याची रचना आहे. हिमालयासारख्या तुलनेने ठिसूळ असलेल्या पर्वतीय प्रदेशात असा बोगदा खोदणे हे खरे तर मोठे आव्हानच होते. भौगोलिक असमतोल, प्रकल्पासाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या वाहतुकीची डोकेदुखी, मजुरांचा अभाव, अभियंते व कुशल कारागिरांची येथे काम करण्याची नकारात्मक मानसिकता आणि या सगळ्यावर असलेली दहशतवादी कारवायांची गडद छाया अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साकारलेल्या या प्रकल्पासाठी भारतीय रेल्वेला सलामच करायला हवा. राज्यकर्त्यांनी त्यांना दिलेल्या पाठबळाबद्दल तेसुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. सहसा हे दोन्ही घटक टीकेचे धनी होत असतात. विशेषत: मीडियासाठी शासन आणि प्रशासकीय यंत्रणा नेहमीच ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरते. पण, असा एखादा आव्हानात्मक प्रकल्प साकारून जणू यंत्रणा त्याला परस्पर चोख उत्तर देऊन टाकते. असो. काश्मीरच्या बाबतीत बोलायचे झाले तर या प्रकल्पामुळे नक्कीच खूप काही साध्य होणार आहे. तेथील विध्वंसक प्रवृत्तींना नेमके तेच नको असल्यामुळे प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधानांच्या नियोजित दौर्‍याच्या पूर्वसंध्येला दहशतवाद्यांनी सैन्यदलाच्या ताफ्यावर थेट हल्ला चढवत आपला इरादा व्यक्त केला. कारण, वर उल्लेख केल्याप्रमाणे हा बोगदा केवळ दळणवळणासाठीच नव्हे, तर इतरही अनेक दृष्टींनी स्थानिक काश्मिरी जनतेच्या मानसिक परिवर्तनासाठी सकारात्मक किरण घेऊन येणार आहे. एक तर बोगद्यामुळे प्रत्येक मोसमात जम्मू-काश्मीरशी संपर्क अखंड राहणार आहे. बनिहाल आणि काजीगुंंडदरम्यानचे 35 किलोमीटरचे अंतर निम्म्यावर येणार आहे. साहजिकच वेळ, श्रम, पैसा या सार्‍याचीच बचत होणार आहे. शिवाय, काश्मीर खोर्‍यातील पर्यटनाच्या मुख्य व्यवसायाची केवळ वृद्धीच नव्हे, तर भरभराट होण्यास त्यामुळे हातभार लागेल. इतर व्यापारालाही चालना मिळेल. रोजगार उपलब्ध झाले, अर्थकारणाने वेग घेतला, तर काश्मिरी जनतेची मानसिकता नक्कीच बदलू लागेल. परिणामी, धर्मद्वेषाच्या नावाखाली स्थानिकांची माथी भडकावणे सहज शक्य होणार नाही, हे दहशतवादी जाणून आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, गरज भासल्यास भारताला आपली लष्करी सामग्री तसेच सैन्याची ने-आण जलद गतीने करणे शक्य होणार आहे. सीमा सुरक्षितता व अंतर्गत शांततेसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. एका रेल्वे बोगद्यामुळे हे सारे आवाक्यात येणे शक्य असल्याची बाबच दहशतवाद्यांची खरी पोटदुखी आहे. परिणामी, अशा प्रवृत्तींकडून बोगद्याच्या आणि एकुणात या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 1700 कोटी रुपये खर्ची घालून आणि प्रचंड आटापिटा करून उभारलेल्या या रेल्वेमार्गाच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणेही तितकेच निकडीचे आहे, हे विसरता कामा नये. तूर्त या मार्गावरून रेल्वे गाड्यांच्या दररोज पाच फेर्‍याहोणार असून भविष्यात तेथील दळणवळणात वाढ होईल. साहजिकच परिसरातील सर्वसामान्य जनतेचा प्रवासाचा दैनंदिन प्रश्न काही प्रमाणात का होईना सुसह्य बनेल. पर्यटकांचा ओघ या माध्यमातून वाढला तर त्याचे लाभ अधिकाधिक संख्येने स्थानिकांनाच होणार आहेत. म्हणजे, हा बोगदा केवळ प्रवाशांची वा मालाची वाहतूकच नव्हे तर आर्थिक, सांस्कृतिक, भावनिक अशा अनेक प्रवाहांचा ओघ इकडून तिकडे घेऊन जाणार आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही या प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी भविष्यातील विकासाचा दाखला देत तेथील जनतेला आश्वस्त केले आहे. काश्मीर खोर्‍यातील जनतेची मने सांधण्याचा गेल्या काही वर्षांपासून सकारात्मक दिशेने सुरू असलेला प्रवास या नव्या बोगद्याच्या माध्यमातून अधिक गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही, अशी आशा या निमित्ताने प्रत्येक भारतीयाने बाळगायला हवी.